राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गोव्यात आगमन आयएन्एस् हंस तळावर राज्यपालांकडून स्वागत

पणजी, ५ सप्टेंबर (वार्ता.) – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ५ सप्टेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता वायूसेनेच्या विशेष विमानाने दाबोळी येथे आयएन्एस् हंस तळावर आगमन झाले. या ठिकाणी राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत केले. या वेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आदींची उपस्थिती होती.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ५ सप्टेंबरपासून ३ दिवसांच्या गोवा भेटीवर आले आहेत. ६ सप्टेंबर या दिवशी आयएन्एस् हंस तळावर नौदलाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित रहाणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे राजभवन येथे वास्तव्य असणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दुपारी दाबोळी येथे आगमन झाल्यानंतर ते हेलिकॉप्टरने दोनापावला येथे पोचले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत होणार असल्याने दाबोळी विमानतळ परिसर ते झुआरीनगरपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी या परिसरातील दुकाने अन् इतर व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. यामुळे दुपारी २ वाजल्यापासून संपूर्ण महामार्गावर शुकशुकाट होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोनापावला येथे मार्गस्थ झाल्यानंतरच सर्व व्यवहार पूर्ववत् चालू करण्यात आले.