ठाणे, २० जून (वार्ता.) – भिवंडी तालुक्यातील आणि ठाणे शहराच्या सीमेलगत असलेल्या कशेळी अन् काल्हेर या परिसरांतील अनेक इमारतींना एम्.एम्.आर्.डी.ए. प्रशासनाने अनधिकृत ठरवत मागील १५ दिवसांपासून कारवाई चालू केली होती. तेव्हा स्थानिक आमदार शांताराम मोरे यांच्यासह ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी घटनास्थळी आले होते. अधिकार्यांशी चर्चा चालू असतांना संतप्त झालेल्या शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्यासह २५ ते ३० जणांच्या जमावाने अचानक एम्.एम्.आर्.डी.ए.चे विधी अधिकारी मिलिंद प्रधान आणि त्यांचे सहकारी यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत आक्रमण केले. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात १८ जून या दिवशी ३० जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख थळे यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.