नागपूर येथील मेडिकल आणि मेयो शासकीय रुग्णालयांतील परिचारिकांचे विविध मागण्यांसाठी ‘कामबंद’ आंदोलन !

आरोग्य व्यवस्थेचा ताण वाढणार !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नागपूर – येथील मेडिकल आणि मेयो रुग्णालयांतील परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी वसतीगृहासमोर धरणे देत २ दिवसांपासून आंदोलन चालू केले होते; मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी २३ जूनपासून कामबंद आंदोलन चालू केले आहे. दोन्ही रुग्णालयांतील ८०० हून अधिक परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. आंदोलनात परिचारिकांनी विविध मागण्या दर्शवणारे फलक हाती धरले होते. आंदोलन असेच चिघळले, तर आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढण्याची शक्यता आहे.

परिचारिकांना पदभरती, पदोन्नती यांसह केंद्रशासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता नव्याने संमत करावा, कोविड काळात ७ दिवस कर्तव्य बजावल्यानंतर ३ दिवस विलगीकरण रजा देण्यात यावी, मृत परिचारिकांच्या कुटुंबियांना विनाविलंब ५० लाख विमा रक्कम आणि इतर सर्व आर्थिक लाभ देण्यात यावेत, तसेच मृत परिचारिकांच्या कुटुंबियांना शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंप तत्त्वावर नोकरी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी आंदोलन चालू करण्यात आले आहे.

कोरोनाकाळात जिवाचे रान करून अहोरात्र सेवा देणार्‍या परिचारिकांच्या मागण्यांना रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही आणि मागण्या मान्य न झाल्यास २५ जूनपासून ‘बेमुदत संप’ पुकारण्यात येणार आहे, अशी माहिती परिचारिका संघटनेच्या वतीने देण्यात आली.