गस्त घालणार्या पोलिसांकडूनच खंडणी गोळा करण्याचा प्रकार
खंडणी गोळा करणारे असे पोलीस जनतेला कायद्याचे राज्य काय देणार ? अशा पोलिसांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना कायमचे बडतर्फ करून कारागृहात पाठवले पाहिजे !
पणजी, २४ जून (वार्ता.) – उत्तर गोव्यात रात्रीच्या वेळी गस्त घालणारे पोलीस नागरिकांकडून खंडणी गोळा करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील दोन मासांमध्ये अशा स्वरूपाच्या दोन घटना घडल्या असून या घटनांची पोलीस खाते चौकशी करत आहे. ‘पी.सी.आर्.’ गस्त पथकाने मागील आठवड्यात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कामावर असलेल्या ४ व्यक्तींकडून ५ सहस्र रुपयांची खंडणी गोळा केल्याची तक्रार आहे. या घटनेत पोलीस उपनिरीक्षक, हवालदार आणि होमगार्ड यांचा सहभाग होता. या प्रकरणी कळंगुट पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जतीन पोतदार, हवालदार पांडुरंग सावंत आणि हवालदार नीलेश साळगावकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
१. मिळालेल्या माहितीनुसार सिकेरी किल्ल्यावर एक गट कोरोना महामारीच्या मागदर्शक तत्त्वांचे आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत होता. पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करून पोलीस ठाण्यात नेण्याची चेतावणी संबंधित गटातील सदस्यांनी दिली. हे प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांनी प्रथम १५ सहस्र रुपयांची मागणी केली; परंतु ५ सहस्र रुपयांवर अखेर पोलिसांनी सहमती दर्शवली. संबंधित गटातील सदस्यांना जवळपासच्या ‘ए.टी.एम्.’मध्ये नेऊन त्यांच्याकडून ५ सहस्र रुपये घेतले. या घटनेचे चित्रीकरण ‘ए.टी.एम्.’च्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेल्या ‘सी.सी.टी.व्ही.’ कॅमेर्यांमध्ये झालेले आहे. विशेष म्हणजे या पोलिसांचे कार्यक्षेत्र बागा येथे असतांना ते सिकेरी या त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर कसे पोेचले ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२. सुमारे २ मासांपूर्वी गस्तीवरील पोलिसांच्या याच गटाने क्रिकेट बेटींग रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीकडून बळजोरीने २५ सहस्र रुपये खंडणी घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा भ्रमणभाष हिसकावून घेऊन पैसे स्वत:च्या अधिकोषात जमा केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या वेळीही गस्तीवरील पोलीस त्यांचे कार्यक्षेत्र सोडून हणजूण भागात आले होते. या घटनेची माहिती दुसर्या दिवशी हणजूण पोलिसांना देण्यात आल्यावर गस्तीवरील संबंधित पोलिसांनी घेतलेली खंडणी संबंधित व्यक्तीला परत देण्यास भाग पाडण्यात आले. (अशा पोलिसांवर त्याच वेळी कठोर कारवाई केली असती, तर त्यांच्याकडून पुन्हा खंडणी घेण्याचे धाडस झाले नसते ! अशा पोलिसांवर आणि त्यांना पाठीशी घालणार्यांवर सरकार कठोर कारवाई करणार का ? – संपादक)