|
पणजी – गोव्यात २९ जून या दिवशी गोवा आणि मुंबई येथील अमली पदार्थ नियंत्रण पथकांनी संयुक्तपणे कारवाई करतांना उत्तर गोव्यात हणजुणे अन् बार्देश अशा २ ठिकाणी धाड टाकून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले. हणजुणे येथे कारवाई करतांना झालेल्या झटापटीत पथकातील ३ अधिकारी घायाळ झाले.
हणजुणे येथील कारवाईत किराणा दुकान आणि आईस्क्रीम पार्लर चालवणारा स्थानिक दुकानमालक रॉक जुझे फर्नांडिस अन् नायजेरियाचा १ नागरिक चिडी ओसिटा ओकोन्क्वो उपाख्य बेंजामिन यांना अटक करण्यात आली आहे. रॉक जुझे फर्नांडिस आईस्क्रीम पार्लरच्या आड गांव वाडो येथे अमली पदार्थ विकत होता. या दोघांकडून एक्स्टसीच्या (गुंगी आणणार्या) ६० गोळ्या आणि ३५० ग्रॅम नेपाळी चरस जप्त करण्यात आले. या वेळी बेंजामिन याला
५०० मीटर पाठलाग करून पकडण्यात आले. या वेळी झालेल्या झटापटीत अमली पदार्थ नियंत्रण पथकातील ३ अधिकारी घायाळ झाले, अशी माहिती पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली. रॉक जुझे फर्नांडिस या स्थानिकाला यापूर्वी अशा प्रकारच्या २ प्रकरणांत अटक करण्यात आली होती आणि त्या सध्या तो जामिनावर होता. (जामिनावर सुटल्यावर पुन्हा अमली पदार्थ व्यावसायिक व्यवसाय चालू करतात. यावरून त्यांना शासनाचा आणि कायद्यांचा कोणताही धाक नाही, हेच दिसून येते. यासाठी अमली पदार्थविरोधी कायदे सक्षम करणे आवश्यक आहे. – संपादक)
बार्देश येथील कारवाईत नायजेरियाच्या इजिके या नागरिकाकडून एल्एस्डी हा पदार्थ जप्त करण्यात आला. त्याला वर्ष २०१९ मध्ये अमली पदार्थ प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती आणि सध्या तो जामिनावर होता.