नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेची ३ बँकांवर कारवाई, पुणे जिल्ह्यातील २ बँकांचा समावेश !

पुणे, २३ जून (वार्ता.) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबईतील मोगवीरा सहकारी बँक लिमिडेटसह इंदापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि बारामती सहकारी बँक लिमिटेड या ३ सहकारी बँकांना २३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १२ लाखांचा दंड मोगवीरा सहकारी बँकेवर आकारण्यात आला आहे. या अधिकोषांनी वेगवेगळ्या प्रकारे नियमांचे उल्लंघन केले असून अधिक गंभीर उल्लंघनासाठी कायद्यातील तरतुदीनुसार अधिक दंड आकारण्यात आल्याची माहिती आहे.

मोगवीरा सहकारी बँक लिमिटेडच्या आर्थिक अहवालात अनेक अनियमितता आढळून आल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे, तर इंदापूर सहकारी बँकेत आगाऊ रक्कमेविषयी व्यवहार करतांना रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन झाले होते.

या कारवाईचा या बँकांनी त्यांच्या ग्राहकांशी केलेल्या कुठल्याही करारावर किंवा व्यवहारावर परिणाम होणार नाही. यापूर्वी केलेले आणि भविष्यात केले जाणारे व्यवहार हे वैधच असणार आहेत, असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने दिले आहे.