धर्मांधांनी अतिक्रमण केलेल्या विशाळगडाविषयी मोहीम राबवतांना श्री. बाबासाहेब भोपळे यांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आणि अनुभूती !

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर धर्मांधांनी अतिक्रमण केले आहे, याविषयीची वृत्ते वाचनात आल्यावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना त्यासंदर्भात माहिती दिली. अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी त्यांना विशाळगडावरील सर्व माहिती संग्रहित करण्यास सांगितली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार श्री. भोपळे यांनी विशाळगडावर प्रत्यक्ष जाऊन तेथील वास्तू, मंदिरे, अतिक्रमण आणि प्रशासकीय स्तरावरील माहिती घेतली. माहिती मिळवणे आणि त्यासंदर्भातील विविध प्रक्रिया करणे यांच्या संदर्भात आलेले अनुभव अन् अनुभूती त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.

श्री. बाबासाहेब भोपळे

१. विशाळगड मोहिमेत ईश्वराने विविध माध्यमांतून केलेले साहाय्य !

१ अ. विशाळगडावर जाऊन तेथील इत्यंभूत माहिती अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना पाठवणे : तिथीनुसार शिवजयंती असलेल्या दिवशी सकाळी मी सनातनचे साधक श्री. अविनाश पवार यांच्या चारचाकी वाहनातून विशाळगडावर गेलो. दिवसभर संपूर्ण गड, तेथील मंदिरे आणि इतर प्रार्थनास्थळे, तसेच नवीन चालू असलेले बांधकाम यांची माहिती घेऊन छायाचित्रे काढली. ती माहिती अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना पाठवली.

१. आ. मोहिमेच्या अभ्यासात काही अडचणी येणे; परंतु अधिवक्ता संदीप अपसिंगेकर यांच्या माध्यमातून मोहिमेला गती मिळणे : प्रारंभी अधिवक्ता वीरेंद्रदादा आणि एक साधक यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवण्यासाठी २-३ अर्ज मला सिद्ध करून दिले. त्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायतीची नोंदवही (‘असिसमेंट रजिस्टर’) मागवली होती. माहिती सिद्ध असल्याचे पत्र संबंधितांकडून मिळाले; पण नोंदवहीविषयी काहीच ठाऊक नव्हते. पंढरपूर येथील अधिवक्ता संदीप अपसिंगेकर एका आठवड्यानंतर जवळजवळ १७५ कि.मी. अंतराचा प्रवास करून कोल्हापूरला पोचले. त्यानंतर आम्ही दोघे मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे गेलो. तेथील नोंदवही पाहून त्यातील कोणते कागद घेऊन त्यांचा अभ्यास करावा, याविषयी त्यांनी मला दिशादर्शन केले. अधिवक्ता संदीप अपसिंगेकर तेथे येणे, ही माझ्यासाठी गुरुकृपाच होती. त्यांच्यामुळे मोहिमेला गती मिळाली. न्यायालयीन कामांसाठी ते कोल्हापूर येथे येत असल्याने त्यांनी वेळोवेळी साहाय्य केले.

१ इ. ‘रस्ता’ या विषयावर अर्ज केलेला असतांनाही दर्ग्याविषयीची माहिती मिळाल्याने मोहिमेचा हेतू साध्य होत असल्याचे अनुभवता येणे : जुलै २०२० मध्ये विशाळगडाच्या संदर्भातील पत्रकार परिषद घेण्याविषयी मी, अधिवक्ता वीरेंद्रदादा आणि अन्य साधक अशी आमची चर्चा झाली. मला वाटत होते, ‘पत्रकार परिषद घेण्यापूर्वी वीरेंद्रदादांनी प्रत्यक्ष गडावर जाऊन यायला हवे.’ त्यानुसार आम्ही मार्च २०२० मध्ये गडावर गेलो. तेथे एके ठिकाणी आम्हाला रस्त्यासाठी २० लाख रुपये संमत केल्याचा फलक लावल्याचे दिसले; पण प्रत्यक्ष रस्ता केल्याचे कुठेच दिसत नव्हते. वीरेंद्रदादांनी मला माहिती अधिकाराअंतर्गत त्या रस्त्याची सविस्तर माहिती घेण्यास सांगितले.

अर्जामध्ये आम्ही रस्त्यासाठी संमत करण्यात आलेली निविदा, संबंधित कंत्राटदारांशी केलेल्या कराराची माहिती, करारानुसार काम झाले का ? अथवा शर्तभंग झाला असल्यास कोणती कारवाई केली ? यासमवेतच रस्ता पूर्ण झाल्याचा दाखला आणि गुणवत्ता चाचणी अहवाल इत्यादी माहिती मागवली होती; पण प्रत्यक्षात माहिती अधिकार्‍याने अत्यंत आवश्यक अशी माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी दर्गा परिसरात सुशोभिकरण करणे आणि ‘पेव्हिंग ब्लॉक’ बसवणे यांविषयी सांगितले होते. या माहितीचा विशाळगडाच्या मोहिमेच्या दृष्टीने पुष्कळ लाभ झाला.

दर्ग्याविषयी माहिती मागवायचे ठरवले असते, तर माहिती मिळण्यात अडचणी आल्या असत्या; पण परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे रस्त्याविषयी माहिती मागवली असतांना दर्ग्याची माहिती मिळाली ! यातून देवाने दाखवून दिले की, अर्जामध्ये आपण कोणतीही माहिती मागवली, तरी मोहीम परिपूर्ण होण्यासाठी कोणती माहिती आवश्यक आहे, हे श्रीगुरूंनी आधीच ठरवलेले असते आणि त्यानुसारच माहिती मिळते.

२. माहिती मिळवतांना आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर केलेली मात !

२ अ. विशाळगडावरील माहिती देण्यास माहिती अधिकार्‍याने टाळाटाळ करणे : वर्ष २०२० मध्ये आम्ही विशाळगडावरील रस्त्याविषयी अर्ज केला होता. कोरोनाच्या संसर्गामुळे माहिती टपालाने (पोस्टाने) मागितली होती; पण माहिती देण्यास माहिती अधिकारी टाळाटाळ करत होते. पाठपुराव्यानंतर ते अधिकारी प्रत्यक्ष येऊन माहिती घेऊन जाण्याचा आग्रह करत होते. त्या सेवेतील अडचणी आणि प्रत्यक्ष तेथे जाऊन माहिती घेतल्यास होणारे लाभ, तसेच हानी यांविषयी श्री. वीरेंद्रदादांसमवेत चर्चा केली.

२ आ. माहिती न घेण्यासाठी माहिती अधिकार्‍याने पैशांचे आमीष दाखवणे आणि त्या प्रसंगाला तत्त्वनिष्ठ राहून सामोरे जाता येणे : दुसर्‍या दिवशी एका साधकाला समवेत घेऊन मी मलकापूर येथे पोचलो. मी माहिती घेऊन जाऊ नये, यासाठी संबंधित माहिती अधिकारी २ घंटे प्रयत्न करत होते. त्यांनी मला पैशांचे आमीषही दाखवले; पण परात्पर गुरुदेवांच्या कृपेने तो प्रसंग मला तत्त्वनिष्ठ राहून हाताळता आला. एका सरकारी अधिकार्‍याला २ घंटे सामोरे जाणे आणि कोणत्याही आमीषाला बळी न पडता श्रीगुरूंना अपेक्षित अशी माहिती घेऊन येणे, हे केवळ श्रीगुरूंच्या कृपेमुळेच शक्य झाले !

मोहिमेच्या संदर्भातील सेवा करतांना श्रीगुरूंनी अनेक अनुभूतींतून दाखवून दिले की, आपण निमित्तमात्र आहोत. कर्ता करविता भगवंतच आहे. मोहिमेची सेवा त्यांच्या कृपेनेच मिळाली आणि त्यांनीच ती परिपूर्ण करून घेतली. याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. बाबासाहेब भोपळे, कोल्हापूर

विशाळगड मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

१. प्रोत्साहन देणे आणि पाठीशी ठामपणे उभे रहाणे

‘विशाळगड अतिक्रमणाविषयीची माहिती जरी मी एकत्रित केली असली, तरीही ही मोहीम आज ज्या टप्प्यावर येऊन पोचली आहे, त्यात १०० टक्के योगदान वीरेंद्रदादांचे आहे. त्यांच्याविना ही मोहीम या टप्प्यापर्यंत पोचणे शक्यच नव्हते. या मोहिमेसाठीच्या प्रत्येक टप्प्यावर ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

