नैसर्गिक जलस्रोतात गणेशमूर्तीचे विसर्जन केल्याने श्री गणेशाच्या मूर्तीत पूजनामुळे निर्माण झालेली पवित्रके सर्वदूर पसरतात आणि पर्यावरणासह अखिल मानवजातीला त्याचा लाभ होतो, असे शास्त्र आहे ! शिवाय गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे प्रदूषणही होत नसल्याचे प्रयोगशाळांत सिद्ध झाले आहे. – संपादक
मुंबई – नागपूर खंडपिठाने ‘नैसर्गिक ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये’, असे आदेश दिले आहेत. या आदेशांचे पालन केले जाईल. त्यासाठी मुंबईमधील कृत्रिम विसर्जनस्थळांची संख्या वाढवण्यात येईल. सोसायट्यांमध्ये विसर्जनाची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी दिली.
मुंबईतील प्रमुख विसर्जनस्थळांची सौ. पेडणेकर यांनी पाहणी करून कामांचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी त्या बोलत होत्या. पालिकेचे कर्मचारी विसर्जनासाठी येणार्या मूर्ती चौपाटीबाहेरच कृत्रिम तलावात विसर्जित करतील. विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी ५०० मीटरच्या अंतरावर कृत्रिम तलाव करणार आहोत.
‘कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जन करण्यावर नागरिकांनी भर द्यावा’, असे आवाहनही महापौरांनी गणेशभक्तांना केले आहे. त्यासमवेतच नैसर्गिक चौपाट्या ज्यांच्याजवळ आहेत, ती मंडळे, तसेच गणेभक्त यांनी महापालिकेच्या नियमाप्रमाणे त्यांची गणेशमूर्ती महापालिका कर्मचार्यांकडे सुपूर्द करावी. आपला विसर्जनाचा पाट, तसेच वाळू आपल्याला त्वरित देण्यात येईल; जेणेकरून विसर्जनस्थळ आपल्याला पटकन मोकळे करता येईल, असे आवाहनही महापौरांनी केले.