देवद आश्रमातील पू. शिवाजी वटकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसारच्या साधनेतील व्यष्टी आढाव्याचे जाणवलेले महत्त्व आणि शिकायला मिळालेली सूत्रे

साधनेला आरंभ केल्यापासून ते संतपद गाठल्यानंतरही ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्याचे महत्त्व किती आहे ?’ ते पू. शिवाजी वटकर यांनी स्वतः अनुभवले. हा लेख वाचून साधनेतील ‘व्यष्टी आढाव्याचे महत्त्व’ प्रकर्षाने लक्षात येते. १९ ऑगस्ट या दिवशी या लेखातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

(भाग २)

पू. शिवाजी वटकर

भाग १ पहाण्यासाठी येथे क्लीक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/504112.html

७. देवद आश्रमातील संतांच्या ‘व्यष्टी आढावा’ सत्संगातून शिकायला मिळालेली सूत्रे आणि झालेले लाभ !

७ अ. अनेक ग्रंथ वाचून आणि प्रवचने ऐकून जे शिकायला मिळणार नाही, असे ज्ञान सत्संगांतून मिळणे : देवद आश्रमात प्रत्येक आठवड्याला संतांचा व्यष्टी साधनेचा आढावा होतो. या साप्ताहिक आढावा सत्संगात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. सद्गुरु राजेंद्र शिंदे (सद्गुरु राजेंद्रदादा) आणि पू. (सौ.) अश्विनी पवार हे संतांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. ते तत्त्वनिष्ठपणे संतांना मार्गदर्शन करून साधनेत मोलाचे साहाय्य करतात. त्यांनी दिलेल्या साधनेच्या दृष्टीकोनामुळे माझी व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली होण्यास साहाय्य होते. या व्यष्टी आढाव्यामुळे आठवडाभर साधनेचे प्रयत्न करण्यास प्रोत्साहन मिळते. या सत्संगांत मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि झालेला लाभ मी कृतज्ञताभावाने गुरुचरणी अर्पण करत आहे.

१. या सत्संगांत आठवडाभरात माझ्याकडून झालेल्या चुका सांगितल्या जात असल्यामुळे मन मोकळे होते आणि चुकांविषयी खंत वाटून प्रायश्चित घेतल्याने पापक्षालन होते. ‘त्या चुका कोणत्या स्वभावदोष किंवा अहंच्या पैलूंमुळे झाल्या ?’, हे मला शिकायला मिळते. ‘स्वयंसूचना घेणे, भावजागृतीचे प्रयत्न वाढवणे, गुणवृद्धी करणे, स्वभावदोषांवर मात करण्यासाठी कृती, मन आणि भाव या तीनही स्तरांवर प्रयत्न करणे’ हे शिकायला मिळालेच, त्या समवेत ‘ते प्रयत्न कसे करायचे ?’ हेही शिकायला मिळाले.

२. संत समष्टीत राहून किंवा समष्टीचे उत्तरदायित्व घेऊन सेवा करतात. त्या सेवेत होणार्‍या चुका किंवा अडचणी ते या साप्ताहिक सत्संगात सांगून त्यावर सद्गुरु राजेंद्रदादांकडून मार्गदर्शन घेतात. त्यातून ‘समष्टी भाव, व्यापकत्व, इतरांना समजून घेणे, प्रीती, नेतृत्व इत्यादी गुण कसे वाढवायचे ?’, हे मला शिकता आले.

३. या सत्संगांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच संत मनमोकळेपणाने स्वतःच्या चुका सांगतात आणि सहसंतांच्या लक्षात आलेल्या चुका सांगून त्यांना साहाय्य करतात. एवढेच नाही, तर मार्गदर्शक संतही स्वतःच्या चुका सांगून ‘स्वतः कुठे न्यून पडलो ?’, हे सांगतात. त्यामुळे कित्येक ग्रंथ वाचून आणि प्रवचने ऐकून जे शिकायला मिळणार नाही, ते ज्ञान मला या सत्संगांतून मिळते.

७ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘पातळीनुसार साधना’ या तत्त्वानुसार ‘कोणत्या सूत्रांवर प्रयत्न करायचे ?’, हे शिकायला मिळणे

१. संत झाल्यावरही मी व्यष्टी साधनेचे काही प्रयत्न पूर्वीसारखेच करत होतो. त्यामध्ये माझा अनावश्यक वेळ जात होता. जसे नववीच्या वर्गातून उत्तीर्ण होऊन दहावीला गेल्यावरही मी नववीचाच अभ्यास करत होतो. ‘पुढच्या वर्गाचा अभ्यास कसा करावा ?’, हे मला या सत्संगांत शिकायला मिळाले. ‘मी साधनेसाठी करत असलेले प्रयत्न योग्य आहेत कि अयोग्य आहेत ?’, हे मला पडताळून पहाता येऊ लागले.

२. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘पातळीनुसार साधना करावी’, या साधनेच्या तत्त्वानुसार मला ‘पुढील टप्प्याची साधना कशी करायची ?’ याविषयी मार्गदर्शन मिळाले, उदा. भावजागृतीचे प्रयोग आणि प्रयत्न करण्यापेक्षा भावाच्या स्थितीत रहाणे, ‘साक्षीभावात राहून सर्व ईश्वरेच्छेने होत आहे’, याची सतत जाणीव ठेवणे, प्रसंग मानसिक स्तरावर हाताळण्याऐवजी आध्यात्मिक स्तरावर हाताळणे, समष्टी भाव वाढवणे, मनोलयाच्या टप्प्याच्या पुढे बुद्धीलयाच्या टप्प्याला जाण्याचा प्रयत्न करणे’, इत्यादी.

३. पुढच्या प्रगतीच्या दृष्टीने मला ‘वेळ कुठे वापरायला हवा ?’, हे कळले, उदा. अनावश्यक बोलणे टाळणे, अनावश्यक कृती किंवा चेष्टा-मस्करीमध्ये जाणारा वेळ आणि रज-तमात्मक कृती टाळणे, या दृष्टीने मी प्रयत्न चालू केले.

७ इ. सद्गुरु राजेंद्रदादांनी गुरुपौर्णिमेनंतर स्वतःच्या प्रगतीविषयी चिंतन करून आढाव्यात सांगायला सांगणे, सर्वांनी केलेल्या या चिंतनातून पुष्कळ शिकता येणे : वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेला सर्व साधक आणि संत यांची आध्यात्मिक पातळी अद्ययावत केली गेली. त्यातून वर्षभरात केलेल्या साधनेच्या प्रयत्नांची फलनिष्पत्ती कळली. सद्गुरु राजेंद्रदादा यांनी या प्रगतीविषयी देवद आश्रमातील सर्वच संतांना चिंतन करून साप्ताहिक सत्संगात सांगण्यास सांगितले होते. ‘स्वत:ची अपेक्षित प्रगती झाली नाही’, असे वाटते, तर ती कशामुळे झाली नाही ? किंवा प्रगती झाली, तर ती कोणते गुण आणि प्रयत्न यांमुळे झाली ?’, याचे चिंतन करून सत्संगात सांगायला सांगितले होते. सर्वांनी सांगितलेल्या चिंतनातूनही मला पुष्कळ शिकायला मिळाले. यातून मला ‘साधनेची गती वाढवण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत ?’, हे शिकता आले आणि पुढील वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेसाठी ध्येय ठरवता आले. त्यानुसार पुढील वर्षभर करायच्या साधनेच्या प्रयत्नांसाठी दिशा मिळाली.

