पुणे जिल्ह्यात ५ जुलैला बंजरंग दलाची गोवंश हत्या बंदी कायद्याच्या उल्लंघनाच्या निषेधार्थ निदर्शने !

गोवंश हत्या बंदी कायदा असूनही अशी निदर्शने हिंदुत्वनिष्ठ संघटनांना करावी लागणे दुर्दैवी !

मावळ (पुणे), ४ जुलै – पुणे ग्रामीण भागात होत असलेल्या गायी, बैल, वळु चोरी तसेच अवैधरित्या हत्या करण्यासाठी गोवंश वाहतूक सतत चालू आहे. प्रतिदिन सर्रासपणे प्राणी संरक्षण अधिनियम, गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होत आहे. सदर घटनांविषयी तक्रार करूनही पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद होऊनही अशा प्रकारांवर कोणताही आळा बसलेला नाही, तसेच गुन्ह्यांमध्ये घट झालेली नाही. त्यामुळे विश्व हिंदू परिषद बंजरंग दलाच्या वतीने गोवंश हत्या बंदी कायद्याच्या उल्लंघनाच्या निषेधार्थ ५ जुलै या दिवशी पुणे जिल्ह्यात निदर्शने करण्यात येणार आहेत.

सोलापूर विभाग मंत्री संदेश भेगडे यांनी सांगितले की, गायींची हत्या करणार्‍यांना कसल्याही प्रकारचे भय राहिले नाही आणि कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्यामुळे विश्व हिंदू परिषद बंजरंग दलाच्या वतीने देहूरोड, पवनानगर, घोडेगाव, तळेगाव आदी ठिकाणी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून, सामाजिक अंतराचे नियम पाळून निषेध व्यक्त करणार आहे.