संस्कृतीची ऐशीतैशी !

अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप

काही दशकांपूर्वीची पिढी आणि सध्याची पिढी यांची विचारसरणी, दृष्टीकोन, तसेच वर्तन यांच्यात कमालीची तफावत आहे, हे आपण सर्वच जण जाणतो. त्यामुळे २ पिढ्यांमधील मतमतांतरे, त्यानुसार होणारे वाद-प्रतिवाद, समजून घेण्याची क्षमता यांतही काही प्रमाणात अंतर निर्माण होते. कालौघात तसे घडणे खरेतर स्वाभाविकही आहे; परंतु या सर्वांमध्ये मागील पिढीने जपलेली नैतिकता, संस्कार, आदर, सन्मान आणि जीवनमूल्ये यांची नाळ नकळत तुटत चालली आहे, हेही तितकेच खरे आहे. अनेक उदाहरणांतून ते आपल्या लक्षातही येते. नुकतीच घडलेली घटना म्हणजे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप हिच्या संदर्भातील एका व्हिडिओची ! तिने व्हिडिओच्या माध्यमातून तिच्या आई-वडिलांना लैंगिक संबंध, नातेसंबंध आणि गर्भारपण यांविषयी बेधडकपणे प्रश्न विचारले होते. विशेष म्हणजे या सर्व प्रश्नांची उत्तरे त्या दोघांनीही अगदी बिनधास्तपणे दिली. ‘डेटिंग करण्याचे (प्रियकरासमवेत फिरण्याचे) योग्य वय कोणते ?’, ‘प्रथम लैंगिक संबंध कधी प्रस्थापित करावेत ?’, ‘जर मी गर्भवती राहिले, तर तुम्हा दोघांची (आई-वडिलांची) काय प्रतिक्रिया  असेल ?’, ‘माझा बॉयफ्रेंड तुम्हाला आवडतो का ?’, अशा स्वरूपाचे ते प्रश्न होते. या संदर्भातील व्हिडिओ सामाजिक संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात प्रसारितही झाला. मुलीने असे प्रश्न विचारणे आणि आई-वडिलांनीही त्याची समर्थनीय स्वरूपात उत्तरे देणे याची अशा उच्चभ्रू लोकांना प्रौढी वाटते. ‘आम्ही इतक्या मोकळेपणाने आमच्या मुलांशी संवाद साधतो’, असेही त्यातून सांगितले जाते. मुले आणि पालक यांच्या नात्यात मोकळेपणा अवश्य असावा, तसेच मुलांना लैंगिक संबंध किंवा त्यासंदर्भातील ज्ञान देणे हेही तितकेच आवश्यक आहे; पण ते ज्ञान मिळवण्यात अन् देण्यात कुठेतरी ताळतंत्र असायला हवे. ते आज नक्कीच हरवत चाललेले आहे, असे आलियाच्या उदाहरणावरून दिसून येते. ज्या गोष्टी आई-वडिलांशी बोलायच्या नसतात, त्याही उघडपणे व्यक्त करणे हा एक प्रकारे पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभावच म्हणावा लागेल. भौतिकता आणि चंगळवाद यांचे मूळ पाश्चात्त्य संस्कृतीतच आहे. त्या संस्कृतीचे अनुकरण केल्यामुळेच आजची तरुण पिढी भरकटत चालली आहे आणि दिशाहीन होत आहे. वंदनीय असणार्‍या आई-वडिलांसमोर अशा प्रकारची भाषा करणे, हे भारतीय संस्कृतीच्या तत्त्वातच बसत नाही; पण संस्कृतीची लक्तरेच वेशीवर टांगली जात असल्याने नमस्कार आणि संस्कार उरलेले नाहीत, हेच खरे ! आई-वडिलांशी मित्रत्वाचे नाते जरूर असावे; पण त्या नात्याला एक सीमा असावी. सन्मान, आदर यांचे कोंदणही असावे. आपलेच आई-वडील आहेत; म्हणून काहीही बोललेले चालते, असे होऊ नये.

मर्यादा आणि कर्तव्य !

आजची मुले पेज ३ (अश्लील) पार्ट्या, फॅशन, महागडे भ्रमणभाष, लैंगिक संबंध, तसेच पॉर्न व्हिडिओ यांच्याकडे अधिक प्रमाणात आकर्षिली जात आहेत. अशात गुंतणारी मुले पालकांसमवेत बोलू नये, अशा गोष्टींवरही उघडपणे चर्चा करू शकतात. पालकांना वाटते की, आमची मुले ‘फॉरवर्ड’ आहेत. अनुराग कश्यप म्हणाले, ‘‘सध्याची मुले व्यक्त होणारी आणि स्पष्टपणे बोलणारी आहेत. आमच्या काळात असे नव्हते. आमचे असे काही बोलण्याचे धाडसही होत नव्हते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर निर्णय लादणे बंद करावेत.’’ निर्णय लादणे अयोग्यच आहे; पण ‘मुले आणि आई-वडील या नात्यात असलेल्या मर्यादांचे उल्लंघन कुणाकडूनही केले जाऊ नये’, असे भारतीय संस्कृती सांगते; मात्र आज संस्कृतीला जुमानते कोण ? खरे पहाता इतर संस्कृती आणि समाजव्यवस्था यांच्या तुलनेत भारतीय संस्कृतीच संपूर्ण विश्वात सर्वश्रेष्ठ आहे. असे असतांनाही तिला लाथाडून पाश्चात्त्य संस्कृतीसाठी पायघड्या घालून तिचे स्वागत केले जाणे दुर्दैवी ठरते. अशी परिस्थिती आज अल्प-अधिक प्रमाणात सर्वत्र आहे. काही मासांपूर्वी हिंदी चित्रपटातील एका प्रसिद्ध अविवाहित अभिनेत्रीने लैंगिक संबंधांविषयी उघडपणे भाष्य केले होते. या वृत्तालाही अनेक वर्तमानपत्रांनी ठळक मथळ्याअंतर्गत प्रसिद्धी दिली होती. अशा प्रकारच्या घटना, वृत्ते किंवा त्या संदर्भातील व्हिडिओ यांना सामाजिक प्रसारमाध्यमेच मोठ्या प्रमाणात व्यासपीठ उपलब्ध करून देतात. त्यामुळे कुणीतरी घेतलेल्या छोट्याशा मुलाखतीला काही क्षणांत प्रसिद्धी मिळते. अर्थात् जे दाखवले जाते, त्याला तितके मूल्य असेल, तर त्यात वावगे असे काहीच नाही; पण नैतिकतेचे हनन करणारी किंवा अतिशय हीन दर्जाची वृत्ते किंवा व्हिडिओ दाखवले गेल्यास त्यांचे भविष्यात किती वाईट परिणाम होतील, याचा विचारही न केलेला बरा ! आलियाने केवळ संवादच साधला; पण उद्या कुणी त्यानुसार अनुसरण करून त्याविषयीची चर्चा आई-वडिलांसमवेत केली, तर त्याला उत्तरदायी कोण ? ‘आजची पिढी जर देशाचे भविष्य असेल, तर ते उज्ज्वल ठरेल कि अपयशी ?’, याचा प्रत्येकानेच विचार करायला हवा. प्रसारमाध्यमांनीही काय दाखवावे आणि काय दाखवू नये, यांच्या मर्यादा पाळायला हव्यात. केवळ ‘टीआरपी’साठी कोणत्याही दर्जाचे वृत्त प्रसिद्ध करणे किंवा दाखवणे अशा गोष्टी करणे टाळावे. हे त्यांचे समाजकर्तव्यच आहे.

​पाश्चात्त्य अंधानुकरणाला पाठीशी बांधल्यास भारतियांचा उत्कर्ष न होता उज्ज्वल संस्कृतीची हेळसांडच होत राहील. आलिया कश्यप सारखी उदाहरणे पाहिल्यावर ‘श्यामची आई’ आठवते. प्रेम, भक्ती, कृतज्ञता आणि संस्कृती यांची अमूल्य शिकवण देणारी धन्य ती आई अन् तिचा मुलगा श्याम ! ते अजूनही सर्वांसाठी आदर्श आहेत. मुलांना घडवतांना आपली शिकवण जीवनमूल्यांना अनुसरून आहे का ? याचा प्रत्येकच आई-वडिलांनी विचार करावा. तसे झाल्यासच ‘खर्‍या अर्थाने संस्कृती अंगीकारली’, असे म्हणता येईल !