युवा पिढीमध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमान निर्माण करणे, हा इतिहास शिकवण्याचा उद्देश आहे; मात्र सध्या भारतात सत्य इतिहास लपवून ‘मोगल शासक क्षमाशील आणि महान होते’, असे (धादांत खोटे) शिकवले जाते. सत्य इतिहास सांगितला न जाणे, हे गांधी-नेहरू यांच्या काळापासूनचे राजकीय षड्यंत्र आहे. खोट्या इतिहासातून डाव्या विचारसरणीचे अर्थात् हिंदुविरोधी विचार लोकांवर लादले जाऊ लागले. आपली भाषा, धर्म, ज्ञान आणि इतिहास यांची इंग्रजांच्या सत्ताकाळातही झाली नव्हती, तेवढी स्वातंत्र्यानंतर दुर्दशा झाली आहे. स्वातंत्र्यानंतर साम्यवाद्यांच्या प्रभावामुळे देशातील शिक्षणामध्ये हिंदु धर्माला त्याज्य ठरवले गेले. हिंदु धर्माला आणि त्याच्या चेतनेला न्यून लेखायचे अन् इस्लामला वरचढ दाखवायचे, हे धोरण काँग्रेसने स्वीकारले. हेच शिकवण्याच्या दृष्टीकोनातून पाठ्यपुस्तके सिद्ध केली गेली. नेहरू यांची विचारसरणी ही पूर्णत: हिंदुविरोधी होती. त्यांच्या कार्यकाळात समाजवाद, औद्योगिकीकरण, आर्थिक समृद्धी यांची स्वप्ने दाखवली जाऊन आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण संबंधांचा खोटा प्रचार करण्यात आला. यामुळे समाजाचे लक्ष त्याकडे वेधले गेले. काही विचारवंत आणि बुद्धीजीवी यांच्या हे लक्षात आले; मात्र नैतिक अन् सामाजिक पाठबळ न मिळाल्याने ते त्याविषयी काहीच करू शकले नाहीत. परिणामी समाजात हळूहळू हिंदुविरोधी विचार रुजवले गेले. गेल्या अनेक दशकांपासून हिंदुविरोधी विचार शिकवले जात असून त्यातून होणार्या राष्ट्रहानीचेही भान सर्वपक्षीय शासनकर्त्यांना राहिले नाही. सध्याच्या शिक्षणातही हिंदुविरोधी आणि देशविरोधी सूत्रे चांगली म्हणून शिकवण्यात येत आहेत.