स्थिर, अनासक्त आणि साधकांना साधनेत साहाय्य करून त्यांचा आधारस्तंभ बनलेले सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

श्रावण शुक्ल पक्ष प्रतिपदा (९.८.२०२१) या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा ५४ वा वाढदिवस झाला. त्या निमित्त सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली शब्दपुष्पे येथे दिली आहेत.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. अनासक्त

‘सद्गुरु काकांना कशाचीही आसक्ती नाही’, असे क्षणोक्षणी जाणवते. त्यांना खाण्या-पिण्याचीही आवड नाही. ते जे समोर येईल, ते आनंदाने स्वीकारतात.

श्री. अभय वर्तक

२. तत्त्वनिष्ठता

साधकांच्या चुका तत्त्वनिष्ठतेने दाखवतांना ‘कोण काय म्हणेल ?’, हा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवत नाही. ही तत्त्वनिष्ठता त्यांच्या प्रत्येक कृतीत असते. साधकाच्या मनातील भाव जागृत असेल, तर ते त्याचे कौतुक करतात. साधकामधील अहंभाव जागृत असेल, तर ते त्या साधकाला लगेच त्याची जाणीव करून देतात.

३. साधकांना साधनेत साहाय्य करणे

सद्गुरु काका अतिशय मितभाषी आहेत. ते मोजक्याच शब्दांत उत्तर देतात. असे असले, तरी सर्वांना त्यांचा पुष्कळ आधार वाटतो. सद्गुरु काका कुठल्याही साधकाला त्याच्या साधनेतील प्रत्येक छोट्या अडचणीतही साहाय्य करण्यास सदैव तत्पर असतात. ते त्या साधकासाठी वैयक्तिक वेळही देतात.

३ अ. सद्गुरु पिंगळेकाकांविषयी साधकाच्या मनात नकारात्मक विचार आल्यावर त्याने ते सद्गुरु काकांनाच सांगणे आणि सद्गुरु काकांनी ‘वाईट शक्ती साधकाच्या मनात असे विचार घालतात’, असे सांगून साधकाला त्या विचारांतून बाहेर काढणे : एकदा माझ्या मनात सद्गुरु काकांविषयी विकल्प येऊन नकारात्मक विचार आले. तेव्हा ‘मी हे कुणाला सांगू ?’, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हाही माझ्या मनात प्रथम सद्गुरु काकांचेच नाव आले आणि मी सद्गुरु काकांकडे जाऊन त्यांना माझ्या मनातील सर्व सांगितले. तेव्हा सद्गुरु काका मला म्हणाले, ‘‘सदगुरु, संत आणि देव यांचा राग येतो किंवा मनात विकल्प येतात, त्या वेळी त्या विचारांची निर्मिती वाईट शक्ती करत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून जो साधक सनातनच्या मागदर्शनाखाली साधना करत आहे, तो साधक संतांविषयी असा कसा विचार करेल ? हा विचार केवळ वाईट शक्तीच साधकाच्या मनात घालतात.’’ सद्गुरु काकांच्या या बोलण्याने मला इतका आधार दिला की, मी क्षणार्धात त्या विचारातून बाहेर आलो.

माझे मन अनेक वेळा विविध नकारात्मक विचारांनी अस्वस्थ असते. या अगोदर ‘हे सर्व विचार माझेच आहेत’, या धारणेने मी फार दु:खी होत असे. सद्गुरु काकांनी अतिशय कष्ट घेऊन माझ्या अंतर्मनातील या नकारात्मक विचारांपासून मला मुक्त केले. त्यामुळे आता मी काही प्रमाणात साधनेतील आनंद घेऊ लागलो आहे.

३ आ. साधक त्यांच्याकडून झालेल्या चुकीसाठी क्षमायाचना करण्यासाठी सद्गुरु काकांकडे जातात. तेव्हा सद्गुरु काका त्यांना सांगतात, ‘‘माझी क्षमा मागण्यापेक्षा सेवाकेंद्रात होणार्‍या सत्संगामध्ये चूक सांगून क्षमायाचना करा.’’

३ इ. साधकांनी सद्गुरु काकांकडे एखादी समस्या मांडल्यावर त्या सूत्राचा सर्वांना लाभ होणार असेल, तर असे समष्टी सूत्र सद्गुरु काका सेवाकेंद्राच्या सत्संगात चर्चेसाठी घेतात. त्यामुळे सर्व साधकांना त्या सूत्राचा लाभ होतो.

