६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या चि. विष्णु पट्टणशेट्टी याच्या संदर्भात त्याचे वडील श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

निपाणी, बेळगाव, कर्नाटक येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या चि. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी (वय ५ वर्षे) याच्या संदर्भात त्याचे वडील श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

चि. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी हा एक आहे !

( चि. विष्णु महर्लाेकातून आला असून वर्ष २०१९ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती. – संकलक)

१. चि. विष्णूने कोल्हापूरच्या सेवाकेंद्रात गेल्यावर आरतीच्या वेळी प्रथमच टाळ वाजवत असूनही योग्य लयीत वाजवणे

‘६.७.२०१९ या दिवशी आम्ही कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेलो आणि त्यानंतर परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचा पादुका-दर्शन सोहळा पहाण्यासाठी सायंकाळी ६.२० वाजता आम्ही कोल्हापूरच्या सेवाकेंद्रात पोचलो. त्या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांची जन्मशताब्दी असल्याने काही साधक ध्यानमंदिरात स्वच्छता करत होते आणि सायंकाळच्या आरतीची सिद्धता करत होते. ध्यानमंदिरातील सर्व सिद्धता झाल्यावर आम्हाला तेथे बसण्यास सांगितले. त्या वेळी तेथील पटलावर ठेवलेल्या टाळांकडे चि. विष्णूचे लक्ष गेले आणि ‘आरती करतांना टाळ वाजवूया’, असे तो म्हणाला. आरती चालू झाल्यावर एका साधिकेने त्याच्याकडील टाळ मागितला; परंतु विष्णूने तो देण्यास नकार दिला आणि तो लयीत टाळ वाजवू लागला. त्यानंतर काही वेळाने साधिकेने पुन्हा टाळ मागितल्यावर त्याने तो दिला. आरती झाल्यावर आश्रमातील एका साधिकेने ‘तुम्ही याला टाळ वाजवायला शिकवले आहे का ?’, असे विचारले. त्यावर ‘आम्ही त्याला शिकवले नाही; परंतु तरीही त्याने एवढ्या सुंदर पद्धतीने लयीत टाळ वाजवला, याचे आम्हालासुद्धा आश्चर्य वाटत आहे’, असे मी त्या साधिकेला सांगितले.

श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी

२. वर्ष २०१९ मध्ये गुरुपौर्णिमेच्या कालावधीत केलेली सेवा

२ अ. चि. विष्णूने गुरुपौर्णिमेच्या विविध सेवांमध्ये कुतूहलाने तीन घंटे सेवा करणे : गुरुपौर्णिमेच्या एक दिवस आधी म्हणजेच १५.७.२०१९ या दिवशी मी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या स्थळी सेवेसाठी गेलो होतो. त्यानंतर मी घरी दूरभाष करून ‘माझ्यासमवेत सेवा करायला येतोस का ?’, असे विष्णूला विचारल्यावर तो लगेच ‘‘हो’’ म्हणाला. मी घरी जाऊन त्याला कार्यस्थळी घेऊन आलो. तो कुतूहलाने मला सेवेत साहाय्य करत होता. त्या वेळी विष्णूने फुलांचे वर्गीकरण करणे, फलक लावण्यासाठी टाचण्या देणे, एका माळ्यावरून दुसर्‍या माळ्यावर नळी (पाईप) आणण्यास साहाय्य करणे, भूमीवर चटया अंथरणे इत्यादी सेवांमध्ये सहभाग घेऊन साहाय्य केले. त्यानंतर मी विष्णूला जेवण करण्यासाठी घरी सोडून आलो; मात्र त्याचे जेवण झाल्यावर त्याने पुन्हा कार्यस्थळी जाण्यासाठी आईकडे हट्ट केला. त्याने माझ्यासमवेत जवळजवळ ३ घंटे सेवा केली.

