‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’चे ५ सहस्र माजी सैनिक सुविधांपासून वंचित !
भारत-पाक युद्धात मोठा पराक्रम गाजवणारे कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांच्यासारख्या माजी सैनिकांना निवृत्ती वेतनापासून वंचित ठेवणे हे संरक्षण मंत्रालयाला अशोभनीय आहे. इतर देशांना त्यांच्या माजी सैनिकांविषयी पुष्कळ अभिमान असतो, तसा अभिमान भारतातील माजी सैनिकांविषयी व्यक्त केला जात नाही, हे दुर्दैवी आहे. सैन्यदलाने माजी सैनिकांना तात्काळ निवृत्तवेतन चालू केले पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे. – संपादक
संभाजीनगर – भारत-पाकिस्तान यांच्यात वर्ष १९७१ मध्ये झालेल्या युद्धात पाकिस्तानवर पहिला तोफगोळा डागणारे येथील कॅप्टन सुरेंद्र सुर्वे निवृत्ती वेतनापासून (‘पेन्शन’पासून) वंचित आहेत. ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’द्वारे सेवा बजावलेल्यांना काहीच सुविधा मिळत नसून देशात अनुमाने ५ सहस्रांहून अधिक माजी सैनिक आहेत. ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’च्या स्थापनेला ६० वर्षे झाल्यानंतर या सैनिकांना सरकारकडून माजी सैनिकांचा दर्जा देण्यात आला आहे.
या संदर्भात कॅप्टन सुरेंद्र सुर्वे म्हणाले की, चेन्नई येथील अकादमीतून प्रशिक्षण घेतल्यानंतर ११ जानेवारी १९६९ या दिवशी फिरोजपूर (पंजाब) येथे मी तैनात झालो होतो. खेमकरण ‘सेक्टर’मध्ये वर्ष १९७१ चे भारत-पाक युद्ध लढण्याची संधी मिळाली. ‘मराठा बॅटरी’च्या चौथ्या फलटणमध्ये २१ किमी ‘रेंज’ असलेल्या ‘रशियन गन’मधून पहिला तोफगोळा पाकिस्तानवर डागला. हा तोफगोळा डागल्यानंतर त्याचे ‘कार्टिलेज’ तेव्हाचे कर्नल निर्मल सोमधी यांनी युद्धानंतर गौरव समारंभात मला भेट दिले होते. ‘कार्टिलेज’वर ३० किलो वजनाचा दारूगोळा असतो. गोळा पुढे उडाल्यानंतर ते मागे पडते. या युद्धात २ ट्रक दारूगोळा आणि ६ तोफांच्या माध्यमांतून लाहोरच्या दिशेने मारा करत पाकिस्तानच्या रणगाड्यांना पुष्कळ हानी पोचवली होती. भारतीय सैन्याद्वारे मात्र अशा वीरांना निवृत्तीवेतन दिले जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
युद्धानंतर कॅप्टन सुर्वे यांना ‘वेस्टर्न स्टार’ आणि ‘संग्राम मेडल’ देऊन गौरवण्यात आले होते. १९७१ च्या युद्धानंतर त्यांना चीन सीमेवरील नाथुला पासवर तैनात केले होते. १० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेले कॅप्टन सुर्वे यांनी अडीच वर्षे गुजरात पर्यटन विभाग आणि २३ वर्षे महाराष्ट्र पर्यटन विभाग येथे सेवा केली आहे.
कॅप्टन सुर्वे यांनी युद्धावर ‘१९७१ : आणि तोफा धडाडल्या’ हे पुस्तक लिहिले असून त्याची हिंदी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे. पुणे येथील अंधांसाठी काम करणार्या निवांत संस्थेने पुस्तकाचा ब्रेल लिपीत अनुवादही केला आहे. |