जून २१, २०२१ ! ७ वा आंतरराष्ट्रीय योगदिन ! जगभरातील १९२ देशांनी हा दिवस अत्यंत उत्साहाने साजरा केला. चिनी विषाणूमुळे जिथे संपूर्ण जग होरपळून निघाले आहे, तिथे या दिनाचे औचित्य आणि महत्त्व अधिकच उजळून निघाले. मानसिक स्वास्थ्य, मनोधैर्य, रोगप्रतिकारशक्ती वृद्धींगत करण्यासाठी योग या हिंदु भारताने जगाला दिलेल्या देणगीचे जग सहर्ष स्वागत करत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने वर्ष २०१५ मध्ये हा दिवस पाळण्यास आरंभ झाला आणि बघता बघता केवळ एका दिवसापुरते मर्यादित न रहाता ‘योग हा मानवाच्या दैनंदिन जीवनाचा अत्यावश्यक भाग असल्याने तो अंगीकारण्या’चे ‘ग्लोबल सेन्सेशन’ (जागतिक आकर्षण) बनले. योग हिंदु धर्माचा अविभाज्य भाग असल्याचे ज्ञात असूनही येमेन राष्ट्र सोडले, तर संयुक्त राष्ट्रांतील प्रत्येक इस्लामी राष्ट्र हा दिवस पाळतो, हे विशेष ! भारताचा जिहादी शत्रू पाकिस्तान येथपासून पॅलेस्टाईन, इजिप्त, सौदी अरेबियापर्यंत ते मलेशिया, इंडोनेशिया आदी सर्व कट्टर मुसलमान राष्ट्रांत आता हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. असे असले, तरी भारतातील कट्टर हिंदुविरोधी काँग्रेसी मात्र त्यास नावे ठेवण्यात धन्यता मानतात. त्याचाच एक भाग म्हणजे काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने तोडलेले तारे ! ते म्हणाले, ‘ॐ’ म्हटल्याने ना योग सामर्थ्यशाली होईल आणि अल्लाचे नाव घेतल्याने ना योगाची शक्ती न्यून होईल !’ योगाची हिंदु ओळख पुसण्यासाठी केलेले हे वक्तव्य आहे. हिंदु धर्माच्या या शिकवणीला आज जग स्वीकारत असतांना सिंघवी यांच्यासारख्यांना पोटशूळ उठणे साहजिक आहे. हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आरोपांना एकजात सांप्रदायिक ठरवले जाते. हिंदू हे धर्माच्या चष्म्यातून प्रत्येक घटनेकडे पहात असल्याने ते जनतेत तेढ निर्माण करत असल्याचे आरोप सिंघवी आणि त्यांचा चमू वेळोवेळी करत असतो. आता ‘योगा’तून जागतिक एकोपा निर्माण होण्याच्या दिशेने प्रयत्न होत असतांना सिंघवी मुसलमानांच्या मनात विष कालवण्याचे कारस्थान कशाला रचत आहेत, हे समजत नाही. जग तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतांना जिथे ‘योगदिना’सारखे अभियान राष्ट्रांना जवळ आणण्याचा प्रयत्न करू शकतात, तिथे काँग्रेसी मात्र त्यास विरोध करतात. यातून कोण धर्मांध आहे, ते वेगळे सांगायला नको.
धर्मनिरपेक्ष हिंदुद्वेष !
