वृद्धाश्रमांची व्यथा !

कोरोनामुळे ज्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यांपैकी एक म्हणजे वृद्धांना सांभाळण्याची समस्या. आधीच वृद्धाश्रमात आई-वडिलांना ठेवण्याची मानसिकता समाजात वाढत असतांना त्यात कोरोना महामारीचे निमित्त झाले. कोरोनाच्या भीतीने ‘घरात लहान मुले आहेत’, ‘मुले परदेशात आहेत’, ‘सांभाळायला नको’ अशा अनेक कारणांमुळे वृद्ध माता-पित्यांना ‘काळजी केंद्रा’ (केअर सेंटर)मध्ये ठेवणार्‍यांची संख्या आता वाढत आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. भारतातील जवळपास सर्वच मोठ्या शहरांतील यशोगाथेची ही काळी बाजू आहे. ही केंद्रे किंवा वृद्धाश्रम म्हणजे एकाअर्थी समाजाच्या पराकोटीच्या असंवेदनशीलतेची ही जिवंत केंद्रे आहेत. ‘इंग्रजाळलेल्या शिक्षणपद्धतीच्या विजयाची ही स्मारके आहेत’, असेच खेदाने म्हणावे लागते.

इकडे आड तिकडे विहीर

​कोरोनाच्या काळात घरातील वृद्धांना धोका म्हणून किंवा लहान मुलांना धोका म्हणून त्यांना अशा ‘काळजी केंद्रा’त किंवा ‘नर्सिंग होम’मध्ये ठेवण्याची नवीन पद्धत चालू झाली. काही जण घरून काम करत आहेत. त्यांना त्यांच्या पालकांची सुश्रुषा करणे कठीण झाले. काहींची मुले परदेशात आहेत. काहींना कुणीच नाही. काहींना सांभाळायला कुणी नाही. कोरोनामुळे आजारी वृद्धांची काळजी घेणारे कर्मचारी घरी येणे बंद झाले. काही मुले सांगत आहेत, ‘महामारीचा धोका काही मासांनी अल्प झाला की, आम्ही त्यांना घरी नेऊ.’ काही वृद्धांना कोरोना झाला; म्हणून भरती करण्यात आले; पण कोरोना बरा होऊनही त्यांची मुले त्यांना घरी न्यायला सिद्ध नाहीत. अनेक वृद्ध आता या ‘काळजी केंद्रा’त किंवा वृद्धाश्रमात जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे अशा केंद्रांत किंवा वृद्धाश्रमांत या वृद्धांची काळजी घेणारे कर्मचारी कोरोनामुळे कामावर येत नाहीत. त्यामुळे ही केंद्रे किंवा वृद्धाश्रम यांना एका वेगळ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या केंद्रांत भरती होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांच्या जागा भरल्या आहेत. एका केंद्रात तर ते निर्माण होण्यापूर्वीच त्याच्या जागा भरल्या. काही केंद्रांनी अनेकांना प्रतीक्षा सूचीत ‘वेटिंग लिस्ट’ (वर) ठेवले आहे. घरी आणि दारी दोन्हीकडे ‘वृद्धांची काळजी घ्यायला कुणी नाही’, अशी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. ‘लहानपण देगा देवा’ पण ‘म्हातारपण नको रे बाबा’ अशी म्हण रूढ होण्याची वेळ वृद्धांवर आली आहे.

कर्तव्यच्युत मानसिकता

​प्रतिदिन ५ ते ६ जण या ‘काळजी केंद्रा’त त्यांच्या पालकांना ठेवण्यासाठी चौकशी करत आहेत. ही आकडेवारी पाहिली, तर समाजातील तरुणांच्या कर्तव्यच्युत मानसिकतेची कल्पना येते. ज्या माता-पित्यांमुळे आपण या जगात आलो, ते तरुणांना जड वाटतात, हा पराकोटीचा स्वार्थीपणा आहे. जरी काही कारणांमुळे वृद्ध पालक तरुणांना नको वाटले, तरीही ‘चांगल्याप्रकारे प्रेमाने सांभाळणे’ हे त्यांचे कर्तव्य आहे. आजच्या पिढीत ही जाणीव नसणे आणि वृद्धांना अशा वृद्धश्रमांत ठेवण्यासाठी त्यांनी सबबी शोधणे हा एकत्रित कुटुंबपद्धत लोप पावल्याचा भयानक परिणाम आहे. पूर्वी नातवंडांना घडवण्याचे दायित्व आजी-आजोबांचेच असे. आता आजी-आजोबांना वृद्धाश्रम नावाच्या ‘कारागृहा’त कैद करून ठेवण्यात येत आहे. जन्मदात्यांना कारागृहात ठेवून स्वतः मौजमजा करायची, याला निवळ कृतघ्नपणा म्हणतात आणि याला भारतीय संस्कृतीत अजिबात स्थान नाही. ‘मातृदेवो भव’ आणि ‘पितृदेवो भव’ एवढे मानाचे स्थान माता-पित्यांना देणार्‍या अन् श्रावणबाळाचा आदर्श असणार्‍या आपल्या परंपरेत घरातील प्रमुख व्यक्तींना घरातून बाहेर काढायची ही नवरूढी निषेधार्हच आहे. कुंभमेळ्यासारख्या पवित्र ठिकाणीही वृद्ध पालकांना सोडून जाणारी मुले आहेत. हे अत्यंत विदारक आणि हृदयद्रावी चित्र आहे. मुलांना आई-वडील नको असतात; पण आई-वडिलांची संपत्ती मात्र हवी असते. भरलेले वृद्धाश्रम आणि ज्येष्ठांची अनाथालये हे समाजाच्या चंगळवादी स्वार्थी मानसिकतेचे लक्षण आहे. आई-वडिलांशी कितीही पटले नाही किंवा कितीही करिअर करायचे असले, तरी मुलांनी माता-पित्यांना ‘घराबाहेर काढणे’ हा उपाय नव्हे. पालकांना घराबाहेर पाठवणे म्हणजे कुटुंबाचा आधार स्वतःच्या हाताने नष्ट करण्यासारखे आहे. अशा दायित्वशून्य मुलांना त्यांच्या आयुष्यातही याच दुर्दैवी स्थितीला सामोरे जावे लागले, तर आश्चर्य वाटायला नको. उच्चशिक्षितांमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात आढळत आहे. खेड्यात तरी अजून हा प्रकार तितकासा नाही.

शासनाच्या स्तरावर उपाययोजना हवी

याविषयी केवळ हतबलतेचे सुस्कारे सोडून चालणार नाही. हे चित्र पालटण्यासाठी एकत्रित कुटुंब पद्धतीचे पुनरुज्जीवन होणे आवश्यक आहे. अर्थात् त्यासाठी धर्माचरण करणार्‍या पिढीची आवश्यकता आहे. जरी पती-पत्नीचे भांडण झाले, तरी त्यांना लगेच कायद्याने विभक्त होता येत नाही. काही संस्थांकडून त्यांचे समुपदेशन करण्याची सोय असते. तसेच आई-वडिलांच्या संदर्भातही करायला हवे. तसेच काही अडचणीचे कारण नसतांना त्यांना वृद्धाश्रमात पाठवले जात असेल, तर त्या मुलांना कायद्याचा धाक राहील, अशा प्रकारचे कायदे करण्याची वेळ आता आली आहे. जे ज्येष्ठ नागरिक खरोखरच अनाथ आहेत, त्यांचे दायित्व समाजाने आणि शासनाने मिळून उचलायला हवे. भारतातील दानशूर समाजाला ते कठीण नाही; आताही तसे काही प्रमाणात होत आहे; परंतु त्यासाठी एक पद्धतशीर कार्यपद्धत हवी; जेणेकरून जे वृद्ध पूर्ण अनाथ आहेत, त्यांची अबाळ होणार नाही. देशासाठी योगदान दिलेल्या या वृद्ध मंडळींचे शेवटचे दिवस कोरोनाच्या काळात  आनंदाचे जावेत, त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाने काही सविस्तर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे आता जाणवत आहे. शासन यासाठी काही विशिष्ट धोरणे बनवू शकते. खरेतर वृद्धाश्रम हा आदर्श समाजसंस्कृतीचा भाग नाहीच; परंतु काळानुसार काही अपरिहार्य कारणामुळे त्याची आवश्यकता भासत असेल, तर ते वृद्धांचे साधनाश्रम झाले पाहिजेत; जेणेकरून ही मोक्षमंदिरे त्यांचे उर्वरित आयुष्य आणि त्यानंतरचेही जीवन आनंदी करतील !