अन्न शिजवतांना हे टाळा !
१. ‘स्वयंपाकघरात किंवा जवळच लावलेला रेडिओ, टेप, तसेच दूरदर्शन संच (टी.व्ही.) यांतून घर्षणात्मक अतीवेगवान स्पंदने तेजाच्या स्तरावर आल्याने अन्न घटकातील पोषकद्रव्यांचा र्हास होतो. यामुळे मनुष्यजिवाला निःसत्त्व अन्न मिळते.
२. स्वयंपाक करतांना भांड्यांच्या मोठमोठ्याने केलेल्या ध्वनीतून अन्नावर आदळणार्या त्रासदायक ध्वनीलहरी त्यांतील चेतनेचा र्हास करतात.
३. फोडणी करतांना तेल प्रमाणापेक्षा जास्त जळल्यास त्यात कार्बन घटकाची निर्मिती होऊन अन्न तमोगुणी बनते. स्वयंपाकघरात वावरतांना पाय आपटत चालणे, हाता-पायांच्या अनावश्यक हालचाली करणे, तसेच अन्न शिजवतांना मध्येच इतर पदार्थ खाणे टाळावे. यामुळे अन्न शिजवण्यातील एकाग्रता अल्प होऊन अन्नातील सत्त्वगुणी ऊर्जेला जागृती देणे अशक्य होते. पाय आपटत चालल्याने भूगर्भातील त्रासदायक स्पंदने जागृत झाल्याने अन्न शिजवणे ही प्रक्रिया तमोगुणी बनते.
४. स्वयंपाक करतांना अनावश्यक बोलले असता किंवा अनावश्यक चर्चा केली असता, तोंडातून बाह्यवायूमंडलात भावनेच्या स्तरावर उत्सर्जित होणारा टाकाऊ दूषित वायू अन्नघटकांतील रसांची हानी करतो आणि त्यात रज-तमात्मक वायूचा सूक्ष्म दूषित विकार उत्पन्न करतो. असे अन्न सेवन करणारा जीव निराशाग्रस्त बनतो; कारण या लहरींचा विपरीत परिणाम मनावर झाल्याने यात मनोबलाचा र्हास होतो. त्यामुळे मनुष्याची कृतीमागील वेगवान विचारधारणा संपुष्टात येते.
५. स्वयंपाक करतांना दुसर्यांचा मनात द्वेष बाळगला, तरी अन्नातील सूक्ष्म सत्त्वकणांचा त्या द्वेषरूपी तमोगुणी लहरींच्या प्रभावाने र्हास होतो. यामुळे अन्न खाणार्यातही द्वेषाची भावना संक्रमित होण्याची शक्यता बळावते.
६. क्रोधाच्या भरात अन्न शिजवले, तर क्रोधातील वेगवान तेजरूपी त्रासदायक स्पंदनांच्या प्रभावाने अन्नातील पोषक द्रव्ये जळून जाण्याची शक्यता बळावते.
मंद आचेवर शिजवलेले अन्न सात्त्विक असते !
मंद, तसेच आवश्यक तेथे मध्यम आचेवर अन्न शिजवावे; कारण तीव्र स्वरूपाची अग्नीची आच तेजतत्त्वाच्या स्तरावर दूषित स्पंदने अन्नात वेगाने सोडते. यामुळे अन्नातून प्रक्षेपित होणार्या सूक्ष्म सात्त्विक गंधयुक्त लहरी जळून जातात.
स्वयंपाकघराची शुद्धी करा !
स्वयंपाकघराची शुद्धी करतांना विभूती फुंकणे, विभूतीचे पाणी शिंपडणे, उदबत्ती फिरवणे, तसेच धूप दाखवणे, यांसारख्या कृतीतून भूमीचे प्रथम शुद्धीकरण करून घ्यावे. यामुळे तेथील त्रासदायक स्पंदने नष्ट होतात किंवा ती तेथून दूर फेकली जातात. शुद्धीकरण केलेली भूमी सात्त्विक झाल्याने तेथे भ्रमण करत असणार्या चांगल्या शक्तीशी संबंधित लहरींचा संस्कार अन्नावर होण्यास साहाय्य मिळते.
शुचिर्भूत होऊनच स्वयंपाक करा !
अन्न शिजवणारा जीवही शुचिर्भूतच असावा. आंघोळ करूनच स्वयंपाकघरात प्रवेश करावा; कारण अन्न शिजवणारा जीव जर विकारग्रस्त असेल, तर त्याच्या मनाच्या सूक्ष्म लहरींच्या प्रक्षेपणाचे आवरण अन्नावर आल्याने अन्न स्वतःभोवती दूषिततेचा कोश निर्माण करते. या कोशाचे संक्रमण अन्न ग्रहण करणार्यांच्या देहात झाल्यास ते सर्व इंद्रियांवर आपला तमोगुणी परिणाम सोडते. यामुळे देहातील इंद्रियांची कार्य करण्याची क्षमता घटते.
अन्न शिजवतांना नामजप केल्याने अन्नावर नामजपातील सात्त्विकतेचा संस्कार होऊन त्यातील सूक्ष्म रज-तमात्मक कणांचा र्हास होतो. यामुळे अन्न चैतन्यमय बनते.’
– एक विद्वान श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २.५.२०१०, रात्री १०.३९]
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |