जिल्ह्यातील ७०० गावांतील शाळा ‘ऑफलाईन’ पद्धतीने चालू करण्याविषयी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सोलापूर – शहरासह ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अल्प होत आहे. जिल्ह्यातील ७०० हून अधिक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये ‘ऑफलाईन’ पद्धतीने शाळा चालू करण्यात याव्यात, त्यासाठी अनुमती मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

मागील दीड वर्षापासून ‘ऑनलाईन’ पद्धतीने अध्यापनाचे काम चालू आहे; मात्र जिल्हा परिषदेच्या पुष्कळ शाळांमधील मुलांकडे ‘ऑनलाईन’ शिक्षण घेण्यासाठी आवश्यक ‘अँड्रॉइड भ्रमणध्वनी’ नाहीत. ‘ऑनलाईन’ शिक्षणापासून पूर्णत: दूर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोरोनामुक्त गावात ‘ऑफलाईन’ पद्धतीने शिक्षण देण्यात यावे, अशा सूचना शिक्षकांना देण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोरोनामुक्त गावांतील शाळा चालू करण्याविषयी दिलेल्या प्रस्तावास जिल्हाधिकार्‍यांनी अनुमती दिल्यास शाळा ‘ऑफलाईन’ पद्धतीने चालू होतील.