पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी वारकरी ३ जुलैला आळंदी येथून प्रस्थान करणार ! – संतवीर बंडातात्या कराडकर

‘आमची वारी, आमची जबाबदारी, त्यात सरकारची नको मक्तेदारी !’

संतवीर बंडातात्या कराडकर

कोल्हापूर, २८ जून (वार्ता.) – गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आवाहन केल्यावर वारकरी संप्रदायाने सामंजस्याची भूमिका घेत वाहनातून पादुका नेण्यास अनुमती दिली. यंदाही वारकरी संप्रदायाशी चर्चेचे नाटक करून पादुका सोहळा पायी जाऊ नये, असा एकतर्फी निर्णय घोषित केला. वारकरी संप्रदायाच्या किमान १०० लोकांसमवेत हा सोहळा होण्याच्या भावनेचा चुराडा केला आहे. त्यामुळे २ जुलै या दिवशी आषाढी वारीसाठी भाविकांनी उपस्थित रहावे आणि पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी वारकरी ३ जुलै या दिवशी आळंदी येथून प्रस्थान करतील, अशी चेतावणी संतवीर बंडातात्या कराडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

त्या पत्रकात म्हटले आहे की,

१. संत ज्ञानेश्वरांनी ७०० वर्षांपूर्वी सामूहिक पद्धतीने दिंडी वाटचालीच्या चालू केलेल्या प्रथेचा ओघ अखंड चालू राहिला. संत तुकाराम महाराज यांच्या नंतर त्यांचे कनिष्ठ चिरंजीव नारायण महाराज यांनी या दिंडी समाजाचे संघटन करून ज्ञानोबा-तुकोबारायांच्या पादुका देहू-आळंदी मार्गे पालखीतून नेण्याची प्रथा चालू केली.

२. वर्ष १८३१ मध्ये देहूकरांच्या आपसातील वादामुळे हा सोहळा बंद पडला. त्याचे श्री गुरु हैबतराव बाबा यांना पुष्कळ वाईट वाटले. त्यांनी वर्ष १८३२ मध्ये अंकली (कर्नाटक)चे सरदार श्रीमंत शितोळे सरकार आणि वासकर यांच्या सहकार्याने आळंदी ते पंढरपूर असा स्वतंत्र पालखी सोहळा चालू केला. तो आजपर्यंत अव्याहतपणे चालू आहे.

३. वर्ष १९३३ मध्ये महाराष्ट्रात ‘कॉलरा’ रोगाची साथ होती. त्यामुळे इंग्रज सरकारने या सोहळ्यावर बंदी घातल्याने ज्ञानेश्वर महाराज संस्थानने पादुका रेल्वेने नेण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी शितोळे सरकार यांनी अश्व पायी नेण्याचा निर्णय घेतला आणि तो सोहळा झाला.

४. तेव्हापासून वर्ष २०२० पर्यंत अखंडपणे हा सोहळा चालू होता. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा झाला नाही.

५. मुंबई-पुणे ही गर्दीची शहरे तुडुंब भरून वहात आहेत, राजकीय मेळावे, विधानसभेची पोट निवडणूक प्रचंड गर्दीत होते, पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ५ सहस्र लोक येतात, कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराच्या सभा आणि भोजनावळीही प्रचंड संख्येत होत आहेत. याउलट मंदिरातील भजन, कीर्तन, दिंडी पूर्णत: बंद आहे. त्यामुळे आमचे म्हणणे आहे की, वाघ म्हणले तरी खातो, वाघोबा म्हणले तरी खातो, तर आता वाघ्या म्हणूनच अंगावर घेतले पाहिजे.

६. २ जुलै म्हणजे ज्येष्ठ वद्य अष्टमीस सर्व वारकर्‍यांनी मोठ्या संख्येने आळंदीस उपस्थित रहावे. ३ जुलै या दिवशी पहाटे ५ वाजता वारकरी आळंदीहून प्रस्थान करतील. ‘दुजा ऐसा कोण बळी आहे. आता श्रीहरी या अनंता पासूनिया’ या निर्धाराने चालायचे आहे.

७. वारकरी संप्रदायाची संघ-शक्ती शासनास दाखवण्यासाठी परत एकदा २००८ नंतरची संधी वारकर्‍यांनी वाया घालवू नये. नेहमी प्रमाणे आपापल्या समाजाची व्यवस्था ज्याची त्याने करावयाची आहे. अती वयोवृद्ध, अशक्त लोकांनी येऊ नये. शासनाचे सर्व नियम सांभाळून आपण चालणार आहोत. यातही अष्टमीपर्यंत सरकारने आपल्याशी समन्वय साधल्यास संपद्राय त्याप्रमाणे पुढील कृती करेल.