सांगली, २१ जुलै (वार्ता.) – वारंवार करण्यात येणार्या दळणवळण बंदीमुळे व्यापार्यांची अतोनात हानी होत आहे. गेल्या ३ मासांपासून व्यापार, उद्योगधंदे पूर्णत: बंद आहेत. व्यापार-उद्योग यांवर अवलंबून असणार्या सहस्रो कामगारांची आर्थिक कुंचबणा होत आहे. या संदर्भात शासनाने कोणतेही साहाय्य केलेले नाही. त्यामुळे या सर्वांचा संयम आता सुटत असून शासनाने दळणवळण बंदी न उठवल्यास रस्त्यावर उतरून सविनय लॉकडाऊन भंग आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
त्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत प्रभावी उपाय आहे; पण ही लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यात शासनाला अपयश येत आहे. अनेक ठिकाणी गर्दी होणारे व्यवसाय चालू आहेत आणि अल्प गर्दीची दुकाने मात्र बंद आहेत. त्यातच तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जाते. संभाव्य तिसर्या लाटेत दळणवळण बंदी न करता व्यापारी, अधिकारी आणि प्रशासन यांनी एकत्र बसून योग्य निर्णय घ्यावा. या प्रसिद्धीपत्रकावर कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मोहिते, भाजप नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रियानंद कांबळे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, गजानन मोरे यांच्या स्वाक्षर्या आहेत.