कोरोनाच्या काळात पुणे येथील आरोग्य कर्मचार्‍यांसाठी उपलब्ध केलेल्या हॉटेल्समधील ९ हॉटेल्सची देयके गायब !

प्रशासनाचा भोंगळ कारभार ! देयके गायब कशी होतात, हे पाहून संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे, ९ जुलै – कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी आधुनिक वैद्य, आरोग्य सेवेतील कर्मचारी यांच्यासाठी निवास, तसेच भोजन यांची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरातील ७० हॉटेल व्यावसायिकांचे साहाय्य घेतले होते. त्याचे देयक १८ कोटी रुपये झाले आहे. त्या देयकांची पडताळणी करतांना त्यामध्ये ९ हॉटेल्सची कोणतीही माहिती आणि कागदपत्रे उपलब्ध नाहीत, असे लक्षात आले आहे. त्यामुळे ही हॉटेल्स नेमकी कुणासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती ? त्यांची नोंद का मिळत नाही ? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात आधुनिक वैद्य, परिचारिका आणि वॉर्डबॉय यांना १ आठवडा सेवा आणि एक आठवडा विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची देयके जिल्हा प्रशासनाकडून ससून रुग्णालयाकडे आल्यानंतर पडताळणी करतांना वरील प्रकार निदर्शनास आला. याची जिल्हा प्रशासनाकडे विचारणा करूनही माहिती मिळाली नाही. आतापर्यंत ४३ हॉटेल व्यावसायिकांची देयके देण्यात आली आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

यावर जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले, ‘‘ससून रुग्णालयास कागदपत्र पडताळण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणती हॉटेल आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत, याविषयी सविस्तर माहिती घेण्यात येईल.’’