पाकमधील चिनी नागरिकांवरील गोळीबारात दोघे जण घायाळ

कर्ज देऊन किंवा प्रकल्पांद्वारे चीनला पाकवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल, असे वाटत असेल, तर ते इतके सोपे नाही, हे त्याने अशा घटनांतून लक्षात घेतले पाहिजे !

कराची (पाकिस्तान) – येथे २८ जुलैच्या सायंकाळी अज्ञात आक्रमणकर्त्यांनी एका चिनी नागरिकाच्या चारचाकी वाहनावर केलेल्या गोळीबारात एक चिनी नागरिक गंभीररित्या, तर दुसरा किरकोळ घायाळ झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्क घातलेले २ आक्रमणकर्ते दुचाकीवरून येऊन त्यांनी गोळीबार केला आणि त्यानंतर ते पसार झाले. ‘या घटनेच्या अन्वेषणाकडे आमचे बारीक लक्ष आहे. पाकिस्तानमधील चिनी नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी तेथील सरकार घेईल, असा विश्‍वास वाटत आहे’, असे चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी म्हटले आहे. (चीन पाककडून अशी अपेक्षा करत आहे जी कधीही पूर्ण होणार नाही, हे त्याने कायमचे लक्षात ठेवावे ! अमेरिकेकडून पाकला सर्व सुविधा आणि साहाय्य देऊनही पाकने त्याला अंगठा दाखवला होता, हे चीनने आताच लक्षात ठेवावे !  – संपादक)

पाकमधील विविध प्रकल्पांच्या कामानिमित्त चिनी अभियंते आणि कर्मचारी पाकिस्तानमध्ये आहेत. गेल्या काही मासांपासून या चिनी नागरिकांना लक्ष्य करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच चिनी नागरिकांच्या बसवर करण्यात आलेल्या आक्रमणात ९ चिनी अभियंत्यांसह १३ जण ठार झाले होते. त्यात दोघा पाकिस्तानी सैनिकांचाही समावेश होता.