७ ई. आढावा सत्संगामुळे ‘स्वतःकडून होणार्‍या छोट्या, मध्यम आणि गंभीर चुका कोणत्या स्वभावदोषांमुळे होतात ?’, हे शिकता येणे आणि त्यावर प्रयत्न करण्याची दिशा मिळणे : वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेनंतर सद्गुरु राजेंद्रदादांनी देवद आश्रमातील सर्व संतांना स्वत:च्या साधनेत येणार्‍या अडथळ्यांवर चिंतन करून येण्यास सांगितले. ‘स्वत:कडून होणार्‍या छोट्या चुका, मध्यम चुका आणि मोठ्या (गंभीर) चुका अन् त्यांच्याशी संबंधित स्वभावदोष’, यांविषयी अभ्यास करून आढाव्यात सांगण्यास सांगितले. त्या वेळी मला प्रामुख्याने माझ्यातील अल्पसंतुष्टता, कर्तेपणा घेणे, अपेक्षा करणे, मला अधिक कळते, परिस्थिती न स्वीकारणे, तारतम्याचा अभाव आणि विसराळूपणा, या प्रमुख स्वभावदोषांवर मात करण्यासाठी दिशा मिळाली अन् आता त्यावर मात करण्यासाठी गुरुकृपेने प्रयत्न होत आहेत.

७ ई १. ‘संतांच्या जीवनात काही व्यावहारिक अडचणी आल्यावर त्यावर मात करण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, ते शिकायला मिळणे : संतांच्या जीवनात व्यावहारिक प्रश्न आल्यावर किंवा प्रसंग घडल्यावर झालेल्या चुका सत्संगात सांगितल्या जातात. त्यात ‘आपण कुठे न्यून पडलो ? आणि आपले कुठले स्वभावदोष उफाळून आले ?’, हे सांगितले जाते. या सत्संगामध्ये ‘तो प्रसंग किंवा ती परिस्थिती का हाताळता आली नाही ?’, याचे चिंतन केले जाते. त्यात संतांच्या ‘स्वभावदोषांचा भाग किती ? आणि आध्यात्मिक त्रासाचा भाग किती ?’, हे पहायला सांगितले जाते. त्यानुसार ‘कोणते आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायचे ?’, हे सुचवले जाते. ‘प्रसंग किंवा परिस्थिती कशीही असली, तरी आपल्याला स्थिर रहाता आले पाहिजे. भगवंताचे नियोजन किंवा ईश्वरेच्छा काय आहे ?’, हे समजून घेता आले पाहिजे. ‘हे कसे साध्य करायचे ?’, यावर सद्गुरु राजेंद्रदादा मार्गदर्शन करतात.

७ ई २. ‘वयानुसार विस्मरण होते’, हे स्वीकारून महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवण्याची सवय लावून घेणे : आता माझे वय ७३ वर्षे आहे. मला काही गोष्टींचे विस्मरण होते. आढावा सत्संगामुळे ‘वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती अल्प होणे, हे नैसर्गिक आहे’, हे वास्तव मला स्वीकारता आले. त्यासाठी तत्त्वज्ञानाची भूमिका घेतली. त्याचप्रमाणे वेळच्या-वेळी आणि जागच्या-जागी वस्तू ठेवण्याची सवय लावली. जे लक्षात रहात नाही, ते विषयवार लिहून ठेवले.

७ उ. संतांकडून समाज आणि साधक शिकत असल्यामुळे संतांचे वागणे नेहमी आदर्शच असायला हवे !

१. गुरुकृपेने साधना करून साधक संतपदाला पोचल्यावर समाज आणि साधक त्यांच्याकडे ‘एक आदर्श उदाहरण’ या दृष्टीने पहातात आणि त्यांच्या वागण्या-बोलण्यातून शिकण्याचा प्रयत्न करतात. संतांच्या वागण्या-बोलण्याचा परिणाम इतरांवर अधिक प्रमाणात होत असल्यामुळे संतांनी नेहमी सतर्क राहून काळजीपूर्वकच वागले पाहिजे. (संतांचे वागण्ो-बोलण्ो बहुधा काळजीपूर्वकच असते.)

२. काही वेळा ‘अपेक्षा करणे’ या संतपदावरील व्यक्तीतील अहंच्या पैलूमुळे ‘कुटुंबियांनीही साधनेचे प्रयत्न करावेत’, असे त्यांना वाटते.

३. भावनेच्या भरात दुसर्‍यांना अनावश्यक समुपदेश (मार्गदर्शन) केल्याने संतांचा ‘सूक्ष्म अहं’ जागृत होतो आणि साधकांना भावनेच्या भरात सांगितलेली साधना पेलवली नाही, तर त्यांना निराशा येऊन त्यांची साधनेत हानी होते.

