फेसबूकवर गणपति आणि डॉ. आंबेडकर यांचे आक्षेपार्ह चित्र ‘पोस्ट’ करणार्‍यावर ठाणे येथे गुन्हा नोंद !

  • धर्मांधांच्या श्रद्धास्थानांचा कुणी अनादर केलाच, तर ते जाळपोळ, दंगली घडवून राष्ट्रीय संपत्तीची हानी करतात. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यास मात्र  ते नेहमीच संयत् मार्गाने त्याला विरोध करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • अनेक वेळा हिंदूच त्यांच्या श्रद्धास्थानांचा अनादर करतांना दिसतात आणि अन्य हिंदू त्यावर हसतात. अशा धर्मभ्रष्ट हिंदूंचे संकट काळी भगवंताने तरी रक्षण का करावे, असे कुणा धर्मप्रेमी हिंदूला वाटल्यास त्यात चूक ते काय ? – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, १३ सप्टेंबर (वार्ता.) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शरीर आणि गणपतीचे शिर असे चित्र फेसबूकवर ‘पोस्ट’ करून ते प्रसारित करणार्‍यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (गणेशोत्सवाच्या कालावधीत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा केलेला हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक) या ‘पोस्ट’मुळे गणेशभक्त, तसेच डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी यांकडून संताप व्यक्त होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्राला गणपतीचा मुखवटा लावलेले चित्र जनार्दन केशव-आवाम नावाच्या व्यक्तीने फेसबूकवर ‘पोस्ट’ (प्रसारित) केले होते. त्याखाली ‘सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, मूर्तीकाराच्या कल्पकतेचे आणि कार्यकर्त्यांच्या संकल्पनेचे कौतुक, फारच आनंदी चित्र’, असा संदेश लिहिण्यात आला होता. या ‘पोस्ट’मुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी जनार्दन केशव-आवाम यांना ही ‘पोस्ट’ डिलीट करण्याची (काढून टाकण्याची) विनंती केली होती; मात्र आवाम यांनी ही ‘पोस्ट’ काढली नाही. त्यामुळे शास्त्रीनगर येथील उमेश इंदिसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. या प्रकरणी राजाभाऊ चव्हाण नावाच्या व्यक्तीनेही नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

ठाणे शहरात हिंदूंच्या देवतांच्या विडंबनाच्या घटना वाढत असल्याने हिंदूंमध्ये संतापाची लाट !

काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी श्री गणेशाची पोलिसाच्या वेशातील प्रतिकृती ठाणे येथील जांभळीनाका भागात असलेल्या बाजारपेठेतील रस्त्यावर ठेवल्याचा संतापजनक प्रकार केला होता. श्री गणेशाच्या प्रतिकृतीच्या हातात फलक ठेवण्यात आला होता. धर्माभिमानी हिंदूंनी पोलिसांना हे विडंबन असल्याचे सांगूनही त्यांनी त्यांची चूक न स्वीकारता ट्विटरद्वारे उद्दाम उत्तरे दिली होती. ठाणे शहरात वारंवार घडत असलेल्या विडंबनाच्या अशा प्रकारांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. हिंदूंमध्ये संतापाची लाट आहे. ‘संबंधितांवर कारवाई कधी होणार ?’ असा संतप्त प्रश्‍न नागरिकांकडून विचारला जात आहे.