अध्यात्मविषयक बोधप्रद ज्ञानामृत…

 ।। श्रीकृष्णाय नमः ।।

पू. अनंत आठवले

माया

पूर्णपणे इच्छारहित, कामनारहित होणे हाच मायेच्या पकडीतून सुटण्याचा उपाय ! – पू. अनंत आठवले

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/510380.html

४. मायेच्या पकडीत, जन्म-मरणाच्या चक्रात मनुष्य का अडकतो ?

४.१. कामना, इच्छा होणे हे बंधनाचे कारण आहे. मनुष्याला काही मिळवण्याच्या, भोग घेण्याच्या, काही नष्ट करण्याच्या इच्छा, होत राहतात. त्या पूर्ण करण्यासाठी मनुष्य कर्मे करतो. काही चांगली-वाईट कर्मे त्याच्याकडून होतात. चांगल्या कर्मांनी पुण्याचा आणि वाईट कर्मांनी पापाचा संग्रह होत जातो. ते पाप-पुण्य भोगण्यासाठी पुनर्जन्म होतो. मग पुन्हा इच्छा, पुन्हा कर्म. असे हे चक्र अव्याहत चालू राहते. मनुष्य कामना करीत राहील तोपर्यंत बंधनातून, जन्म-मरणाच्या चक्रातून, सुटणार नाही.

४.२. वरील विचारसरणीला काही शास्त्रीय आधार आहे का ?

हो. वर जो निष्कर्ष काढला आहे की कामना, इच्छा हेच बंधनाचे कारण आहे, त्याला श्रुती आणि इतर ग्रंथांचे आधार आहेत. त्यातील काही उद्धरणे पुढे दिली आहेत.

४.२.१. कठोपनिषद् 

यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येऽस्य हृदि श्रिताः।

अथ मर्त्याेऽमृतो भवत्यत्र ब्रह्म समश्नुते ।।

– अध्याय २, वल्ली ३, मंत्र १४

अर्थ – मनुष्याच्या हृदयात राहणार्‍या सर्व कामना ज्या वेळी सुटून जातात, त्या वेळी मरणशील मनुष्य अमरत्व प्राप्त करतो. इहलोकीच ब्रह्मत्व प्राप्त करतो.

४.२.२. योगवासिष्ठ

इच्छामात्रमविद्येह तन्नाशो मोक्ष उच्यते ।

स चासंकल्पमात्रेण सिद्धो भवति राघव ।।

– उत्पत्तिप्रकरणम्, ७-११४

अर्थ – हे राम, इहलोकात केवळ इच्छा ही अविद्या (अज्ञान) आहे. तिच्या नाशाला मोक्ष म्हणतात. तो मोक्ष केवळ संकल्प न करण्याने सिद्ध होतो.

काही करण्याचे, काही मिळवण्याचे, काही नष्ट करण्याचे, असे अनेक संकल्प मनात उठत राहतात, जे इच्छामूलक असतात. संकल्प मनात झालेच नाहीत, तर मोक्षप्राप्ती होते.

४.२.३. महाभारत

कामबन्धनमेवैकं नान्यदस्तीह बन्धनम् ।

कामबन्धनमुक्तो हि ब्रह्मभूयाय कल्पते ।।

– पर्व १२, अध्याय २५१, श्लोक ७

अर्थ – कामना हे एकच बंधन आहे. येथे अन्य बंधन नाही. कामनेच्या बंधनातून जो मुक्त झाला, तोच ब्रह्मप्राप्तीच्या योग्य मानला जातो.

तात्पर्य हे आहे की इच्छा होण्यानेच मनुष्य मायेत अडकतो, बंधनात पडतो.

५. माया म्हणजे काय, मायेचे स्वरूप आणि इच्छांचे उगमस्थान

इच्छांचेही मूळ शोधले, तर ते त्रिगुणांमध्ये सापडते. सत्व, रज आणि तम ह्या मनुष्यात असलेल्या तीन गुणांमुळे मनुष्याला इच्छा होतात. प्रत्येक गुणामुळे अनेकानेक इच्छा, कामना होतात, काही अगदी थोडक्यात पुढे दिल्या आहेत.

सत्वगुणामुळे सुख आणि ज्ञान मिळवण्याची इच्छा; पूजा, यज्ञ, दान, अडचणीतल्या लोकांना साहाय्य करणे अशांसारखी सात्त्विक कर्मे करून सात्त्विक समाधान मिळवण्याची इच्छा इत्यादी.

रजोगुणामुळे कर्मांमध्ये प्रवृत्ती, लोभ, मनाची चंचलता, विषयभोगांची लालसा इत्यादी. यक्षासारख्या योनींना वश करुन घेऊन त्यांच्याकडून काही मिळवण्याच्या इच्छा.

तमोगुणामुळे योग्य काय तिकडे दुर्लक्ष, आळस, कर्तव्ये टाळणे, अती निद्रेची इच्छा, मोह इत्यादी. भूत-प्रेतांना प्रसन्न करून घेऊन काही मिळवण्याच्या इच्छा.

तात्पर्य हे आहे की आपण बंधनात पडतो आपल्या कर्मांमुळे, कर्मे करतो इच्छांमुळे आणि इच्छांची प्रेरणा होते त्रिगुणांमुळे. तेव्हा माया त्रिगुणात्मक, गुणमयी आहे आणि ‘इच्छा होणे’ हे तिचे कार्य आहे.

भगवान् श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले आहे –

‘दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया  ।।’

– अध्याय ७ श्लोक १४

अर्थ – ‘ही माझी गुणमयी माया दुस्तर (तरून जायला कठीण) आहे.’

स्पष्टच म्हटले आहे की माया गुणमय, गुणस्वरूप आहे. दैवी का म्हटले आहे ? कारण ती अचेतन नाही तर चैतन्यमय आहे, सामर्थ्यवान् आहे आणि त्या सामर्थ्याचे, शक्तीचे एक कार्य मनुष्यांमध्ये इच्छा उत्पन्न करणे हे आहे.

६. माया संपूर्णपणे संपू शकते का ?

६.१. ह्या प्रश्नाचे उत्तर जाणण्याकरता ‘ब्रह्म’पासून मनुष्यापर्यंत उत्पत्तीचा क्रम बघावा लागेल. हा विषय खूप मोठा आहे, पण शक्य तो विस्तार टाळून थोडक्यात बघूया. अनंत ‘ब्रह्म’मध्ये त्याच्या एका अंशावर शबल ब्रह्म, सगुण ब्रह्म, ईश्वर व्यक्त होतो. त्यातून महत्तत्व, महत्तत्वातून त्रिगुण, त्रिगुणांतून सूक्ष्म सृष्टी आणि सूक्ष्मातून स्थूल सृष्टी व्यक्त होते. मनुष्यांपुरते सांगायचे, तर सत्वगुणापासून मन, रजोगुणापासून ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये तसेच तमोगुणापासून पञ्चतन्मात्रा आणि पुढे पंचमहाभूत बनलेले आहेत म्हणजे आपले मन, इंद्रिये आणि शरीर त्रिगुणांचेच बनले आहेत.

आपल्यातून गुणमयी माया काढून टाकता येईल का ? हे शक्य नाही. मातीचे बनलेले एक मडके आहे. आता आपण म्हटले की मडक्यातून माती काढून टाकावी तर ते शक्य आहे का ? नाही ! त्याचप्रमाणे आपल्यातील मन, सर्व इंद्रिये, शरीर इत्यादी त्रिगुणांचे म्हणजे मायेचेच बनले आहे, तर आपल्यातील माया कशी नष्ट करणार ? असंभव !

६.२. भगवान् श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले आहे –

भूतग्राम: स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।

रात्र्यागमेऽवश: पार्थ प्रभवत्यहरागमे ।।

– अध्याय ८, श्लोक १९

अर्थ – तोच प्राणीसमुदाय पुन्हा-पुन्हा उत्पन्न होऊन रात्र झाल्यावर विवश होऊन विलीन होतो आणि दिवसाचा आरंभ झाल्यावर पुन्हा उत्पन्न होतो. (येथे ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक हजार चतुर्युग. एक चतुर्युग ४३,२०,००० मानवी वर्षांचे असते. दिवसाच्या कालावधी एवढीच एक रात्र असते.)

ह्यावरून स्पष्ट आहे की विलय आणि उत्पत्ती पुन्हा-पुन्हा होत राहतात. प्राणी जन्मणार, त्यांना इच्छा होणार, ते कर्मे करणार आणि त्यापासून बनलेले प्रारब्ध भोगण्यासाठी पुनर्जन्म होत राहणार. म्हणजे माया संपणार नाही.

७. मायेतून कसे सुटायचे ?

आपण वर सूत्र ४.१. मध्ये पाहिले की मायाजनित इच्छांमुळे आपण जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकतो. म्हणून पूर्णपणे इच्छारहित, कामनारहित होणे हाच मायेच्या पकडीतून सुटण्याचा उपाय आहे. मायेचा आपल्यावरील प्रभाव म्हणजे कामना. आपण पूर्णपणे निरिच्छ झालो की मायेच्या प्रभावातून सुटतो. ह्यालाच शास्त्रग्रंथांमध्ये, भगवद्गीतेमध्ये ‘गुणातीत होणे’ म्हटले आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सुद्धा मायेचेच कार्य आहे. ह्या षड्रिपूंमध्ये काम हा मुख्य आहे. एक काम हा रिपू घालवला, तर बाकीचे रिपूसुद्धा त्याबरोबर जातात, हे सनातन-निर्मित ‘गीताज्ञानदर्शन’ ग्रंथात परिशिष्ट १ सूत्र ५ मध्ये स्पष्ट केलेले आहे. भक्ती, कर्म, ज्ञान, योग इत्यादी सर्व प्रकारच्या साधनांनीसुद्धा मन कामनांपासून दूर करणे साध्य होते.

तात्पर्य हे की मायेला नष्ट करता येणार नाही. पण निरिच्छ, कामनारहित झाल्याने मायेच्या आपल्यावरील प्रभावातून मुक्त होता येते आणि मायेला ओलांडून आपल्या साधनेनुसार ईश्वर किंवा ‘ब्रह्म’मध्ये विलीन होऊन जन्ममरणाच्या चक्रातून सुटका करून घेता येते.

(समाप्त)

– अनंत आठवले (९.८.२०२१)

(संदर्भ : ‘पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या ग्रंथातून)

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

(लेखक पू. अनंत आठवले हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. – संकलक)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.