४. एखाद्याशी अध्यात्मिक स्तरावर आणि साधनेला साहाय्य म्हणून बोलले, तर त्या व्यक्तीला साहाय्य होते; मात्र संत असतांनाही एखाद्याशी अयोग्य बोललो, वागलो किंवा कृती केली, तर दुसर्‍या व्यक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याला ताण येऊन तो निराशेतही जाऊ शकतो आणि त्याचे पाप संतांना लागते.

माझ्याकडून झालेल्या काही चुकांमधून या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. मी त्या चुका व्यष्टी आढावा सत्संगात सांगितल्यामुळे मला मार्गदर्शन मिळाले आणि त्यानुसार गुरुकृपेने प्रयत्नही करता आले.

७ ऊ. संतांच्या सत्संगामध्ये चिंतनाचा विषय देणे आणि पुढील आढावा सत्संगात त्यावर चिंतन करून येण्यासाठी सांगणे : संतांच्या आढावा सत्संगामध्ये चिंतनाचा एखादा विषय देऊन किंवा दैनिकात प्रकाशित झालेल्या एखाद्या लेखाविषयी चिंतन करून त्यातून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यानुसार स्वतः केलेले प्रयत्न याविषयीचा आढावा सत्संगात घेतला जातो.

१. दिनांक ९.९.२०१९ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधनेविषयी केलेले अमृततुल्य मार्गदर्शन’ हा लेख प्रकाशित झाला होता. ‘या लेखातून काय शिकायला मिळाले ? आणि स्वतः त्यानुसार काय प्रयत्न केले ?’ याविषयी सत्संगात चिंतन करून येण्यास सांगितले होते. त्यानुसार सर्व संतांनी ‘स्वतः काय प्रयत्न केले ?’, हे सांगितले. त्या चिंतनातून ‘चिंतन कसे करावे ? प्रयत्न कसे करायला हवेत ?’, हे मला शिकायला मिळाले.

२. दुसर्‍या एका आढाव्यात चिंतनाचा विषय होता ‘आश्रमातील संतांशी माझी जवळीक आहे का ? जवळीक होत नसेल, तर का होत नाही ? कोणते स्वभावदोष अल्प करून कोणते गुण वाढवले पाहिजेत ?’, हे मला शिकायला मिळाले. या अभ्यासातून पुढे कृतीच्या स्तरावर प्रयत्न करता आले.

७ ए. ‘देव प्रत्येकाच्या क्षमतेनुसारच अपेक्षा करतो’, हे या सत्संगात शिकता येणे : काही वयस्कर संतांना त्यांच्या चुका आणि स्वभावदोष लक्षात येत नाहीत. ‘त्यांची स्मरणशक्ती अल्प होत जाते’, हे नैसर्गिक आहे; मात्र त्यांच्या स्वतःकडून अपेक्षा असल्याने त्यांच्याकडून ते स्वीकारले जात नाही. त्यासाठी तत्त्वज्ञानाची भूमिका घेतली पाहिजे. स्वीकारण्याची वृत्ती आणि समष्टी भाव वाढवला पाहिजे. वय वाढले आणि स्मरणशक्ती अल्प झाली, तरी ते साधनेच्या आड येत नाही. ‘देव साधकाच्या क्षमतेनुसारच त्याच्याकडून साधनेची अपेक्षा करतो’, हे या सत्संगात शिकायला मिळाले.

८. कृतज्ञता

व्यष्टी आढाव्याच्या साप्ताहिक सत्संगांतून पातळीनुसार व्यष्टी साधना कशी करायची ? समष्टी सेवा कशी करायची ? शिकण्याच्या स्थितीत राहून स्वभावदोष आणि अहं यांवर मात कशी करायची ? समष्टी भाव आणि व्यापकता कशी वाढवायची ? इत्यादी गोष्टी मला मन, बुद्धी आणि चैतन्य यांच्या स्तरावर शिकता येतात. त्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.३.२०२०) (समाप्त)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक