५.७.२०२१ या दिवशी पुणे येथील सौ. पूजा श्रीधर रेळेकर (वय २८ वर्षे) यांचे निधन झाले. २.९.२०२१ या दिवशी त्यांचे द्वितीय मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांची आई आणि साधक यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्या आजारपणाच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि निधनानंतर त्यांच्या आईला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
सौ. पूनम प्रकाश होमकर (आई), पुणे
१. लहानपणी आईच्या समवेत सत्संगाला जाणे
‘मी २० वर्षांपूर्वी सनातनच्या सत्संगाला जाऊ लागले. तेव्हा मला सत्संगासाठी दूरवर जावे लागायचे. तेव्हा पूजा ८ – ९ वर्षांची होती. तीही माझ्यासह सत्संगाला येत असे.
२. सेवेची आवड
पूजाचे शिक्षण चालू असतांना ती प्रासंगिक सेवांमध्ये सहभागी होत असे. ‘दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे अंक अन् सात्त्विक उत्पादने यांचे वितरण करणे, कधी कधी ग्रंथप्रदर्शनावर सेवा करणे’ इत्यादी सेवा पूजा करत होती. तिचा प्रत्येक सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न असे.
३. तिचे वडील (श्री. प्रकाश किसन होमकर) नोकरीनिमित्त बाहेरगावी असतांना पूजा घरातील आणि बाहेरच्या सेवा करत असे. त्यामुळे आम्हाला तिचा मोठा आधार वाटत असे.
४. पूजामध्ये ‘नीटनेटकेपणा, प्रामाणिकपणा, मोठ्यांचा आदर करणे आणि इतरांचा विचार करणे’, हे गुण होते.
५. सौ. पूजा यांचे शेवटचे आजारपण
५ अ. सौ. पूजा यांच्या विवाहानंतर त्यांना मूत्रपिंडाचा (किडनीचा) आजार असल्याचे निदान होणे आणि थोडे बरे वाटल्यावर त्यांनी तत्परतेने सेवा करणे : परात्पर गुरु डॉ. आठवले आणि कुलदेवता यांच्या कृपेने तिचा विवाह इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील साधकाशी (श्री. श्रीधर रेळेकर यांच्याशी) झाला. तिचे यजमान श्री. रेळेकर पुणे येथे नोकरी करत असल्याने ती यजमानांसह पुण्यात रहात होती. विवाहानंतर दीड वर्षातच ती रुग्णाईत झाली. १.२.२०१८ या दिवसापासून तिला आजाराची लक्षणे दिसू लागली. तिचा तोंडवळा आणि पाय यांवर सूज आली. तेव्हा तिला मूत्रपिंडाचा (किडनीचा) आजार असल्याचे निदान झाले. पूजावर ३ वर्षे औषधोपचार चालू होते. तिला थोडे बरे वाटल्यावर ती तत्परतेने यजमानांसह साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे आणणे आणि पोचवणे’, या सेवा करत होती. पुणे येथील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे १७.६.२०२० या दिवशी ती यजमानांसह तिच्या सासरी इचलकरंजी येथे गेली.
५ आ. सौ. पूजा रुग्णाईत असतांना त्यांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांचा सत्संग लाभणे
५ आ १. प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्त सौ. मीना भोसले यांनी सौ. पूजा यांना ‘स्तवनमंजिरी’ आणि ‘संत भक्तराज विचरित भजनामृत’ हे ग्रंथ वाचायला देणे : नोव्हेंबर २०२० मध्ये आम्ही सौ. पूजा हिला माहेरी आणणार होतो; पण त्या काळात पुण्यात कोरोनाची स्थिती भयंकर असल्याने तिला आमचा पुतण्या श्री. ओंकार जयकुमार होमकर याच्या घरी सांगली येथे आणले. तेथे तिला प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त श्री. दिलीप भोसले (श्री. तात्या भोसले) आणि त्यांची पत्नी सौ. मीनाताई भोसले यांचा सत्संग लाभला. (श्री. तात्या भोसले यांच्याकडे प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुका येतात आणि भंडारा असतो.) मीनाताईंनी पूजाला ‘स्तवनमंजिरी’ (हा लघुग्रंथ प.पू. भक्तराज महाराज यांचे सर्व भक्त प्रतिदिन वाचतात.) आणि ‘संत भक्तराज विचरित भजनामृत’ हे ग्रंथ वाचायला दिले.
५ आ २. श्री. तात्या भोसले यांनी सौ. पूजा यांना ‘गुरूंवरील श्रद्धा कशी असायला हवी ?’, हे अनुभूतीतून सांगणे : १६.११.२०२० ते १.१.२०२१ या काळात पूजा सांगली येथे होती. तेव्हा श्री. तात्या भोसले प्रत्येक ३ – ४ दिवसांनी माझ्या पुतण्याच्या घरी यायचे आणि पूजाशी बोलायचे. तेव्हा ते स्वतःच्या अनुभूती सांगून ‘गुरूंवरील श्रद्धा कशी असायला हवी ?’, हे तिला सांगायचे.
५ आ ३. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने झाल्यानंतर म्हणत असलेली ‘जरी भोग प्रारब्ध पूर्वांतरीचे ।’ ही प्रार्थना मीनाताईंनी पूजाला म्हणायला सांगितली होती.
५ आ ४. नंतर ती पुन्हा इचलकरंजी येथे आली. तिला प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांच्या लाभलेल्या सत्संगामुळे तिची गुरुदेवांवरील (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील) श्रद्धा वाढली होती. तिचे नामस्मरण होत होते.
५ आ ५. ती सूक्ष्मातून दत्तगुरूंचे चरण धरून त्यांना पुष्कळ आळवत असे.
६. सौ. पूजा यांच्या निधनाच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना
सौ. पूजा यांच्यासाठी लाडू करायला घेतल्यावर रवा भाजतांना तो पूर्ण करपणे आणि त्या वेळी ‘काहीतरी अशुभ घडणार’, असे वाटणे : ५.७.२०२१ या दिवशी आम्ही इचलकरंजी येथे पूजाला भेटायला जाणार होतो. मी तिच्यासाठी लाडू करायला घेतले होते. तेव्हा रवा भाजतांना तो पूर्ण करपला. त्या वेळीच ‘काहीतरी अशुभ घडणार’, असे मला वाटले. तेव्हा मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘योग्य-अयोग्य तुम्हीच ठरवा. तुम्हीच सर्वकाही करणार आहात. पूजाचे जे काही भोग आहेत, ते भोगून संपू दे.’
७. सौ. पूजा यांचे निधन
५.७.२०२१ या दिवशी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) कृपेने पूजाच्या कोरोना चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला. नंतर आम्ही तिच्या अन्य वैद्यकीय चाचण्या करणार होतो; परंतु तिचे निधन झाले.
८. सौ. पूजा यांच्या निधनानंतर आलेल्या अनुभूती
८ अ. मुलीच्या निधनानंतर चौथ्या दिवसापासून गुरुपौर्णिमेच्या सेवा करू लागल्याने स्थिर आणि सकारात्मक रहाता येणे : पूजाच्या निधनानंतर ३ दिवसांनी मी पुणे येथे आले आणि दुसर्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या प्रसाराच्या निमित्ताने मी ‘सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, अर्पण गोळा करणे’, या सेवा केल्याने माझ्या मनाला स्थिरता आली आणि मला सकारात्मक रहाता आले. नंतर तिच्या निधनानंतरच्या अन्य विधींसाठी आम्ही पुन्हा इचलकरंजी येथे जाऊन १२ व्या दिवसानंतर पुण्यात आलो. तेव्हा गुरुपौर्णिमेला २ दिवसच शिल्लक होते. मी पुन्हा अर्पण गोळा करण्याची सेवा चालू केली. गुरुपौर्णिमा वर्षातून एकदाच असते. ‘मला त्या सेवेतील आनंद मिळावा’, यासाठी गुरुदेवांनी या सेवा माझ्याकडून करवून घेतल्या.
८ आ. पूजाच्या निधनानंतरच्या १० व्या दिवसाच्या विधीच्या वेळी पाऊस असूनही पिंडाला कावळा शिवला.
८ इ. सौ. पूजा यांच्या निधनानंतरच्या १२ व्या दिवशी दारात एक गाय अर्धा घंटा उभी रहाणे, तिच्या पाठीवरून हात फिरवल्यावर ‘ती बोलत आहे’, असे वाटणे आणि यावरून ‘माझी काळजी करू नका’, असे सौ. पूजा सांगत आहे’, असे जाणवणे : तिच्या निधनानंतरच्या १२ व्या दिवशी तिचा मोठा चुलत भाऊ ओंकार याच्या दारात गाय आली. ती अर्धा घंटा उभी होती. आम्ही (ओंकार, मी आणि माझे यजमान) झाडावरील पेरू काढून गायीला दिले. तेव्हा तिने ते खाल्ले. माझ्या यजमानांनी गायीच्या पाठीवरून हात फिरवल्यावर ‘ती त्यांच्याशी बोलत आहे’, असे मला वाटले. गायीने दारातच गोमूत्र विसर्जन केले. यावरून ‘माझी काळजी करू नका’, असे पूजा सांगत आहे’, असे आम्हाला जाणवले. त्या वेळी मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
९. कृतज्ञता
‘या कठीण प्रसंगात परात्पर गुरु डॉक्टरांनीच मला स्थिर ठेवले आणि अनुभूती देऊन सेवेतील आनंदही दिला’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’ (२७.८.२०२१)
सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आणि सौ. राधा अशोक सोनवणे (साधिका), पुणे
१. सेवेची तळमळ
‘सौ. पूजाताईला आम्ही १० वर्षांपासून ओळखत आहोत. ताई महाविद्यालयात शिकत असतांना प्रासंगिक सेवांत सहभागी होत असे. ताईचा विवाह झाल्यावर काही कालावधीनंतर तिचे आजारपण चालू झाले. त्या काळातही तिचा सेवेत सहभाग असे. ताईने आजारपणातही आकाशकंदील बनवण्याची सेवा तळमळीने, परिपूर्ण आणि भावपूर्ण केली.
२. ताई एवढ्या लहान वयात आजारपणाला धिराने तोंड देत होती.’ (२७.८.२०२१)
मुलीच्या निधनानंतर स्थिर राहून तळमळीने व्यष्टी आणि साधना करणार्या पुणे येथील सौ. पूनम प्रकाश होमकर !१. मुलीच्या निधनानंतरही स्थिर असणे ‘सौ. पूजा रेळेकर यांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर मी अस्थिर झाले. त्या वेळी मला काही वेळ सुचेनासे झाले होते. मी सौ. होमकरकाकूंना ((कै.) पूजाच्या आईला) भ्रमणभाष केला. तेव्हा त्या पूजाच्या सासरी जाण्यासाठी प्रवास करत होत्या. मुलीचे निधन झाल्याचे समजल्यानंतरही त्या माझ्याशी स्थिरतेने बोलत होत्या. ‘परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धेच्या बळावर अत्यंत कठीण प्रसंगाला काकू सामोरे गेल्या’, असे मला वाटले. ‘गुरुदेवांनीच त्यांना शक्ती दिली’, याबद्दल मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. २. मुलीच्या निधनानंतर लगेचच सेवेला आरंभ करणे त्याच कालावधीत आकाशकंदिलांची मागणी घेण्याची सेवा चालू होती. काकूंच्या मुलीचे निधन होऊन चारच दिवस झाले असल्याने मी काकूंना विचारले, ‘‘या वर्षीही तुम्हाला सेवा दिली, तर चालेल का ?’’ तेव्हा त्या लगेच ‘हो’ म्हणाल्या. त्या सत्संगाला उपस्थित राहू लागल्या, तसेच त्यांनी आकाशकंदिलांच्या मागणीच्या नोंदी करण्याची सेवा चालू केली. त्यांनी गुरुपौर्णिमेची सेवाही तळमळीने आणि भावपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ३. मी काकूंच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेते. ‘काकूंची स्वतःला पालटण्याची तळमळ वाढत आहे’, असे मला जाणवले. काकूंकडून ‘गुरुदेवांवरील श्रद्धा कशी असावी ?’, हे गुरुकृपेमुळे मला शिकता आले’, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ – सौ. राधा सोनवणे, पुणे (२७.८.२०२१) |
|