‘साधकांची प्रत्येक क्षणी साधना व्हावी’, असा ध्यास असलेले सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा उद्या भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी (१२.९.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सद्गुरु नंदकुमार जाधव आणि साधिका यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी त्यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. ‘साधकांकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न सातत्याने व्हावेत’, यासाठी त्यांचा पाठपुरावा घेणे

‘एकदा दिवाळीच्या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि मी रामनाथी आश्रमात एकत्र बसलो होतो. तेव्हा त्यांच्या समवेत देवद आश्रमातून आलेला एक साधक त्यांना काही विचारण्यासाठी त्यांच्याकडे आला. त्याच्याशी बोलून झाल्यावर सद्गुरु राजेंद्रदादांनी त्याला ‘स्वयंसूचनांची सत्रे वाढवली का ? व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढले का ?’, असे विचारले. नंतर अन्य साधक श्री. राजेंद्र दुसाने आणि श्री. वेदांत झरकर या दोघांनी मला सांगितले, ‘‘आमचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित व्हावेत’, यासाठी सद्गुरु राजेंद्रदादा आमचा पाठपुरावा सातत्याने घेतात.’’

२. साधकांशी सहज बोलतांनाही त्यांना साधनेच्या प्रयत्नांविषयी विचारून सजग करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

‘साधकांची साधना व्हावी’, असा सद्गुरु राजेंद्रदादांना ध्यास असतो. त्यामुळे साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याच्या व्यतिरिक्त अन्य वेळी त्यांची साधकांशी भेट झाली की, ते ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितल्यानुसार साधनेचे प्रयत्न होतात का ?’, हे साधकांना आवर्जून विचारतात. त्यामुळे साधकांच्या साधनेतील अडचणी लवकर सुटतात आणि त्यांना आणखी पुढचे प्रयत्न करणे शक्य होते. व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमुळे साधकांच्या मनावर ताण रहात नाही आणि त्यांना साधनेतून मिळणारा आनंदही घेता येतो.

या प्रसंगावरून ‘सद्गुरु राजेंद्रदादांचे साधकांच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांकडे सतत लक्ष असते’, असे मला जाणवले.

साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या आढावासेवकांनो, सद्गुरु राजेंद्रदादा करतात, तसे प्रयत्न तुम्ही सर्व जणही करू शकता ! ‘साधकांचे साधनेचे प्रयत्न वाढावेत’, असा ध्यास ठेवून त्यांचा पाठपुरावा घ्या आणि त्यांच्या अडचणी सोडवतांना त्यातून शिकून आनंद मिळवा !’

– (सद्गुरु) श्री. नंदकुमार जाधव, जळगाव (५.१२.२०२०)


सद्गुरु राजेंद्रदादा, आमच्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांचे एक रूप आहात तुम्ही ।

कु. वैभवी मंगेश झरकर
कु. दीपाली राजेंद्र माळी

सद्गुरु राजेंद्रदादा,

आमच्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांचे एक रूप आहात तुम्ही ।
सदैव लक्ष ठेवूनी सेवा परिपूर्ण करण्यास शिकवली तुम्ही ।। १ ।।

प्रत्येक चुकीतून अंतर्मुख कसे व्हायला शिकवले तुम्ही ।
संतसेवा देऊन आपण कृपा केली आम्हा जिवांवरी ।। २ ।।

परात्पर गुरु डॉक्टरांची प्रीती अनुभवण्यास दिली तुम्ही ।
वाढदिवसानिमित्त वंदन करतो आम्ही तुमच्या कोमल चरणांवरी ।। ३ ।।

– कु. दीपाली राजेंद्र माळी आणि कु. वैभवी मंगेश झरकर, (वय १६ वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.८.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक