देवद आश्रमातील पू. शिवाजी वटकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसारच्या साधनेतील व्यष्टी आढाव्याचे जाणवलेले महत्त्व आणि शिकायला मिळालेली सूत्रे

साधनेला आरंभ केल्यापासून ते संतपद गाठल्यानंतरही ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्याचे महत्त्व किती आहे ?’ ते पू. शिवाजी वटकर यांनी स्वतः अनुभवले. हा लेख वाचून साधनेतील ‘व्यष्टी आढाव्याचे महत्त्व’ प्रकर्षाने लक्षात येते.

(भाग १)

पू. शिवाजी वटकर

१. ‘साधक साधनेत कुठे न्यून पडतो ?’, हे लक्षात येण्यासाठी व्यष्टी आढाव्याचे मोलाचे साहाय्य होत असणे

‘मागील २५ वर्षांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गानुसार साधना करण्याचे भाग्य मला लाभले. त्यामध्ये ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून व्यष्टी साधनेचा आढावा देणे’, हा महत्त्वाचा घटक आहे. त्यानुसार ‘मी साधनेत कुठे न्यून पडतो ?’ याविषयी व्यष्टी आढावा घेणार्‍या उत्तरदायी साधकांना विचारून आणि त्यांचे मार्गदर्शन घेऊन साधना करत आहे.

२. साधनेत सातत्य न राहिल्यास स्वभावदोष आणि अहं वाढून साधनेत घसरण होत असणे, यासाठी सातत्याने व्यष्टी साधना करून तिचा आढावा देणे महत्त्वाचे असणे

‘सर्वसाधारण व्यक्ती ते जिज्ञासू आणि साधक ते संत’, असे साधनेतील प्रगतीचे टप्पे गाठण्यासाठी मला व्यष्टी आढाव्याचे मोलाचे साहाय्य झाले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने लाभलेल्या व्यष्टी आढाव्यामुळे मला संतपदापर्यंत पोचता आले. समाजामध्ये सहस्रो संत आढळतात. काहीजण साधना करून संतपदाला पोचलेले असतात, तर काहीजण स्वयंघोषित संत असतात. साधनेत सातत्य नसल्यास स्वभावदोष आणि अहं वाढून काही जणांची साधनेत घसरण होते. आपण समाजामध्ये त्याची उदाहरणे पहातो. हे धोके टाळण्यासाठी ‘संतपदाला पोचल्यावरही व्यष्टी साधना गांभीर्याने करणे आणि व्यष्टी आढावा देणे महत्त्वाचे आहे’, असे मला वाटते.

३. स्वभावदोषांमुळे पातळी घसरणे, व्यष्टी आढावा घेणार्‍या साधकांनी केलेल्या साहाय्यामुळे केवळ ७० दिवसांत पुन्हा ६१ टक्के पातळी गाठू शकणे आणि पुढेही त्यांच्याच साहाय्यामुळे संतपदही प्राप्त होणे

वर्ष २००८ मध्ये गुरुकृपेने ६० टक्के आध्यात्मिक पातळीचा टप्पा गाठण्यास मला व्यष्टी आढाव्याचे साहाय्य झाले होते. त्यानंतर माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे माझे व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे वर्ष २०१० मध्ये माझी साधनेत ११ टक्क्यांनी घसरण झाली. त्या वेळी व्यष्टी आढावा घेणार्‍या उत्तरदायी साधकांनी मला साहाय्य करून त्यातून बाहेर काढून ७० दिवसांत गुरुकृपेने पुन्हा ६१ टक्के पातळीला नेले. त्यानंतर वर्ष २०१९ मध्ये व्यष्टी आढावा आणि साधकांचे साहाय्य यांमुळे गुरुकृपेने मला संत म्हणून घोषित केले गेले.

४. संत झाल्यावरही गुरुकृपेने व्यष्टी आढावा चालू राहिल्यामुळे ‘साधनेत पुढे जाण्याची संधी मिळाली’, असे वाटून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त होणे

संतपदाला पोचल्यावर ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यास मला कसे साहाय्य मिळणार ? मला आणखी ३० टक्के प्रगती करायची आहे’, या विवंचनेत मी होतो. गुरुकृपेने ऑगस्ट २०१९ मध्ये देवद आश्रमातील संतांच्या साप्ताहिक आढावा सत्संगात बसण्याचे आणि व्यष्टी आढावा देऊन मार्गदर्शन घेण्याचे भाग्य मला लाभले. यावरून ‘परात्पर गुरु डॉक्टर मला साधनेत प्रत्येक टप्प्याला पुढे जाण्यासाठी कसे साहाय्य करत आहेत ? संतपदासारखा टप्पा गाठल्यानंतरही पुढची प्रगती करवून घेत आहेत’, याची जाणीव झाली.

५. केवळ सनातन संस्थेमध्येच प्रत्येक साधकाला साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले जाणे आणि सहस्रो साधकांना मार्गदर्शन करून त्यांची साधनेत प्रगती करवून घेणारे परात्पर गुरु डॉक्टर !

प्रत्येकच साधकाला साहाय्य करण्यासाठी सर्वच स्तरांवर व्यष्टी साधनेचा आढावा घेतला जातो आणि योग्य मार्गदर्शनही केले जाते. अशा प्रकारे ‘साधकांची साधना करवून घेणे’, हे केवळ सनातन संस्थेमध्येच मला पहायला आणि शिकायला मिळाले. माझा इतर संप्रदाय, संघटना किंवा आध्यात्मिक संस्थांशी संपर्क आला; मात्र तेथे अशा प्रकारची साधनेची सुविधा मला पहायला मिळाली नाही. तेथील गुरु किंवा अधिकारी व्यक्ती १ – २ शिष्यांची साधना योग्य प्रकारे करवून घेतात; मात्र ‘जगभरातील सहस्रो साधकांकडून साधकाच्या पातळीनुसार पुढील टप्प्याची साधना करवून घेऊन त्याची साधनेत प्रगती करवून घेणारे परात्पर गुरु डॉक्टर हे एकमेवाद्वितीय आहेत’, असे मला वाटते.

६. आपल्यामध्ये असणारे स्वभावदोष आणि अहं यांमुळे आपल्याकडून चुका होत असणे आणि त्यामुळे साधना व्यय होत असणे, यासाठी साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन आवश्यक असणे

आपल्यामध्ये अनेक जन्मांचे अनंत संस्कार असतात. आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे साधना करतांना आपले स्वभावदोष आणि अहं यांचे प्रकटीकरण होऊन आपल्याकडून चुका होतात; म्हणून साधनेच्या प्रत्येक टप्प्याला व्यष्टी आढावा देऊन मार्गदर्शन घेणे अपरिहार्य आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी शोधलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गानुसार केल्या जाणार्‍या अष्टांग साधनेत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेला ६० टक्के महत्त्व दिले आहे. याविषयी सर्वसाधारणपणे २५ वर्षांपूर्वीच्या साधनेविषयीच्या ‘शंकानिरसन’ या ध्वनीफितीत परात्पर गुरु डॉक्टर यांनी पुढील मार्गदर्शन केले आहे.

६ अ. व्यावहारिक जीवनात आपण एकदा एक पदवी मिळवली की, आपण आयुष्यभर पदवीधर असतो; मात्र अध्यात्मात मोक्ष मिळेपर्यंत सतत साधना चालूच ठेवावी लागणे, नाहीतर लगेच घसरगुंडी होणे

साधकाची शंका : आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने किती काळ साधना करावी ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले उत्तर

१. व्यावहारिक जीवनात आपण एकदा पदवीधर झालो, उदा. एकदा ‘बी.ए.’, ‘बी. कॉम्.’, आधुनिक वैद्य किंवा अभियंता झालो की, आयुष्यभर ती पदवी आपल्या समवेत असते; पण अध्यात्मात तसे नाही. हे अध्यात्मातील एक महत्त्वाचे सूत्र आहे. एखादा आधुनिक वैद्य झाला की, त्याला ‘एम्.बी.बी. एस्.’चे प्रमाणपत्र मिळते. त्यानंतर त्याने पुढे आयुष्यभरात एकही वैद्यकीय पुस्तक वाचले नाही, तरी तो आयुष्यभर आधुनिक वैद्यच असतो; परंतु अध्यात्मात तसे नाही. आयुष्यभर तुम्हाला साधना करतच रहावी लागणार आहे, तरच तुम्ही तेथे टिकून रहाणार आहात.

२. साधनेत गुरुपदाला ७० टक्के आध्यात्मिक पातळी असते, सद्गुरुपद ८० टक्के पातळीला प्राप्त होते, तर परात्पर गुरुपद म्हणजे ९० टक्क्यांच्या पुढे पातळी असते. तुम्ही नुसतेच गुरुपद किंवा संतपद, म्हणजे ७० टक्के पातळीला असला, तरी परत घसरू शकता. सातत्याने साधना करतच पुढे जावे लागते.

३. ‘भले तुम्ही एकदा संतपदाला पोचलात आणि साधना नीट चालू ठेवली नाही, तर तेथून लगेच घसरगुंडी होते’, हे नेहमी लक्षात ठेवा. एखाद्या डोंगराचा कडा असला आणि तुम्ही अर्धवट वर चढून आलात, तर परत घसरू शकाल; मात्र ज्या वेळी तुम्ही शिखरावरील पठारावर जाता, तेव्हा तुम्ही घसरणार नाही; म्हणून जोपर्यंत तुम्ही परात्पर गुरु पदाला, म्हणजे मोक्षपदाला जात नाही, तोपर्यंत घसरण असू शकते; म्हणून आपण परात्पर गुरुपदापर्यंत पोचत नाही, तोपर्यंत साधना केलीच पाहिजे.

२५ वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांनी जे सांगितले, ते आम्हा साधकांकडून ते सातत्याने करवूनही घेत आहेत. आपत्काळातही साधनेचा आनंद देऊन प्रगतीही करवून घेत आहेत. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

(क्रमशः उद्याच्या अंकी)

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.३.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

भाग २ पहाण्यासाठी येथे क्लीक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/504374.html