उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते कल्याण सिंह यांचे २१ ऑगस्टच्या रात्री येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कल्याण सिंह गेल्या मासापासून उपचारार्थ रुग्णालयात भरती होते. कल्याण सिंह उत्तरप्रदेशचे २ वेळा मुख्यमंत्री राहिले होते. त्यांच्याकडे राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचे राज्यपालपदाचे दायित्वही होते. अयोध्येतील श्रीराममंदिर आंदोलनातील ते भाजपचे एक प्रमुख नेते होते. ते मुख्यमंत्री असतांना कारसेवकांनी बाबरीचा ढाचा पाडला होता. कल्याण सिंह यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. २३ ऑगस्ट या दिवशी राज्यातील नरोरो येथे गंगानदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. २३ ऑगस्ट या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असेल, तसेच ३ दिवसांचा दुखवटा पाळण्यात येईल, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.