साधिकेला तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना नामजपादी उपाय शोधून तिला साहाय्य करणारे आणि साधनेच्या प्रयत्नांना दिशा देऊन क्षणोक्षणी घडवणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

‘मागील ७ वर्षांपासून मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. मला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने उपायांच्या निमित्ताने माझा सद्गुरु राजेंद्रदादांशी वरचेवर संपर्क होतो. या कालावधीत त्यांनी मला साधनेत केलेले साहाय्य आणि मार्गदर्शन त्यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञतेच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. सत्संगाच्या माध्यमातून साधकांना आनंद आणि चैतन्य देणारे, तसेच त्यांच्यात उत्साह निर्माण करणारे सद्गुरु राजेंद्रदादा !

सद्गुरु राजेंद्रदादा म्हणजे आनंद, चैतन्य आणि उत्साह याचा सतत वाहणारा झरा आहे ! ते आश्रमातील भोजनकक्षात येतात, तेव्हा तेथील साधकांशी बोलून, हसून किंवा केवळ दृष्टीक्षेपानेसुद्धा साधकांना आनंद आणि चैतन्य देतात, तसेच त्यांच्यात उत्साह निर्माण करतात. त्यांच्या हास्यातून आनंदाचे प्रक्षेपण होत असते. त्यांना नुसते पाहिले, तरी साधकांना आध्यात्मिक त्रासाशी लढण्यासाठी बळ मिळते आणि साधनेची तळमळ वाढते.

२. आध्यात्मिक त्रास होत असतांना त्याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना सांगितल्यावर त्रास २० ते ३० टक्के न्यून होणे

तीव्र आध्यात्मिक त्रासामुळे अनेक वेळा माझी प्राणशक्ती अल्प असते, तसेच मला थकवा येणे, मळमळणे, डोकेदुखी आणि उलट्या होणे, असे त्रास होत असतात. अनेकदा सकाळी माझे शरीर जड झाल्याने मला उठता येत नाही. त्या वेळी माझ्या डोळ्यांवर इतकी ग्लानी असते की, प्रयत्न करूनही डोळे उघडता येत नाहीत. तेव्हा मी नामजपादी उपाय विचारण्यासाठी सद्गुरु दादांना भ्रमणभाष करून त्यांना आध्यात्मिक त्रासाविषयी सांगितल्यावर माझा त्रास २० ते ३० टक्के इतक्या प्रमाणात न्यून होतो. ‘त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करण्यासाठी तेच बळ देतात’, असे माझ्या लक्षात येते.

सौ. राधा साळोखे

३. अनेक औषधोपचार करूनही अर्धशिशीचा तीव्र त्रास न्यून न होणे, सद्गुरु राजेंद्रदादांनी वेगवेगळे प्रयोग करून नामजपादी उपाय करायला लावणे आणि त्या उपायांनी त्रास ८० टक्के उणावणे

मागील १३ वर्षांपासून मला अर्धशिशीचा तीव्र त्रास आहे. पूर्वी त्याची तीव्रता इतकी अधिक होती की, मला त्यासाठी आठवड्यातून २ वेळा २ इंजेक्शने घ्यावी लागायची. माझ्या अनेक प्रकारच्या तपासण्या केल्या होत्या; परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. माझ्यावर अनेक औषधोपचारही झाले; परंतु त्याचा तात्पुरता उपयोग व्हायचा. सद्गुरु राजेंद्रदादांनी मला होणार्‍या या त्रासावर वेगवेगळे प्रयोग करून मला वेगवेगळे नामजपादी उपाय करण्यास सांगितले. त्यांनी माझ्या या त्रासाचे मूळ स्थान शोधून त्या स्थानावर देवतेचे चित्र नियमितपणे लावायला सांगितले. त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे माझा डोकेदुखीचा त्रास ८० टक्के उणावला.

४. ‘अनावश्यक बोलणे’ या स्वभावदोषामुळे वेळ वाया जाऊन प्राणशक्ती न्यून होणे आणि सद्गुरु राजेंद्रदादांनी सांगितल्याप्रमाणे चिंतन अन् प्रयत्न केल्यावर प्राणशक्ती न्यून होण्याचे प्रमाण उणावणे

माझ्यातील ‘अनावश्यक बोलणे’ या स्वभावदोषामुळे माझ्याकडून वेळ वाया घालवण्याचा भाग होत असे. त्यामुळे त्रासदायक शक्तीचे आवरण वाढून माझा त्रास वाढत असे, तसेच माझी प्राणशक्तीही न्यून होत असे. सद्गुरु दादांनी ‘माझा वेळ कुठे वाया जातो ?’, याचे चिंतन करून हा स्वभावदोष घालवण्यासाठी मला प्रयत्न करायला सांगितले. त्यांनी मला वेळेचा १०० टक्के वापर करण्याचे ध्येय दिले आणि ‘त्यासाठी मी कसे प्रयत्न करणार ?’, याविषयी चिंतन करायला सांगितले. चिंतनामुळे मला प्रयत्नांची दिशा मिळाली. मी त्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर दिवसभरात माझी प्राणशक्ती न्यून होण्याचे प्रमाण उणावले. सद्गुरु राजेंद्रदादा एखादे सूत्र केवळ सांगत नाहीत, तर साधकांच्या अंतर्मनावर त्याचे महत्त्व बिंबवून प्रयत्नही करवून घेतात.

५. गुरुपौर्णिमेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे ध्येय साध्य न झाल्याने साधिकेला निराशा आल्यावर तिला योग्य ध्येय घेण्यास सांगून मनाला नव्याने उभारी देणारे सद्गुरु राजेंद्रदादा !

दोन वर्षांपूर्वीच्या गुरुपौर्णिमेला मी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे ध्येय ठरवले होते; परंतु हे ध्येय साध्य न झाल्याने मला पुष्कळ निराशा आली होती. तेव्हा सद्गुरु दादांनी जाणीव करून दिली की, मला तीव्र त्रास असल्यामुळे मी त्रास न्यून होण्यासाठी प्रयत्न करण्याचे ध्येय घेतले पाहिजे. त्यासाठी त्यांनी मला उपाय गुणात्मक रितीने करण्याचे, तसेच व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवण्याचे ध्येय घेण्यास सांगून माझ्या मनाला नव्याने उभारी दिली. त्यांनी सांगितलेल्या प्रयत्नांमुळे मी नव्याने साधनेच्या प्रयत्नांना आरंभ करू शकले.

कृतज्ञता

सद्गुरु राजेंद्रदादांनी आजपर्यंत मला अनेक प्रसंगांत सांभाळले, घडवले आणि पुढच्या टप्प्याला नेले. ‘त्यांनी मला किती शिकवले !’, हे शब्दांत सांगणे कठीण आहे. एवढ्या तीव्र त्रासांत मी केवळ आणि केवळ परात्पर गुरुदेव अन् सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या कृपेमुळेच जिवंत राहून साधना करू शकत आहे. त्याबद्दल त्या दोघांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. राधा रवींद्र साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.८.२०२१)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक