कल्याण येथे ‘पेपर बॉम्ब’ या नशायुक्त पदार्थाचा १ कोटी २ लाख ६२ सहस्र रुपये किंमतीचा साठा जप्त !

तिघांना अटक

ठाणे, २३ जून (वार्ता.) – तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणार्‍या एल्.एस्.डी. पेपर अर्थात् ‘पेपर बॉम्ब’ या नशायुक्त पदार्थाचा (ड्रग्स) साठा ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत पकडण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आधारवाडी चौक ते बिर्ला महाविद्यालय रिंग रस्ता या ठिकाणी सापळा रचून भाविक ठक्कर (वय २२ वर्षे) या संशयित तरुणास अटक केली.

त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मनी भार्गव आणि निवांत विल्हेकर या आणखी २ ड्रग्ज पुरवणार्‍यांना अटक करण्यात आली आहे. (तरुणांना नशेच्या गर्तेत ओढणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्यासच पुढे असे प्रकार करण्याचे धाडस कुणी करणार नाही. – संपादक) त्यांच्याकडून १ सहस्र ४६६ एल्.एस्.डी. पेपर जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत १ कोटी २ लाख ६२ सहस्र रुपये इतकी आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.