४. सद्गुरु काकांनी साधकांना आणि समाजातील जिज्ञासूंना विविध प्रकारे अध्यात्म समजावून सांगणे अन् त्यांनी केलेले अध्यात्माचे विश्लेषण अंतर्मनात जाऊन साधकांना त्यातून प्रत्यक्ष कृती करण्याची प्रेरणा मिळणे

‘सद्गुरु काका ज्ञान आणि भक्ती या मार्गांचा परिपाक असलेले संत आहेत’, असे मला जाणवते. ते साधकांना अध्यात्माविषयी समजावून सांगतात, तेव्हा ते अनुभवण्यातून अलौकिक आनंद मिळतो. सद्गुरु काका प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांचा संदर्भ देऊन, कधी एखाद्या संतांची कथा सांगून, तर कधी आध्यात्मिक शब्दांची व्युत्पत्ती किंवा फोड सांगून साधक किंवा समाजातील जिज्ञासू यांना अध्यात्म समजावून सांगतात. तेव्हा त्यांनी केलेले विश्लेषण आपण आधी कधीही ऐकलेले नसते. सद्गुरु काकांनी केलेले विश्लेषण अंतर्मनात जाते आणि त्यातून प्रत्यक्ष कृती करण्याची प्रेरणा मिळते. सद्गुरु काकांच्या सान्निध्यात रहाण्यात एक अलौकिक आनंद असतो.

५. अत्यंत कठीण परिस्थिती स्थिर राहून शांतपणे हाताळणारे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

सद्गुरु काका सत्यापासून क्षणभरही विचलित होत नाहीत. बाह्य जगतात कुठलीही उलथापालथ होवो, ते अत्यंत स्थिर असतात. एप्रिल २०२१ मधील हरिद्वार येथील कुंभमेळ्यातील सेवांचे आयोजन हे एक प्रकारचे आपत्कालीन आयोजनच होते. तेथे भारतभरातून १०० हून अधिक साधक आले होते. अतिशय अल्प कालावधीत आणि अपुर्‍या साधकांमध्ये सर्व नियोजन करायचे होते. प्रत्यक्ष कुंभमेळ्याच्या वेळी अनेक उत्तरदायी साधक आजारी पडत होते. सरकारचे नियोजन क्षणाक्षणाला पालटत होते आणि भाविकांची संख्या दिवसागणिक वाढत होती. अशी विपरीत परिस्थिती असूनही सद्गुरु काकांनी हे सर्व इतक्या सहजतेने हाताळले की, साधकांना कुठल्याही समस्यांची झळ पोचली नाही. केवळ सद्गुरु काकांच्या चैतन्यामुळे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला कुठल्याही विशेष समस्यांना सामोरे जावे लागले नाही. सद्गुरु काकांना विचारलेल्या सर्व समस्यांचे निराकरण ते अतिशय शांतपणे आणि सहजतेने करत होते. हा सगळा चैतन्याचा प्रभाव होता. आयोजनात येणारे अडथळे मी जवळून पहात होतो आणि ते सहजतेने सुटतांना अनुभवतही होतो. या सर्वच परिस्थितीत सद्गुरु काका अतिशय स्थिर होते. हे सगळे शब्दांत वर्णन करणे फार कठीण आहे.

६. मी मध्यंतरी भगवद्गीता वाचत होतो. त्यात भगवान श्रीकृष्णाने त्याला आवडणार्‍या भक्तांची लक्षणे सांगितली आहेत. ‘ती सर्व लक्षणे सद्गुरु काकांच्या ठायी आहेत’, असे मला प्रत्येक क्षणी जाणवते.

७. अहं अल्प असणे

७ अ. वैद्यकीय ज्ञानाचा अहं नसणे : कुठल्याही साधकाला काही शारीरिक समस्या आली, तरी सद्गुरु काका त्याला रामनाथी आश्रमातील आधुनिक वैद्यांचे मार्गदर्शन घेण्यास सांगतात किंवा त्यांना स्वतःलाही काही शारीरिक समस्या आली, तर ते इतर वैद्यांचे ऐकतात. शारीरिक समस्या सोडवतांना त्यांचा भर नामजपादी उपायांवर असतो. आवश्यकता लागल्यास आयुर्वेदीय किंवा ‘ॲलोपॅथी’चे उपचार घेणे, असा त्यांचा प्राधान्यक्रम असतो. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील विशेष ज्ञान असूनही ते स्वतःहून कधी त्याची इतरांना जाणीवही होऊ देत नाहीत.

७ आ. कर्तेपणा देवाला अर्पण करणे : समस्या कुठल्याही क्षेत्रातील असो, सद्गुरु काका जे मार्गदर्शन करतात, त्यातून ‘सद्गुरु काकांना त्या विषयाची सखोल माहिती आहे आणि ही माहिती बुद्धीच्या पलीकडील आहे’, हे लक्षात येते, तरीही सद्गुरु काका म्हणतात, ‘‘मलाही ठाऊक नव्हते. देवानेच हे सुचवले.’’ ते असे म्हणत असले, तरी  ‘सद्गुरु काका सर्वज्ञानी आहेत’, हे त्यांच्या सान्निध्यात रहाणार्‍या सर्व साधकांना नक्कीच ठाऊक आहे.

८. भाव

८ अ. कुंभमेळ्यातील प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेल्या संतांविषयीचा सद्गुरु काकांचा भाव ! : कुंभमेळ्यातील सनातन संस्थेच्या प्रदर्शनस्थळी भेट देण्यासाठी काही संत येत होते. सद्गुरु काका प्रदर्शनस्थळी आलेल्या प्रत्येक संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करायचे. त्यांची ही कृती अतिशय भावपूर्ण असायची. आलेल्या संतांशी बोलतांनाही सद्गुरु काकांचा भाव जागृत व्हायचा. ‘ते त्या संतांमध्ये जणू परात्पर गुरु डॉक्टरांनाच अनुभवत आहेत’, असे आम्हाला जाणवायचे. त्या संतांना त्यांच्या गाडीत बसवेपर्यंत सद्गुरु काका उपस्थित रहायचे. या सर्व गोष्टींचा परिणाम होऊन आलेले बहुतांश संत सद्गुरु काकांच्या प्रेमात पडायचे. त्यांची मैत्री होत असे. ‘साधकाच्या ठायी नम्रता कशी हवी ?’, याचा वस्तूपाठच सद्गुरु काका घालून देत आहेत’, असे आम्हाला जाणवायचे.

८ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याप्रती अपार भाव असणारे सद्गुरु पिंगळेकाका ! : परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा विषय कधीही निघाला, तरी सद्गुरु काकांचा भाव जागृत होतो. काही वेळा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे स्थुलातून देहली सेवाकेंद्रात आगमन होते. तेव्हा ‘सद्गुरु काकांचा बालकभाव जागृत होतो’, असे मला जाणवते. ‘अपार श्रद्धा म्हणजे नेमके काय ?’, हे अनुभवायचे असेल, तर सद्गुरु काकांचे परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी असलेले वागणे-बोलणे अन् भाव अनुभवावा !

९. सद्गुरु पिंगळेकाकांच्या द्रष्टेपणाची आलेली प्रचीती !

९ अ. सद्गुरु पिंगळेकाकांनी ‘एखाद्या सेवेविषयी पुढे काय होणार आहे ?’, याविषयी सांगणे आणि प्रत्यक्षातही त्यांनी सांगितल्याप्रमाणेच घडणे : मागील २ वर्षे मी देहली सेवाकेंद्रात सेवेसाठी रहात आहे. कुठल्याही सेवेविषयी सद्गुरु काकांना (सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना) विचारल्यावर ‘त्या सेवेविषयी पुढे काय होणार आहे ?’, हे ते मला आधीच सांगतात आणि ‘कोणती सावधानता बाळगायला हवी ?’, हेही सांगतात. प्रत्यक्षातही ते जसे सांगतात, तसेच घडते.

९ आ. हरिद्वार कुंभमेळ्यात प्रदर्शन लावण्यासाठी जागा शोधतांना एका आश्रमाच्या ठिकाणी गेल्यावर सद्गुरु पिंगळेकाकांनी ‘येथे आपले प्रदर्शन चांगले लागेल’, असे सांगणे, नंतर प्रत्यक्षातही तेथे साधकांच्या निवासाची चांगली व्यवस्था होणे आणि प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळणे : एप्रिल २०२१ च्या हरिद्वार कुंभमेळ्यात प्रदर्शन लावण्यासाठी जागा मिळावी; म्हणून आम्ही बरेच प्रयत्न करत होतो; पण आम्हाला योग्य जागा सापडत नव्हती. देहली येथील परिचयातील एका आश्रमाच्या व्यवस्थापकांनी आम्हाला सांगितले, ‘‘बैरागी कॅम्प’ येथे आमचा आश्रम आहे. ‘ती जागा आपल्याला प्रदर्शनासाठी चालू शकते का ?’, हे पहा.’’ ती जागा पहाताक्षणी सद्गुरु काकांनी सांगितले, ‘‘येथे आपले प्रदर्शन चांगले लागेल.’’ त्यामुळे आमची जागेची चिंता मिटली; पण प्रत्यक्षात ‘त्या भागात कुंभमेळा असणार कि नाही ?’, हे आम्हाला कुणालाही ठाऊक नव्हते.

‘बैरागी कॅम्प’ येथील त्या आश्रमाच्या व्यवस्थापकांनी आम्हाला प्रदर्शनासाठी लगेच अनुमती दिली आणि काही खोल्याही उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे साधकांच्या निवासाची चांगली व्यवस्था झाली. या आश्रमाच्या समोर गंगामातेचा घाट आहे. या ठिकाणीच कुंभमेळा भरला होता. तेथे सनातन संस्थेचे प्रदर्शन निर्विघ्नपणे लागले. साधकांची चांगली व्यवस्था झाली आणि सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभला.

या प्रसंगातून सद्गुरु काकांच्या द्रष्टेपणाची प्रचीतीच आम्हा साधकांना आली.

सद्गुरु काकांविषयी जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी थोडीच आहे. सद्गुरु काकांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. अभय वर्तक (धर्मप्रचारक, सनातन संस्था), देहली (१८.७.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध  करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक