मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर 

वडाचे झाड कोसळून २ घंटे वाहतूक ठप्प

पंचगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर 

कोल्हापूर, २१ जुलै (वार्ता.) – गेले दोन दिवस पडणार्‍या मुसळधार पावसामुळे पंचगंगेचे पाणी नदीच्या पात्राबाहेर पडले आहे. २१ जुलै या दिवशी दुपारी राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३२ फूट नोंदवण्यात आली. रंकाळा तलाव्याच्या पाण्यातही वाढ होत असून तलावातील पाणी सांडव्यावरून वहात आहे. पावसामुळे काही उपनगरांमधील वीज खंडित होत असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हवामान विभागाने पुढील ४८ घंट्यांसाठी अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर एके ठिकाणी वडाचे मोठे झाड कोसळल्याने दोन घंटे वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने झाड तोडून वाहतूक पूर्ववत केली.