योग हे शास्त्र आहे. ज्याच्यापासून आपली निर्मिती झाली, त्या परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी योग म्हणजेच साधना केली जाते. यासाठी हिंदु धर्माने सांगितलेली ही आदर्श पद्धत मानवाला ख्रिस्ती, इस्लाम आदी पंथांत न अडकवता त्यास विश्वव्यापक बनवते. हे संशोधनाधारित शास्त्र असल्याने त्यामध्ये ‘ॐ’कारासह आसने केली, तर त्याचा लाभ अनेक पटींनी होतो; परंतु विज्ञानाचा पुरस्कार करणारे काँग्रेसी महाभाग मात्र याकडे कानाडोळा करतात. येथे हिंदु धर्माचा उल्लेख येत असल्याने काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेला धोका संभवतो. मध्यंतरी विविध वैज्ञानिक परिषदांमध्ये प्राचीन भारतात झालेल्या क्रांतीकारी शोधांविषयी कुणी विषय मांडला, तरी त्यास ही मंडळी भाकडकथा संबोधित होती. भारताच्या गौरवशाली इतिहासाविषयी सरकारनियुक्त पाठ्यपुस्तकांमध्ये उल्लेख केल्याचा प्रयत्न झाला, तरी हीच मंडळी ‘शिक्षणाचे भगवेकरण होत आहे’, असा सूर आळवतात. काही वर्षांपूर्वी मध्यप्रदेश आणि हरियाणा राज्यांत भगवद्गीतेचा काही भाग शालेय अभ्यासक्रमात घेण्याच्या तेथील राज्य सरकारांच्या प्रयत्नांनाही कडाडून विरोध केला गेला. थोडक्यात हिंदु धर्माला भारतात येत असलेले सुगीचे दिवस काँग्रेसला पहावत नाहीत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे आणखी एक नेते दिग्विजय सिंह यांनीही ‘सत्तेत आल्यावर कलम ३७० कायदा पुन्हा लागू करू’, अशा प्रकारे भारतद्वेषी विधान केले, तेही पाकिस्तानी पत्रकाराशी बोलतांना ! यांचेच आणखी एक नेते मणिशंकर अय्यर यांनी वर्ष २००४ मध्ये ‘यूपीए’चे सरकार येताच अंदमानच्या ‘सेल्युलर जेल’ला भेट देऊन तेथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव खोडले होते. या मंडळींच्या दृष्टीने प्रभु श्रीराम हे काल्पनिक, तर महंमद पैगंबर हे युगपुरुष ठरतात. हिंदु स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मांध, तर अकबर धर्मनिरपेक्ष असतात. भारतीय ऋषि-मुनी आणि त्यांच्या वैज्ञानिक शोधकार्याची यांच्याकडून हेटाळणी करण्यात येते, तर सुफी संत यांच्यासाठी जगाचे तारणहार बनतात. ‘गंगा जमुनी तहजीब’चा (कथित हिंदु-मुसलमान एकतेच्या संकल्पनेचा) उदोउदो करणारे हेच काँग्रेसी याचे पालन करण्याचे उपदेशाचे डोस मात्र हिंदूंच्या माथीच मारतात. आज जग जिथे हिंदु धर्म, त्याची शिकवण, धर्मग्रंथ, श्रृति-स्मृति, आचार-विचार, रिती-नीती, तत्त्वज्ञान यांचे जिज्ञासेने अवलोकन करत आहे, त्यांचे पालन करण्यासाठी प्रयत्नरत आहे, तिथे काँग्रेसी मात्र त्यास नावे ठेवण्यात धन्यता मानतात. एकूणच काँग्रेसच्या लयास आरंभ झाला असून साता-समुद्रापलीकडे हिंदु धर्माचा डंका पिटला जात आहे. हिंदु जनता दुधखुळी नाही. तिला काँग्रेसचे हिंदुविरोधी षड्यंत्र चांगले ज्ञात आहे. त्यामुळे निकटच्या भविष्यात येणार्या लोककल्याणकारी हिंदु राष्ट्रामध्ये भारतीय जनता मानवाचे अकल्याण चिंतणार्या काँग्रेसचे कायमस्वरूपी ‘शवासन’ घडवील, हे अभिषेक मनु सिंघवी आणि त्यांच्या संपूर्ण चमूने या निमित्ताने विसरू नये.
‘योग’चा विचार करता योगासनाच्या माध्यमातून शरिरापासून मनाकडे, मनापासून त्याच्या लयाकडे आणि पुढे ईश्वरप्राप्तीच्या दिशेने मनुष्याला वाटचाल करायची असते. जगाला आध्यात्मिक ज्ञान देऊन खर्या अर्थाने ज्ञानसंपन्न करायचे दायित्व आपल्याकडे आहे. अध्यात्मातील पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याची क्षमता केवळ हिंदु धर्मात आहे. या पार्श्वभूमीवर ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ हा पहिला टप्पा असून मानवाच्या कल्याणासाठी जिवाचे शिवाशी मीलन होणे म्हणजेच योग घडवण्यासाठीची पावले आपल्याला आगामी काळात उचलायची आहेत. या माध्यमातून ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ घडेल, हे लक्षात घेऊया आणि त्या दिशेने मार्गस्थ होऊया. हिंदु राष्ट्र हे काँग्रेसच्या अंताचा योग घडवून आणील, हे लक्षात घेऊन आश्वस्त होऊया आणि योगाचा अंगीकार करूया.