राज्यातील सर्व जिल्ह्यांचा तिसर्या स्तरामध्ये समावेश करण्याचा राज्यशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई – कोरोनाचा अधिक धोकादायक असलेला ‘डेल्टा प्लस’ या नावाने ओळखला जाणारा विषाणू महाराष्ट्रात आढळला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांचा तिसर्या स्तरामध्ये समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गावरून ५ स्तर निश्चित करण्यात आले आहेत; मात्र यापुढे १ आणि २ स्तरातील जिल्ह्यांमध्येही तिसर्या स्तराचे निर्बंध रहाणार आहेत. ‘डेल्टा प्लस’ चा धोका ओळखून राज्यातील राज्यशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
यासह कोरोनाबाधित रुग्ण निश्चित करण्यासाठी यापुढे केवळ ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचा अहवाल ग्राह्य धरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. यापूर्वी ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ आणि ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ या दोन्ही चाचण्यांमध्ये रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आल्यास त्या रुग्णांची ‘कोरोनाबाधित’ म्हणून नोंद करण्यात येत होती. यापुढे मात्र ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी वगळता अन्य कोणत्याही चाचणीचा अहवाल शासनमान्यता नसेल.
‘डेल्टा’ आणि ‘डेल्टा प्लस’ या विषाणूंमुळे राज्यातील मोठ्या भूभागावर कोरोनाची तिसरी लाट पसरण्याची शक्यता
कोरोनाविषयक निर्बंध घोषित करतांना महाराष्ट्र शासनाने व्यक्त केली भीती
मुंबई – ‘डेल्टा’ आणि ‘डेल्टा प्लस’ या कोरोनाच्या प्रगत विषाणूंचा येत्या ४-६ आठवड्यांत राज्यातील मोठ्या भूभागावर घातक परिणाम होण्याची शक्यता महाराष्ट्र शासनाकडून वर्तवण्यात आली आहे. या विषाणूंमुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती राज्यशासनाने व्यक्त केली असून या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाविषयक नव्याने निर्बंध शासनाने घोषित केले आहेत.
रत्नागिरी, जळगाव आणि अन्य काही जिल्ह्यांत ‘डेल्टा’ आणि ‘डेल्टा प्लस’ हे विषाणू आढळले आहेत. तेथे कोरोनाविषयक निर्बंध आणखी कडक करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यशासनाचे प्रशासकीय यंत्रणेला निर्देश
|