राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी ‘ईडी’ची धाड !

देशमुख यांच्या निकटवर्तियांच्या निवासस्थानीही धाड !

नागपूर – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जीपीओ चौक येथील निवासस्थानी, तसेच त्यांच्या निकटवर्तियांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनायलयाने (‘ईडी’ने) २५ जून या दिवशी सकाळी धाड टाकली. ‘ईडी’च्या दुसर्‍या पथकाने देशमुख यांच्या वरळी (मुंबई) येथील सुखदा इमारतीमधील निवासस्थानीही धाड टाकली.  देशमुख यांच्या निवासस्थानी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. या धाडीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. १६ जून या दिवशी ‘ईडी’च्या ३ पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित २ सनदी लेखापाल (सीए) आणि एक कोळसा व्यापारी यांच्या निवासस्थानी धाड टाकली होती.

अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंद

१. केंद्रीय गुन्हे अन्वेेषण विभागाने (सीबीआयने) देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून अन्वेषण चालू केले. त्यानंतर ११ मे या दिवशी ‘ईडी’ने ‘मनी लॉन्ड्रिंग’प्रकरणी अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंद करत कारवाईला प्रारंभ केला.

२. ‘अनिल देशमुख यांनी प्रति मास १०० कोटी रुपयांचा हप्ता किंवा खंडणी गोळा करण्याची सूचना निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह अन्य पोलीस अधिकार्‍यांना दिली होती, तसेच पोलीस अधिकार्‍यांची स्थानांतर प्रक्रिया, नियमित कामकाज यांतही देशमुख यांचा हस्तक्षेप वाढला होता’, असे आरोप करणारे पत्र मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मे मासाच्या प्रारंभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.

३. मुंबई उच्च न्यायालयाने ‘सीबीआय’ला चौकशीचा आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी ५ एप्रिल या दिवशी गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र दिले होते.

देशमुख यांची चौकशी उच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे चालू आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊन देशमुख यांच्या संदर्भातील चौकशी ‘सीबीआय’कडे सोपवली असल्याने ही सर्व चौकशी न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे चालू आहे. याचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढण्याचे कारण नाही. मला असे वाटते की, उच्च न्यायालयाने सोपवलेल्या दायित्वानुसार यंत्रणा काम करत आहेत.

‘सीबीआय’च्या चौकशीत काही सापडत नसल्याने देशमुख यांचे आर्थिक व्यवहार पडताळले जात आहेत ! – जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

देशमुख यांच्या ‘सीबीआय’ चौकशीत काही सापडत नाही; म्हणून त्यांचे आर्थिक व्यवहार पडताळले जात आहेत. १० वर्षांपूर्वीचे प्रकरण बाहेर काढून त्यावरून तक्रार प्रविष्ट करायची आणि धाड टाकायची, याचाच अनुभव सर्वांना येत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. ज्या व्यक्तीने आरोप केले आहेत, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर यात किती तथ्य असावे, याचे उत्तर मिळते.

यंत्रणेचा अपवापर हे भाजपचे ‘स्टाईल ऑफ ऑपरेशन’ ! – सौ. सुप्रिया सुळे, खासदार

यंत्रणेचा अपवापर हे भाजपचे ‘स्टाईल ऑफ ऑपरेशन’ दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनाही ‘ईडी’ची नोटीस पाठवली गेली होती. त्यामुळे हा अनुभव आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. मी आजपर्यंत या देशात यंत्रणांचा वापर स्वतःच्या विरोधकांच्या विरोधात केलेला पाहिलेला नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीत कधीही सत्तेचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी केलेला नाही. नेहमी विचारांचे राजकारण झाले आहे. जे काही विरोध आणि मतभेद होते ते वैचारिक होते.

अनिल देशमुख यांचे खासगी सचिव ‘ईडी’च्या कह्यात !

‘ईडी’ने देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांना कह्यात घेतले आहे. त्यांना चौकशीसाठी ‘ईडी’च्या कार्यालयात नेण्यात आले आहे. दुसरीकडे देशमुख यांच्या कुटुंबियांचे ध्वनीमुद्रित केलेले दूरभाष पडताळले जात असल्याचे समजते. ‘ईडी’ने काही लोकांचे जबाबही नोंदवले आहेत. त्यात पोलीस उपायुक्त राजीव भुजबळ आणि मुंबई येथील १०-१२ बार मालक यांचाही समावेश आहे, अशी माहिती मिळाली आहे.