पणजी, ३ सप्टेंबर (वार्ता.) – अमली पदार्थांचा व्यापार करणार्या एका विदेशी नागरिकाविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस खात्यातील अमली पदार्थविरोधी विभागाने गोव्यात अमली पदार्थांची विक्री करण्यार्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पी.आय.टी. एन्.डी.पी.एस्. (प्रिव्हेन्शन ऑफ इलिसिट ट्रॅफिक इन नारकोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टान्स – अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक (मनावर परिणाम करणारी) औषधे यांच्या अवैध वाहतुकीस प्रतिबंध) कायदा लागू करण्याचा प्रस्ताव गृहखात्याकडे पाठवला आहे. या कायद्यानुसार अमली पदार्थांची विक्री करणार्या गुन्हेगारांना जामीन नाकारून एक वर्ष कारागृहात ठेवता येते, तसेच हा कालावधी २ वर्षांपर्यंत वाढवता येतो.
पकडण्यात आलेली अमली पदार्थांचा व्यापार करणारी विदेशी व्यक्ती आफ्रिकी देशांमधील असून अमली पदार्थ विक्रीविषयी ४ प्रकरणांमध्ये तिच्यावर तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त गोव्यात रहाण्याचा कालावधी उलटून गेलेला असतांना अवैधरित्या ही व्यक्ती गोव्यात वास्तव्य करत असून मारहाण करण्याच्या एका प्रकरणातही त्या विदेशी व्यक्तीचे नाव आहे.
यासंबधी अमली पदार्थ विरोधी विभागाचे पोलीस अधीक्षक महेश गावकर म्हणाले, ‘‘आम्ही हा कायदा लागू करण्याविषयीचा प्रस्ताव गृहखात्याकडे पाठवला आहे. हा कायदा कडक असल्याने अमली पदार्थांच्या विक्रीला आळा बसू शकतो. अमली पदार्थांची विक्री करणार्यांकडे लहान प्रमाणात अमली पदार्थ असतात. त्यामुळे पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांना सहजपणे जामीन मिळतो. जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा ते अमली पदार्थांचा व्यवहार करतात. पी.आय.टी.एन्.डी.पी.एस्. कायद्यानुसार अशा व्यक्तीला जामीन नाकारून १ किंवा २ वर्षांपर्यंत कारागृहात ठेवता येणे शक्य आहे.’’