बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील अनधिकृत दुकाने बुलडोझरच्या साहाय्याने पाडली

बांबोळी – येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील सुमारे १७ अनधिकृत दुकाने पोलिसांच्या उपस्थितीत बुलडोझरच्या साहाय्याने नुकतीच पाडण्यात आली. उपजिल्हाधिकार्‍यांनी वर्ष २०१८च्या एका आदेशाचा संदर्भ देऊन दुकानमालक आणि विक्रेते यांना सरकारी मालमत्ता तात्काळ रिकामी करण्याचा आदेश दिला होता. (बांधकामे अनधिकृत असूनही ती ३ वर्षे का ठेवली ? सरकारी जागेत अनधिकृत दुकाने उभारली जात असतांना संबंधित सरकारी यंत्रणा काय करत होती ? – संपादक) या विक्रेत्यांनी आवश्यक अनुमतीविना सरकारी संपत्तीवर अवैध अतिक्रमण केल्याचे या आदेशात म्हटले आहे.

‘रुग्णालयाच्या आवारातील ही दुकाने पाडण्यात येणार नसल्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी आमच्या शिष्टमंडळाला ३० जून या दिवशी दिले होते’, असा दावा दुकानमालक आणि विक्रेते यांनी या वेळी केला. ‘कोरोना महामारीच्या या कठीण काळात उदरनिर्वाहाचे साधन म्हणून आपल्याला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी’, अशी मागणी दुकानमालक आणि इतर विक्रेते यांनी या वेळी केली.