भगवद्गीता बालपणातच सोप्या भाषेत प्रत्येकापर्यंत पोचणे आवश्यक ! – पी.एस्. श्रीधरन् पिल्लई, राज्यपाल, गोवा

डावीकडून गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई, प्राचार्य डॉ. सुब्रह्मण्यम् भट, श्री. लक्ष्मण पित्रे आणि श्री. राजेंद्र देसाई

पणजी, १७ ऑगस्ट (वार्ता.) – भगवद्गीता आणि तिचा संदेश बालपणातच प्रत्येकापर्यंत सोप्या भाषेत पोचवण्याचे काम खूप महत्त्वाचे आहे, असे उद्गार गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी काढले. १२ ऑगस्टला दोनापावला येथील राजभवनात ‘कृतार्थ’, म्हार्दाेळ संस्थेच्या वतीने ‘श्लोकबद्ध मराठी गीतासार’ या पुस्तिकेचे लोकार्पण केल्यानंतर राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई बोलत होते. या वेळी गोवा राज्य वस्तूसंग्रहालयाचे निवृत्त संचालक श्री. लक्ष्मण पित्रे, बोरी येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुब्रह्मण्यम् भट आणि ‘कृतार्थ’चे श्री. राजेंद्र देसाई यांची उपस्थिती होती.

भगवद्गीतेतील १८ अध्यायांमध्ये मानवजातीच्या कल्याणार्थ सखोल तत्त्वज्ञान उपलब्ध आहे. भगवद्गीता धनुर्धारी अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामधील संवाद रूपात आहे आणि ती विविध भाषांमध्ये जगभर उपलब्ध आहे; मात्र ‘कृतार्थ’च्या वतीने प्रकाशित केवळ १८ श्लोकांमध्ये रचलेले मराठीतील ‘गीतासार’ हे पुस्तक लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ही एक अभिनव अशी कृती आहे. या श्लोकबद्ध गीतापाठासाठी साहाय्यक ठरणारी ध्वनीफीत (‘ऑडिओ’) आणि ध्वनीचित्रफीत (‘व्हिडिओ’) फोंडा येथील कु. तन्वी कुमार जांभळे यांच्या आवाजात सिद्ध करण्यात आली आहे. हा पूर्ण संच मुद्रित पुस्तिकेतील ‘क्यू आर कोड’वरून कुणालाही वापरणे शक्य होणार आहे. पुस्तिकेसाठी प्रस्तावना डॉ. (सौ.) अपर्णाताई पाटील यांनी दिली आहे. ध्वनीचित्रीकरण श्री. अनिल अध्यापक आणि श्री. अमोघ बर्वे यांनी केले आहे.

‘कृतार्थ’, म्हार्दाेळ या संस्थेने यंदा ८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. संस्थेने गेल्या ७ वर्षांत संस्कृती आणि लोकसंचित यांच्या संवर्धनार्थ ‘निसर्ग साधना’ आणि ‘निर्मल साधना’ अशा नावांनी विविध लोकोपयोगी आणि जागृतीपर उपक्रम सातत्याने चालवले आहेत. या कार्याची नोंद घेऊन शैक्षणिक संस्था, वैद्यकीय तज्ञ, सामाजिक संस्था आणि देवालये यांनी ‘कृतार्थ’ची कल्पकता आणि समाजाभिमुखता यांचे कौतुक केले आहे. प्रसारमाध्यमांतूनही ‘कृतार्थ’च्या उपक्रमशीलतेचा उल्लेख वेळोवेळी झालेला आहे.