२ आ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेली अनुभूती

२ आ १. गुरुपौर्णिमेच्या दिवशी वडिलांचे अंग पुष्कळ दुखत असतांना चि. विष्णूने झोपेत त्याचा हात त्यांच्या गळ्याभोवती ठेवणे, तेव्हा वडिलांना शरिरातून अनिष्ट शक्ती बाहेर पडल्याचे जाणवून त्यांची अंगदुखी दूर होणे आणि आराम वाटणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी (१६.७.२०१९) सकाळी माझे अंग पुष्कळ दुखत होते आणि मला उठण्याची किंवा काहीही करण्याची इच्छा होत नव्हती. विष्णु माझ्या शेजारी झोपला होता. मी त्याच्या छातीवर हात ठेवून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप केल्यावर मला बरे वाटू लागले. त्यानंतर मी त्याला माझ्या कुशीत घेऊन पुन्हा नामजप केल्यावर मला पुष्कळ चांगले वाटू लागले. काही वेळाने विष्णूने झोपेत त्याची कूस पालटतांना माझ्या गळ्याभोवती त्याचा हात ठेवला. त्या क्षणी मला माझ्या शरिरातून अनिष्ट शक्ती बाहेर पडल्याचे जाणवले. त्यानंतर माझे अंग दुखणे पूर्णतः न्यून होऊन मला अधिक आराम वाटू लागला.

२ इ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी विष्णु शाळेत न जाता गुरुपूजनाच्या कार्यक्रमाला येणे आणि व्यासपिठावर ठेवलेले अर्पण-पात्र पाहिल्यावर त्याने स्वतःच्या साठवणीतील सर्व नाणी अर्पण करणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी (१६.७.२०१९ या दिवशी) विष्णु सकाळी उठल्यावर मला म्हणाला, ‘‘मी शाळेत जाणार नाही. मला गुरुपूजनाच्या कार्यक्रमाला जायचे आहे.’’ तेव्हा मी त्याला माझ्या समवेत गुरुपूजनाच्या कार्यक्रमाला घेऊन गेलो. आरती झाल्यावर दर्शन घेण्यासाठी आम्ही रांगेत उभे होतो. व्यासपिठावर ठेवलेले अर्पण-पात्र पाहिल्यावर ‘तुला अर्पण द्यायचे आहे का ?’, असे मी त्याला विचारले. त्यावर ‘‘मला मी साठवलेली नाणी अर्पण करायची आहेत’’, असे त्याने मला सांगितले. आम्ही घरी जाऊन त्याने साठवलेल्या नाण्यांची पेटी घेऊन आलो. दर्शन घेऊन झाल्यावर विष्णूने त्याने साठवलेली सर्व नाणी अर्पण केली.

३. अमावास्येच्या दिवशी चि. विष्णूच्या जागी मृत प्राण्याचे काळ्या रंगाचे मांस असल्याचे दृश्य दिसणे आणि कापराचे उपाय आणि प.पू. भक्तराज महराज यांचे भजन ऐकल्यानंतर विष्णूचा थकवा उणावून अनिष्ट शक्तीचे अस्तित्व न जाणवणे

‘आरोग्य साहाय्य समितीच्या शिबिरा’साठी मी रामनाथी आश्रमात गेलो होतो. शिबिर झाल्यावर ३०.८.२०१९ या अमावास्येच्या दिवशी मी घरी परतलो. त्या दिवशी विष्णु दिवसभर मला बिलगूनच होता. त्या वेळी ‘(रामनाथी आश्रमातील वास्तव्यामुळे) माझ्यात आलेल्या चैतन्याचा तो आनंद घेत असून ते ग्रहण करण्यासाठी तो बिलगत आहे’, असे मला वाटले. त्या रात्री २.४५ वाजता विष्णु झोपेत किंचाळू लागला. मी त्याला उचलले. त्या क्षणी मला ‘माझ्या हातात विष्णु नसून एका मृत प्राण्याचे काळ्या रंगाचे मांस आहे’, असे दृश्य दिसले. मी घाबरलो आणि ‘विष्णूला काय झाले?’, हे पहाण्यासाठी पत्नीला दिवा लावण्यास सांगितले. दिवा लावताच ते दृश्य नाहीसे झाले. विष्णु गाढ झोपेत होता आणि पुष्कळ थकलेला दिसत होता. त्यानंतर आम्ही त्याच्या अंगाला सनातन-निर्मित कापूर चोळून त्याच्याभोवती मानस संरक्षककवच सिद्ध केले आणि भ्रमणभाषवर प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावली. भजन लावताच गाढ झोपेत असूनही ‘‘भजन चालूच राहू द्या’’, असे विष्णु म्हणाला. काही वेळाने विष्णूचा थकवा उणावलेला दिसत होता आणि तेथे अनिष्ट शक्तीचेही अस्तित्व जाणवत नव्हते.

