१६ सहस्र लिटरपेक्षा अधिक पाणी वापरल्यास पूर्ण देयक लागू होईल ! – सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अधिसूचना प्रसारित

पणजी – प्रत्येक कुटुंबाला मासिक १६ सहस्र लिटर विनामूल्य पाणीपुरवठा करण्याची योजना १ सप्टेंबरपासून चालू करण्यात आली; मात्र १६ सहस्र लिटरपेक्षा अधिक पाणी वापरल्यास पूर्ण देयक भरावे लागणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रसारित केलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील ४७ टक्के म्हणजे १ लाख ४१ सहस्र कुटुंबांना या योजनेचा तात्काळ लाभ मिळणार आहे. राज्यात एकूण ३ लाख नळजोडण्या आहेत. त्यांपैकी १ लाख ४१ सहस्र ग्राहक १६ सहस्र लिटरपेक्षा अल्प पाण्याचा वापर करतात. त्यामुळे या ग्राहकांना विनामूल्य पाणी मिळणार आहे; मात्र त्यापेक्षा अधिक वापर करणार्‍या कुटुंबांना निश्चित केलेल्या दरानुसार पूर्ण देयक भरावे लागणार आहे. या योजनेमुळे खात्याच्या महसुलावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती खात्याचे अभियंते संतोष म्हापणे यांनी दिली आहे.

अल्प पाणी वापरा आणि लाभ मिळवा ! – दीपक पाऊसकर

जी कुटुंबे सलग २-३ मास प्रतिमास १६ सहस्र लिटरपेक्षा अल्प पाणी वापरतील त्यांची प्रलंबित देयके माफ करण्याचा प्रस्ताव मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर ठेवला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी दिली. गोव्याची लोकसंख्या सध्या सुमारे १९ लाख इतकी आहे. या लोकसंख्येसाठी प्रतिमास ६०० एम्एल्डी पाणी लागते; परंतु सध्या ५३० एम्एल्डी पाणीपुरवठा करणे शक्य होते. उर्वरित

७० एम्एल्डी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सरकारने काणकोण, चांदेल, पर्वरी, तुये आणि गुळेली येथील नियोजित पाणीप्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना संमती दिली आहे. फेब्रुवारी २०२२ पर्यंत सर्वच ठिकाणचे प्रकल्प चालू होऊन राज्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपेल, असा दावा दीपक पाऊसकर यांनी केला आहे.