धूपप्रतिबंधक बंधारा बांधावा आणि वाळूचा उपसा थांबवावा, या मागण्यांसाठी तळाशीलवासियांचे उपोषण दुसर्‍या दिवशी चालू

आमदार वैभव नाईक यांनी घेतली उपोषणकर्त्याची भेट

मालवण – अतिक्रमणबाधित तळाशील सागरी किनार्‍यावर कायमस्वरूपी धूपप्रतिबंधक बंधारा बांधावा, तळाशीलसमोरील कालावल खाडीतील वाळूचा उपसा थांबवावा, यांसह अन्य मागण्यांसाठी तळाशीलवासियांनी १५ ऑगस्टला चालू केलेले उपोषण १६ ऑगस्ट या आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशीही चालू होते.

तळाशील समुद्रकिनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. भविष्यात यामुळे मोठे संकट उभे रहाणार आहे. त्यामुळे येथे धूपप्रतिबंधक बंधारा तात्काळ बांधावा आणि येथे होणारा वाळूचा उपसा थांबवावा, यासाठी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी शासनाला निवेदने दिली; मात्र या दोन्ही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

जोपर्यंत धूपप्रतिबंधक बंधार्‍याचे काम चालू होत नाही किंवा सक्षम अधिकार्‍याकडून काम चालू करण्याविषयीचे लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत उपोषण चालूच ठेवण्यात येणार असल्याची चेतावणी ग्रामस्थांनी दिली आहे.

आमदार वैभव नाईक आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर ग्रामस्थांची अप्रसन्नता

आमदार वैभव नाईक यांनी १५ ऑगस्टला सायंकाळी उपोषणस्थळी भेट दिली. या वेळी ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर अनेक प्रश्‍न उपस्थित केले. पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषणकर्त्यांची भेट न घेतल्याने ग्रामस्थांनी अप्रसन्नता व्यक्त केली. या वेळी आमदार नाईक यांनी बंधारे बांधण्यास संमती मिळाली असून लवकरच कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगितले; मात्र त्यावर समाधान न झाल्याने ग्रामस्थ ‘आम्हाला आश्‍वासन नको, तर कामाला प्रारंभ करा अन्यथा लेखी द्या’ या मागणीवर ठाम राहिले.

१६ ऑगस्टला आमदार नाईक यांनी पुन्हा उपोषणकर्त्यांची भेट घेऊन बंधारे बांधण्याविषयी चालू असलेल्या प्रक्रियेची माहिती दिली. तरीही ग्रामस्थ आंदोलन करण्यावर ठाम राहिले.

आंदोलन चालू असलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पाहून ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी ‘पोलिसांचा धाक दाखवून आमच्यावर कोण दबाव आणत असेल, तर खपवून घेणार नाही’, अशी चेतावणी दिली.