चीनकडून लडाख सीमेवर ५० सहस्र सैनिक तैनात !

ड्रोनद्वारे भारतावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न

  • चीनशी आज ना उद्या दोन हात केल्याविना भारताला शांतता लाभणार नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यादृष्टीने भारताने चीनच्या विरोधात आक्रमक भूमिकाच घेणे आवश्यक आहे ! – संपादक 
  • नेहमी चीनने कुरापती काढल्यावर भारत त्याला प्रत्युत्तर देतो. कुरापत काढण्याचे चीनचे धारिष्ट्य होणार नाही, अशी परिस्थिती भारत का निर्माण करत नाही ? – संपादक 
प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – चीनच्या सैन्याने लडाखच्या सीमेवरील दौलत बेग, ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स आदी भागांमध्ये सैनिकी हालचाली वाढवल्या आहेत. येथील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनने ५० सहस्रांहून अधिक सैनिक तैनात केले असून भारतीय चौक्यांच्या पुष्कळ जवळून ड्रोन उडवले जात आहेत, तसेच सीमेजवळ लढाऊ विमानांसाठी तळ उभारण्यात येत असून या तळांवर शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत. चिनी सैन्याच्या या हालचालींवर भारतीय सैन्य लक्ष ठेवून आहे. भारतीय सैन्यही मोठ्या प्रमाणावर ड्रोन तैनात करत असून लवकरच या ठिकाणी इस्रायल आणि भारतीय बनावटीचे ड्रोन पाठवले जाणार आहेत.

नियंत्रणरेषेच्या परिसरात चीन मोठ्या प्रमाणात बांधकाम करत आहे. आणखी २ मासांनी या भागात हिवाळा चालू होऊन बर्फवृष्टी होईल. अशा कठीण परिस्थितीतही चिनी सैनिकांना या परिसरात सुलभतेने वावरण्यासाठी या बांधकामांचा वापर करण्यात येणार आहे.