मोहिमेला प्रारंभ करतांना त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले होते की, विशाळगड प्रकरणाविषयीचा संपूर्ण अभ्यास म्हणजे माहिती मागवणे, अर्ज सिद्ध करणे हे सर्व तुम्हीच पूर्ण करायचे आहे. असे जरी असले, तरी सलग ३ वर्षे ते प्रत्येक निर्णय आणि प्रसंग यांत माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांच्यामुळेच आज ही मोहीम इथपर्यंत पोचली आहे. मी एखाद्या सूत्रासाठी अनेकदा संपर्क करूनही दादांनी शांतपणे सर्व ऐकून घेऊन मला अपेक्षित असा प्रतिसाद दिला. योग्य सूत्रांसाठी ते प्रोत्साहन द्यायचे, तर कधी माझे चुकल्यास व्यवस्थित समजावून सांगायचे.

२. भावाच्या स्तरावर सेवा करणे

प्रत्येक सेवा करतांना परात्पर गुरुदेवांना काय आवडेल, हा विचार आणि कृती ते प्राधान्याने करतात. त्यामुळे आता माझ्याकडूनही तसा विचार होतो. ‘देवच सगळे सुचवतो आणि कार्यही तोच करून घेतो’, हे अनुभवता आले. संपूर्ण मोहीम मला आध्यात्मिक स्तरावर अनुभवता आली. परात्पर गुरुदेवांनी मला अधिवक्ता वीरेंद्रदादांसारखा मित्र देणे, ही माझ्यावर असणारी गुरुकृपाच आहे !’

– श्री. बाबासाहेब भोपळे, कोल्हापूर

‘विशाळगड अतिक्रमण’ या विषयावरील पत्रकार परिषदेपूर्वी अनुभवलेली भावविभोर अवस्था !

‘विशाळगड अतिक्रमण’ या विषयाची पत्रकार परिषद घेण्याच्या आदल्या दिवसापासून माझा कंठ भरून येत होता. खरे पहाता इतक्या मोठ्या विषयात हात घालण्याची ना माझी बौद्धिक क्षमता आहे, ना त्या ठिकाणी घडणार्‍या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याची मानसिक क्षमता आहे ! तिथे घडणार्‍या प्रत्येक प्रसंगाला मी सामोरे जाऊ शकलो, ते केवळ अन् केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच !

ज्या वेळी मी या सेवेला प्रारंभ केला, त्या वेळी माझ्या सभोवतालची परिस्थिती आणि मनाची स्थितीही चांगली नव्हती. असे असतांनाही ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला हा विषय मिळाला आणि कुणीही आपल्यासमवेत नसले, तरी प्रत्येक साधकाकडे गुरुदेवांचे लक्ष असते’, हे पुन्हा एकदा अनुभवता आले. या मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यावर प.पू. गुरुदेव समवेत आहेत, हे मला अनुभवता आले. ३ वर्षांतील तो संपूर्ण प्रवास आठवून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.

एकच विचार मनात होता की, ही पत्रकार परिषद नाही, तर आपल्यासाठी ‘कृतज्ञता परिषद’ आहे. हा विचार गुरुदेवांच्या कृपेनेच आला होता. ३ वर्षांच्या काळात साधकांनी मला केलेले साहाय्य आठवून प्रत्येकाविषयी कृतज्ञता वाटत होती. पत्रकार परिषदेत आणि नंतरही तो भाव टिकून होता.’

– श्री. बाबासाहेब भोपळे, कोल्हापूर

प्रार्थना

‘विशाळगड मोहीम’ या विषयावर कुणी माझ्यासमवेत बोलू लागले, तर मला गत ३ वर्षांतील प्रसंग आठवून कृतज्ञता वाटते आणि भाव जागृत होतो. मी बोलूही शकत नाही. ही भावस्थिती केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच टिकून आहे. ३ वर्षांमध्ये मोहिमेच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांनी केलेल्या कृपेविषयी शब्दांत कृतज्ञता व्यक्तच होऊ शकत नाही. ‘ती कृतज्ञता शब्द आणि कृती यांच्या माध्यमातून व्यक्त करता येऊ दे, तसेच विशाळगडावरील अतिक्रमण हटवले जाईपर्यंत ज्या कृती कराव्या लागतील, ती करण्याची क्षमता माझ्यात निर्माण करावी’, अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. बाबासाहेब भोपळे, कोल्हापूर

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक