जगभरातील १३८ देशांनी गेल्या ६ वर्षांत अवैधरित्या रहाणार्‍या ८ लाखांहून अधिक पाकिस्तानी नागरिकांना हाकलले !

बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांना भारत कधी हाकलणार ?

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अवैधरित्या प्रवेश करणे, कागदपत्रांमध्ये पालट करणे, काम करण्याचा व्हिसा संपल्यानंतरही परत न जाणे आदी कारणांमुळे जगभरातील १३८ देशांमधून पाकिस्तानी नागरिकांना हाकलण्यात आल्याच्या घटना वर्ष २०१५ पासून मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. सरासरी २८३ पाकिस्तानी नागरिकांना प्रतीदिन हाकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या १३८ देशांतील मिळून वर्ष २०१५ पासून आतापर्यंत एकूण ८ लाख १८ सहस्र ८७७ पाक नागरिकांना हाकलण्यात आले आहे. ‘या हाकलपट्टीला विदेशातील पाकिस्तानी दूतावासांची निष्क्रीयताही उत्तरदायी आहे’, असे सांगितले जात आहे. ‘फेडरल इन्वेस्टिंगेशन एजन्सी’ने सांगितले की, पाकच्या दूतावासांनी त्यांच्या नागरिकांना साहाय्य केले नाही, त्यामुळे त्यांची हाकलपट्टी करण्यात आली.

१. हाकलपट्टी झालेल्या पाक नागरिकांपैकी ७२ टक्के नागरिक सौदी अरेबिया, ओमान, संयुक्त अरब अमिरात, कतार, बहारिन, इराण आणि तुर्कस्थान या इस्लामी देशांतील आहे. त्यातही ५२ टक्के नागरिकांना सौदी अरेबियामधून हाकलण्यात आले. ही संख्या ३ लाख २१ सहस्र ५९० इतकी आहे.

२. अमेरिका आणि ब्रिटन येथूनही सहस्रो पाकिस्तान्यांना हाकलण्यात आले. ब्रिटनने ८ सहस्र पाक नागरिकांना घरी पाठवले.