सिंधुदुर्ग, २२ जून (जि.मा.का.) – कोरोना महामारीचा लाभ उठवत काही बोगस आधुनिक वैद्य चुकीचे उपचार करण्याची शक्यता आहे. अशा आधुनिक वैद्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. विशेषतः वैभववाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत लक्ष केंद्रित करावे. गेल्या ३ वर्षांत विविध कारणांनी जिल्ह्यात झालेल्या मृत्यूंचा रुग्णालयनिहाय अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
कणकवली येथील तहसीलदार कार्यालयात पालकमंत्री सामंत यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरण, यांविषयी आढावा बैठक घेतली. या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते.
या वेळी पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले की,
१. प्रत्येक आठवड्यात जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट), लसीकरण, मृत्यूदर, बरे होऊन घरी गेलेले रुग्ण यांची माहिती पालकमंत्री सामंत यांनी या वेळी घेतली.
२. जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण अजूनही वाढवा. त्यासह लसीकरणावरही भर द्या.
३. जिल्ह्यात गेल्या ३ वर्षांत विविध कारणांनी होणार्या मृत्यूचा दर किती होता ? खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या रुग्णांची संख्या आणि त्यांना असणारे आजार, याचा समावेश अहवालात असावा.
४. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात विशेषतः दोडामार्ग आणि वैभववाडी तालुक्यांत काही बोगस आधुनिक वैद्य वैद्यकीय उपचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी.