अध्यात्मविषयक बोधप्रद ज्ञानामृत…

॥ श्रीकृष्णाय नमः ॥

अनंत आठवले

माया

१. माया

१.१. माया म्हणजे काय ?

१.२. मायेच्या पकडीत, जन्म-मरणाच्या चक्रात मनुष्य का अडकतो?

१.३. माया संपूर्णपणे संपू शकते का?

१.४. मायेतून कसे सुटायचे ?

२. विषयप्रवेश

२.१. मायेला पूर्णपणे जाणून तिच्या पकडीतून सुटायचे असेल तर सूत्र क्र. १ मध्ये उपस्थित केलेल्या चार प्रश्‍नांची उत्तरे जाणणे आवश्यक आहे.

२.२. बहुसंख्य सनातन-धर्मी भक्तीमार्गी असतात. ते ‘माया’ ह्या शब्दाचा जो अर्थ मानतात त्या पेक्षा ‘माया’ ह्या शब्दाचा वेगळा अर्थ मांडणारी किंवा ‘माया’ हा शब्द न वापरता तत्सम असलेली मतेही आहेत. तेव्हा ही अशी मते सूत्र क्र.३ मध्ये त्रोटकपणे सांगून त्या मतांवर जे आक्षेप घेतले जातात, तेही सांगितले आहेत.

२.३. सूत्र क्र.१.१. मधील प्रश्‍नाचे उत्तर सूत्र क्र.५ मध्ये ग्रंथप्रामाण्यसहित दिले आहे.

सूत्र क्र.१.२. मधील प्रश्‍नाचे उत्तर सूत्र क्र.४ मध्ये शब्दप्रामाण्यसहित दिले आहे.

सूत्र क्र.१.३. मधील प्रश्‍नाचे उत्तर सूत्र क्र.६ मध्ये दिले आहे.

सूत्र क्र.१.४. मधील प्रश्‍नाचे उत्तर सूत्र क्र.७ मध्ये दिले आहे.

३. ‘माया’ विषयी विभिन्न मते आणि मतांवरील आक्षेप

३.१. माया ही शिवाची शक्ती असून तिच्यामुळे विश्‍व भासते.

आक्षेप – माया तर त्याज्य मानलेली आहे. सर्व सनातन-धर्मग्रंथ, सर्व शास्त्रग्रंथ, सर्व संत-महात्मे मायेच्या पार पडायला सांगतात. मग प्रश्‍न असा पडतो की शिवामध्ये ‘माया’ ही अनिष्ट शक्ती आहे का ? की शिव त्याच्या शक्तीचा अनिष्ट वापर करतो ?

३.२. ब्रह्म आणि माया एकात्म आहेत !

ब्रह्म-माया ही जोडी अर्धनारीनटेश्‍वरासारखी एकात्म आहे. कापूर आणि परिमल (गंध), सोने आणि लेणे (अलंकार), साखर आणि गोडी, पाणी आणि तरंग हे जसे वेगवेगळे नसतात, एकात्म असतात, त्याप्रमाणे ब्रह्म आणि माया एकात्म आहेत.

आक्षेप – अशा प्रकारे ब्रह्म-माया एकात्म मानले तर माया हे नित्य सत्य होईल. वरील मतानुसार जिथे ब्रह्म आहे तिथे माया असणारच. म्हणजे आपण मुक्त होऊन ब्रह्मात विलीन झालो तरी मायेपासून सुटणारच नाही. मग मायेपासून मुक्त होण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरतील.

३.३. माया म्हणजे ‘या’ ‘मा’, म्हणजे जी नाहीच.

आक्षेप – माया नाहीच, तिचे अस्तित्वच नाही. असे असेल तर आपण मायेपासून नित्य मुक्तच आहोत. मुक्तीसाठी साधना, चित्तशुद्धी करण्याची आवश्यकताच नाही. पण असे नाही. ‘माया नाहीच’ असे म्हणून ती नाहीशी होणार नाही. आपण प्रत्यक्षात सुख-दुःख हे मायेचे कार्य अनुभवत असतो. मायेचे अस्तित्वच नाकारुन आपली दु:खे आणि भोग संपणार नाहीत.

३.४. सर्व जग हे स्वप्नवत् आहे.

आपण स्वप्नात जी काही दृश्ये पाहतो किंवा ज्या काही वस्तू पाहतो, त्या नाहीतच असा अनुभव जागे झाल्यावर येतो. त्याप्रमाणे आपली सध्याची अवस्था हे स्वप्नच होते, असा अनुभव आपल्या मूळ ब्रह्मस्वरूपात आपण जागे झाल्यावर येतो.

आक्षेप – ह्यावर अशी शंका येते की आपण मूलतः ब्रह्मस्वरूप आहोत तर ते स्वप्न मुळात कोणी पाहिले ? ‘ब्रह्म’ने पाहिले असे म्हटले, तर ब्रह्म सगुण आणि सदोष होईल.

आणखी एक असे की सर्व जग आणि आपण स्वप्नवत् असू, खरे नसूच, तर मुक्तीसाठी प्रयत्न करायलाच नकोत; कारण आपण नाहीच. आपले अस्तित्वच नाही तर मोक्षाचा प्रश्‍नच नाही.

३.५. ‘मी ब्रह्म आहे’, असे स्फुरण ही (मूळ -) माया आहे.

आक्षेप – अनंत ‘ब्रह्म’च्या एका अंशावर ‘मी ब्रह्म आहे’, असे स्फुरण होते. ‘मी ब्रह्म आहे’, हे स्वरूपाचे भान आहे. स्वरूपाचे ज्ञान असणे, भान होणे, ह्यात दोष तो काय ? ज्ञान हे तर ‘ब्रह्म’चे स्वरूप आहे आणि केवळ स्वरूपाच्या भानाने मनुष्य मायेत गुंतू शकत नाही.

३.६. ‘ब्रह्म’विना काहीच सत्य नाही !

‘ब्रह्म’विना काहीच सत्य नाही, काहीच अस्तित्वात नाही. ज्याप्रमाणे दोरी अंधारात साप वाटते, त्याप्रमाणे प्रत्ययास येणारे जग हा ‘ब्रह्म’वरील अध्यास (असत्य आरोप) आहे. एक अन्य मतानुसार माया ही विवर्तरूप (आभास, मिथ्याज्ञान) आहे. वास्तविक माया नाहीच, तरी मृगजळाप्रमाणे भासते.

आक्षेप – ‘ब्रह्म’ सोडून इतर काही सत्य नाही, तर अध्यास अथवा विवर्त ‘ब्रह्म’ला होतो, असे मानावे लागेल. ‘ब्रह्म’ला भास होत असेल, तर ‘ब्रह्म’चे ज्ञानस्वरूप असणे आणि निर्दोष असणे, हे खोटे ठरेल. तेव्हा अध्यास किंवा विवर्तचा सिद्धांत पूर्ण समाधान करीत नाही.

३.७. टीप – खरे तर सर्वच उत्पत्तीप्रमाणे मायेचेसुद्धा मूळ ईश्‍वरात अथवा ‘ब्रह्म’मध्ये आहे पण तिथे माया व्यक्त झालेलीच नसते आणि ईश्‍वर अथवा ‘ब्रह्म’मुळे मनुष्य जन्ममरणाच्या चक्रात अडकत नसतो.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– अनंत आठवले (९.८.२०२१)

(संदर्भ : ‘पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या ग्रंथातून)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

(लेखक पू. अनंत आठवले हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. – संकलक)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/512233.html