कोरोना संसर्गाची संभाव्य लाट पहाता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका स्थगित

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबई, ९ जुलै – कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरलेली नसतांनाच तिसर्‍या लाटेची आणि ‘डेल्टा प्लस’चा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यातील धुळे, नंदूरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समितीमधील १३० गणांमधील पोटनिवडणुकांची प्रकिया स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस्. मदान यांनी केली. या निवडणुकांसाठी १९ जुलै या दिवशी मतदान होणार होते; मात्र ७ जुलै या दिवशी राज्यशासनाने या निवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवून राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.