४. ‘सनातन – निर्मित’ आकाशकंदील बनवण्याची सेवा करतांना विष्णूने त्यावरील फटाक्यांविषयीच्या लिखाणाविषयी माहिती करून घेणे आणि दिवाळीच्या कालावधीत ‘फटाक्यांचे दुष्परिणाम’ याविषयी सर्वांचे प्रबोधन करणे

वर्ष २०१९ मध्ये दिवाळीत मी आकाशकंदील बनवण्याची सेवा करत होतो. त्या वेळी विष्णु माझ्या जवळ येऊन बसला आणि ‘आकाशकंदिलावर काय लिहिले आहे ?’, असे त्याने मला विचारले. मी त्याला ‘फटाके वाजवण्याऐवजी ते विकत घेण्यासाठी लागणारे धन देश आणि धर्म यांसाठी अर्पण करावे’, हा मजकूर कंदिलावर लिहिला असल्याचे सांगितले. त्यानंतर विष्णूने प.पू. भक्तराज महाराज आणि भगवान श्रीकृष्ण यांचा जयघोष केला. नंतर दिवाळीच्या कालावधीत तो सर्वांना ‘फटाके विकत घेऊ नका’, असे सांगत होता. त्याच्या चुलत भावाने फटाके विकत घेण्याचा हट्ट केल्यावर विष्णूने ‘सनातन निर्मित’ आकाशकंदिलावर लिहिल्याप्रमाणे फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू यांचे पुष्कळ प्रदूषण होत असल्याने ते हानीकारक आहेत’, असे सांगून त्याचे प्रबोधन केले.

५. तुळशी विवाहाच्या दिवशी अयोध्येतील श्रीराममंदिराविषयीचा निर्णय मिळाल्याने आनंद साजरा करण्यासाठी वडिलांनी फटाके वाजवल्यावर विष्णूने त्रस्त होऊन त्यांना त्यांच्या या वागण्याविषयी जाब विचारणे

तुळशी विवाहाच्या दिवशी अयोध्या येथील श्रीराममंदिरासंदर्भात निर्णय मिळाल्याने आनंद साजरा करण्यासाठी मी माझ्या भाच्याला फटाके आणायला सांगितले. विष्णूला याविषयी ठाऊक नव्हते. आम्ही फटाके वाजवल्यावर विष्णु त्रस्त झाला आणि त्याने ‘बाबा, फटाके वाजवल्याने ध्वनी आणि वायू यांचे प्रदूषण होते’, असे आकाशकंदिलावर लिहिलेले ठाऊक असूनही तुम्ही फटाके का आणले ?’, असे मला विचारले.

६. चि. विष्णूने केवळ कृष्णालाच नाही, तर सर्वच देवतांच्या नावाने अर्पण देण्याचा मानस ठेवणे

२८.२.२०२० या दिवशी निपाणी येथे सत्संग असल्याने मी त्याची पूर्वसिद्धता करत होतो. दुसर्‍या दिवशी सद्गुरु कु. स्वाती खाडये आणि काही साधक आमच्या घरी येणार असल्याचे मी विष्णूला सांगितले होते. तो सद्गुरु स्वातीताई यांना ‘कृष्णबाप्पाची सखी’ या नावाने ओळखतो. सद्गुरु स्वातीताई खोलीत बसल्या असतांना विष्णूने त्यांना ‘माझ्याकडे तुमच्यासाठी एक गंमत आहे’, असे सांगितले. त्याने अर्पण पेटीतील सर्व पैसे सद्गुरु स्वातीताईंना दिले आणि ‘हे सर्व पैसे कृष्णबाप्पाला द्या’, असे त्यांना सांगितले. काही दिवसांनी मी विष्णूला त्याच्या अर्पणपेटीत साठवायला पैसे दिले. त्यानंतर ‘ही पेटी भरल्यावर मी कृष्णबाप्पासाठी पुन्हा अर्पण देईन’, असे तो म्हणाला. तेवढ्यात त्याचे लक्ष आमच्या शयनकक्षातील नामपट्ट्यांच्या वास्तूछताकडे गेले. त्यावरील देवतांची चित्रे पाहून ‘गणपति, शिव, दत्त, मारुति आणि दुर्गादेवी यांना वाईट वाटू नये; म्हणून त्याने त्यांच्या नावाच्या लहान लहान अर्पणपेट्या सिद्ध करून ‘‘त्यांच्यासाठीही अर्पण देऊया’’, असे सांगितले.

