भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूला आम्ही उत्तरदायी नाही ! – तालिबान

भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी

कंदहार (अफगणिस्तान) – भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूला आम्ही उत्तरदायी नाही, असा दावा अफगाणिस्तानमधील तालिबान (मूळ अरबी शब्द ‘तालिब.’ त्याचे अनेकवचन ‘तालिबान.’ ‘तालिब’चा अर्थ ज्ञान मिळवण्याची अपेक्षा करणारे. इस्लामी कट्टरतावादावर विश्‍वास ठेवणारे. ‘तालिबान’चा अर्थ मागणारे) या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद याने केला. १६ जुलै या दिवशी अफगाणिस्तानामधील हिंसेचे वृत्तछायाचित्रांकन करतांना तालिबानने त्यांची हत्या केली. तथापि तालिबानने हा आरोप फेटाळून लावला. दानिश यांचे पार्थिव १६ जुलैला सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ‘इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस’कडे सोपवण्यात आले आहे.

मुजाहिद पुढे म्हणाला की, सिद्दीकी हे आमच्या भागात आल्याची माहिती आम्हाला देण्यात आली नव्हती. त्यांचा मृत्यू नेमका कुणाच्या गोळीबारात झाला, याची आम्हाला माहिती नाही. युद्ध चालू असणार्‍या प्रदेशामध्ये एखादा पत्रकार आला असेल, तर तशी माहिती आम्हाला दिली गेली पाहिजे. तरच त्या व्यक्तीला काही होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. त्यांच्या मृत्यूविषयी आम्हाला खेद वाटतो. सिद्दीकी हे अफगाणी सैनिक आणि तालिबानी आतंकवादी यांच्या चकमकीत मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र काही जण ‘त्यांची तालिबान्यांनी हत्या केली’, असे सांगत आहेत.