|
कोल्हापूर, २४ जुलै (वार्ता.) – गेले ४ दिवस सातत्याने कोसळणार्या पावसाने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली होती. विशेषकरून कोल्हापूरचे बाहेर जाणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत; मात्र २३ जुलैच्या रात्रीपासून सांगली-कोल्हापुरात पाऊस थांबल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी पुराचे सावट कायम आहे. आज दुपारी १२ वाजता राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ५५ फूट ४ इंच झाली आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जोमाने साहाय्य चालू झाले असून एन्.डी.आर्.एफ्.च्या आणखी ४ तुकड्या कोल्हापुरात हवाई मार्गाने दाखल होत आहेत.
दुपारी कृष्णा नदीला आलेला महापूर कराड येथे ओसरण्यास प्रारंभ झाला असून कराड येथे पाणी ४ फूट अल्प झाले आहे. २५ जुलैनंतर सांगलीत प्रभाव दिसेल असे पाटबंधारे विभागाने सांगितले.
अन्य घडामोडी
कोल्हापूर जिल्हा
१. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अजूनही पाणी असल्याने या मार्गासह अद्यापही अनेक मार्ग बंद आहेत.
२. नदीवरील पाणी उपसा केंद्र पुराच्या पाण्यात गेल्याने शहराचा पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित करण्यात आला आहे. याच समवेत शहरात बहुतांश ठिकाणी वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. यामुळे शहर आणि उपनगर यांतील अनेक वॉटर ए.टी.एम्.वर नागरिकांनी गर्दी केली होती. महापालिकेने टँकर पुरवठा चालू केला आहे; मात्र तो अत्यंत तोकडा पडल्याचे दिसून आले. दोन दिवस काही जणांनी पावसाचे पाणी साठवून ते पिण्यासाठी, तसेच अन्य कारणांसाठी वापरले; मात्र २४ जुलैपासून पाऊस नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.
३. नृसिंहवाडी येथील दत्तमंदिर पूर्णत: पाण्याखाली गेले असून नृसिंहवाडी, कुरुंदवाड येथील नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
४. शहरात कालपासून इंधन केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच देण्यात येत असून सामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल बंद करण्यात आले आहे. यामुळे कोणतीही वस्तू आणण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.
५. राधानगरी धरण ९३ टक्के भरले असून अद्यापही ११६ बंधारे पाण्याखाली आहेत. काल दिवसभरात ४० सहस्रांपेक्षा अधिक जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
६. पुराचा फटका ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बसला असून सहस्रो एकर शेतीची हानी झाली आहे.
सांगली जिल्हा
१. २३ जुलै या दिवशी कृष्णा नदीची पातळी ४९ फूट झाल्याने शहरातील मारुति चौक येथे २३ जुलै या दिवशी रात्री पाणी आले. याचसमवेत टिळक चौक आणि अन्य काही उपनगरांत पाणी आले आहे.
२. कृष्णा-कोयना नद्यांच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे, तसेच कोयना आणि वारणा धरणातून विसर्ग अल्प करण्यात आला आहे. २४ जुलै या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी ५० फूट ४ इंच इतकी आहे. ही पातळी सायंकाळपर्यंत ५१ ते ५२ फुटांपर्यंत वाढत जाऊन स्थिर होईल. त्यानंतर पाणी पातळी अल्प होण्यास प्रारंभ होईल, अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली आहे. या संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वासू ठेवू नये, वेळोवेळी अद्यावत् माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील दूरभाष क्रमांक ०२३३, २३०१८२०, २३०२९२५ यांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
३. सांगली महापालिकेकडून सांगली-मिरज येथे १८ ठिकाणी तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
आपत्तीग्रस्त भागातील कुटुंबास विनामूल्य गहू, तांदूळ, डाळ ! – छगन भुजबळ, अन्न, नागरी पुरवठा मंत्रीआपत्तीग्रस्त भागातील प्रत्येक कुटुंबास १० किलो गहू, १० किलो तांदूळ, ५ किलो डाळ आणि ५ लिटर रॉकेल विनामूल्य देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असून पूरग्रस्त भागात शिवभोजन केंद्रांना दुप्पट थाळी वितरित करण्यास अनुमती देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. |