७. चुका स्वीकारून स्वतःला शिक्षा करणे

एके दिवशी विष्णु आणि त्याचा चुलत भाऊ खेळत असतांना चुकून विष्णूची थुंकी चुलत भावाच्या सदर्‍यावर पडली. त्यामुळे त्या दोघांत भांडण झाले. विष्णूने त्वरित येऊन मला सर्व घटना सांगितली. त्याने स्वतःची चूक स्वीकारली आणि शिक्षा म्हणून १० उठाबश्या काढल्या. विष्णूला स्वतःला लक्षात आलेल्या किंवा आम्ही सांगितलेल्या चुका तो लगेच स्वीकारतो आणि चुकांच्या तीव्रतेप्रमाणे उठाबश्यांची संख्या ठरवून शिक्षा घेतो.

८. विष्णूला देवतांच्या विविध नावांनी हाक मारलेली पुष्कळ आवडणे

विष्णूला विविध नावाने हाक मारलेली पुष्कळ आवडते. तो आम्हाला नावे सुचवतो. ‘विठ्ठल’, ‘हनुमान’, ‘अर्जुन’, ‘गोविंद’ आणि ‘माधव’, या नावाने हाक मारण्यास तो आम्हाला सांगतो.

९. विष्णूने न घाबरता उत्साहाने एकट्यानेच तळ्यात पोहायला उतरणे

विष्णूला पाण्यात आणि मातीत खेळायला पुष्कळ आवडते. त्यामुळे मी त्याला माझ्या मित्राच्या शेतात असलेल्या तळ्यात प्रथमच पोहायला घेऊन गेलो. पोहण्यासाठी लागणारी उपकरणे आणि टोपी घालून विष्णु उत्साहाने एकटाच न घाबरता तळ्यात उतरला. त्याचा उत्साह आणि आनंद पाहून तिथे उपस्थित सर्वांना आश्चर्य वाटत होते.

१०. भाववृद्धीचे प्रयोग

१० अ. चि. विष्णूचा श्रीकृष्णाप्रती असलेला भाव आणि त्याने केलेले भावप्रयोग ! : एकदा मी विष्णूला भाववृद्धीसाठी प्रयोग करायला शिकवले. त्याने सर्वकाही लक्षपूर्वक ऐकून घेतले. तेव्हापासून तो नियमितपणे भावजागृतीचे प्रयत्न करून मला त्याविषयी सांगतो. ‘मला कृष्णबाप्पा दिसतात’, असे तो बर्‍याचदा सांगतो. मी त्याला अधिक विचारल्यावर त्याने एकदा ‘कृष्ण बाप्पाने निळ्या रंगाचे कद (रेशमी धोतर) आणि पिवळ्या रंगाचे उपरणे घातले होते. त्याच्या एका हातात कमळाचे फूल आणि दुसर्‍या हातात सुदर्शनचक्र होते. त्याच्या मुकुटात मोरपीस होते’, असे सविस्तर उत्तर दिले. काही वेळा तो मला ‘मी कृष्णबाप्पाला बसण्यास सांगून जेवण वाढले. करवस्त्राने त्याचे मुख पुसले. त्याला प्यायला पाणी दिले आणि चरणस्पर्श केला’, असेही सांगतो.

१० आ. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका पहायला आवडणे आणि जिज्ञासेने पुष्कळ प्रश्न विचारणे : एकदा आम्ही ‘महाभारत’ ही मालिका बघत होतो. त्या वेळी श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचे विराट रूप दाखवत असल्याचे दृश्य चालू असतांना विष्णूने नमस्काराची मुद्रा केली आणि ‘बाबा, मी कोणता नामजप करू ?’, असे त्याने मला विचारले. मी त्याला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करायला सांगितला. संपूर्ण दृश्य संपेपर्यंत विष्णु नामजप करत होता. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका चालू होण्याची वेळ होताच विष्णु दूरचित्रवाणी संच चालू करण्यास हट्ट करतो आणि कोणालाही अन्य वाहिन्या लावू देत नाही. मालिका पहातांना तो मला जिज्ञासेने पुष्कळ प्रश्न विचारतो. मला एखाद्या वेळी मालिका बघता आली नाही, तर विष्णु मला त्याविषयी सर्व वृत्तांत अचूकपणे सांगतो.

