कपिलेश्वरी, फोंडा येथे युवतीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी वरभाट, कवळे येथील युवक पोलिसांच्या कह्यात

तक्रार नोंदवण्यात येऊनही आणि घटनेला २४ घंटे उलटूनही संशयिताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला नव्हता !

असे पोलीस काय कामाचे ? गृहमंत्रीपद सांभाळणार्‍या मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी ! – संपादक

फोंडा, २८ ऑगस्ट (वार्ता.) – कपिलेश्वरी येथे युवतीने दुचाकीवर बसून जाण्यास नकार दिल्याने विनयभंग करण्यासमवेत तिला घायाळ करणारा वरभाट, कवळे येथील संशयित युवक ओंकार धनंजय कवळेकर याला फोंडा पोलिसांनी २८ ऑगस्ट या दिवशी कह्यात घेतले आहे. ही घटना २६ ऑगस्ट या दिवशी कपिलेश्वरी येथे दुपारी ३ वाजता घडली होती.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित युवती कपिलेश्वरी येथे बसस्थानकावर बसची वाट पहात उभी होती. या वेळी संशयित ओंकार याने युवतीला त्याच्या दुचाकीवर बसवून नेण्यासाठी दुचाकी तिच्या समोर थांबवली; मात्र युवतीने यास नकार देऊन ती भावाकडे साहाय्य मागण्यासाठी घरी परतू लागली. संशयित युवकाने काही अंतर पुढे गेल्यावर माघारी येऊन युवतीला धक्का देऊन तिला रस्त्यावर पाडले. त्यानंतर युवतीला घायाळ अवस्थेत फोंडा येथील ‘आय.डी.’ रुग्णालयात भरती करण्यात आले. या वेळी संशयित ओंकार याने दुचाकी घटनास्थळी सोडून तेथून पलायन केले. या प्रकरणी संशयित युवकाच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात येऊनही आणि घटनेला २४ घंटे उलटूनही संशयिताच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. पीडित युवतीचे पालक  न्याय मिळावा यासाठी फोंडा पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्याने अखेर पोलिसांनी संशयिताच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम ३५४, ३२३ अंतर्गत गुन्हा नोंद केला. (सामान्य नागरिकांना गुन्हा नोंद व्हावा, यासाठी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसावे लागणे दुर्दैवी ! – संपादक) संशयित युवकाला २८ ऑगस्ट या दिवशी कह्यात घेण्यात आले. संशयित युवक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या दाग, फोंडा येथील विभागात कामाला आहे.