संपर्कयंत्रणा पूर्ववत् करण्यात जिल्हा प्रशासनाचे अपयश
सातारा, २५ ऑगस्ट (वार्ता.) – २२ जुलै या दिवशी महाबळेश्वर तालुक्यात अतीवृष्टी झाली होती. यामुळे अनेक गावांचे संपर्क तुटले होते; मात्र अजूनही काही गावांचे संपर्क पूर्ववत् झालेले नाहीत. महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी या गावातील एका रुग्णावर उपचाराअभावी डालग्यातच (कोंबड्या कोंडण्यासाठी वेतापासून बनवलेली एक मोठी जाळी) प्राण त्यागण्याची वेळ आली. अतीवृष्टीनंतर संपर्कयंत्रणा पूर्ववत् करण्यात आलेल्या अपयशामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
खरोशी गावातील रामचंद्र कदम हे आजारी होते. त्यांना महाबळेश्वर येथे नेण्यासाठी २-३ रस्ते आहेत; मात्र २२ जुलै या दिवशी झालेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून हे गाव अद्याप संपर्काच्या बाहेर आहे. या गावात प्रशासनाचा एकही अधिकारी आलेला नसल्यामुळे ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी अजूनही रस्ता झालेला नाही. कदम यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना आधुनिक वैद्यांकडे नेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कदम यांना महाबळेश्वरला नेण्यासाठी ग्रामस्थांचा स्पीड बोट मागवण्याचा विचार झाला; मात्र भ्रमणभाषला नेटवर्क नसल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे २ घंटे पायी प्रवास करत त्यांना शेजारील रेनोशी गावापर्यंत डालग्यात घालून आणावे लागले. तेथे लॉन्च मागवण्यात आली; मात्र तोपर्यंत कदम यांचा मृत्यू झाला होता.