११. खेळतांना सामान्य खेळण्यांपेक्षा देवतांच्या शस्त्रांनी खेळणे आवडणे

विष्णु त्याच्याकडे असलेल्या सामान्य खेळण्यांसमवेत क्वचितच खेळतो. त्याला ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिकांमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्थातच खोट्या शस्त्रांसमवेत खेळायला आवडते. तो मुखवटा आणि शेपूट लावतो अन् हातात गदा घेऊन हनुमानासारखा वेष घेऊन खेळतो. ‘मला खेळण्यासाठी धनुष्य-बाण सिद्ध करून द्या’, असे तो मला सांगतो. सुदर्शनचक्र बनवण्यासाठी त्याने पुट्ठे गोळा करून ठेवले होते. विष्णु खेळतांना गदा असल्यास हनुमान, धनुष्य-बाण असल्यास अर्जुन आणि सुदर्शनचक्र असल्यास श्रीकृष्ण किंवा विष्णु बनतो.

१२. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात ४ घंटे आनंदाने सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनाची सेवा करणे

२१.२.२०२० या महाशिवरात्रीच्या दिवशी मी सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनाची सेवा करण्यासाठी महादेवाच्या मंदिरात जाण्याची सिद्धता करत होतो. त्या वेळी विष्णूने सेवेसाठी माझ्यासमवेत येण्याची इच्छा व्यक्त केली; म्हणून मी त्याला माझ्यासमवेत सेवेला घेऊन गेलो. तेव्हा तो माझ्या आणि अन्य साधकांसमवेत ४ घंटे आनंदाने थांबला.

१३. ‘कृष्णबाप्पा समवेत आहे’, अशी समजूत काढल्याने भीती नाहीशी होऊन छान वाटणे

एके दिवशी खेळतांना विष्णु झोपाळ्यावरून पडला. त्याच्या ओठांतून रक्त येत होते. त्यामुळे तो घाबरला आणि त्या स्थितीतून बाहेर येत नव्हता. मी कार्यालयातून घरी परतल्यावर पत्नीने मला सर्व वृत्तांत सांगितला. मी विष्णूला माझ्या जवळ घेऊन कुरवाळत असतांना ‘बाबा, मला भीती वाटत आहे’, असे तो म्हणत होता. मी त्याची समजूत काढत ‘कृष्णबाप्पा तुझ्या जवळ बसलेला मला दिसत आहे. तुझी काळजी घेण्यासाठी तो तुझ्यासमवेत आहे’, असे विष्णूला सांगितले. काही वेळाने ‘कृष्णबाप्पा माझ्या समवेत असल्याने आता मला भीती न वाटता छान वाटत आहे’, असे विष्णूने मला सांगितले.

१४. जेवण्यापूर्वी आठवणीने प्रार्थना करणे

मी विष्णूला ‘अन्नामध्ये देवता असून आपण ते खाण्यापूर्वी प्रार्थना केली पाहिजे’, असे सांगितले आणि त्याला ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे..’, हा श्लोक शिकवला. त्या दिवसापासून विष्णु जेवण्यापूर्वी नियमित प्रार्थना करतो. मी प्रार्थना करायला विसरलो, तर तो मला आठवण करून देतो.

१५. ‘हट्टीपणा’ न्यून होणे

पूर्वी विष्णु पुष्कळ हट्टी होता; मात्र आता त्याचा हट्टीपणा न्यून झाला आहे.

माझा जीवनाविषयीचा पूर्वीचा दृष्टीकोन पालटून आमचे जीवन घडवणारा श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि ‘आमच्यावर कृपेचा वर्षाव करत सदैव आमच्यासमवेत रहावे’, अशी मी त्यांना प्रार्थना करतो.’

– श्री अनिरुद्ध पट्टणशेट्टी, निपाणी, बेळगाव, कर्नाटक. (२६.६.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक