गोमेकॉतून १ मासाच्या अर्भकाचे अपहरण केल्याचे प्रकरण
|
पणजी, १२ जून (वार्ता.) – गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) परिसरातून दिवसाढवळ्या एक मासाच्या अर्भकाचे अपहरण होण्याची घटना ११ जून या दिवशी दुपारी घडली. पोलिसांनी कसून शोध घेतल्यानंतर सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे अपहरणकर्ती महिला आणि अर्भक यांना सालेली येथे १२ जून या दिवशी सायंकाळी पोलिसांनी कह्यात घेतले आहे. अर्भक सुरक्षित आहे. संशयित महिलेला डिचोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. ‘बाळ घेऊन पसार होण्यामागे हेतू काय होता?’, याविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत.
पोलीस सूत्रांनुसार ओडिशा राज्यातून आलेली एक महिला तिच्या लहान अर्भकासह ‘गोमेकॉ’त काही कामांसाठी आली होती. तपासणीसाठी रांगेत उभी असतांना महिलेने तिचे मूल काही काळासाठी अन्य एका महिलेकडे सोपवले; मात्र मातेचे लक्ष नाही पाहून त्या दुसर्या महिलेने अर्भकाला घेऊन तेथून पळ काढला. मातेने आराडाओरडा केल्यावर लोक जमले. त्या वेळी संबंधित महिला एका पायलटद्वारे (भाड्याच्या दुचाकीस्वाराद्वारे) पणजीच्या दिशेने गेल्याचे समजले. यानंतर आगशी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करून अन्वेषणाला प्रारंभ केला. पोलिसांनी संबंधित संशयित महिलेचे छायाचित्र आणि चित्रफीत (व्हिडिओ) प्रसारित केले होते. राज्यात अर्भकांचे अपहरण करणारी एखादी टोळी कार्यरत असल्याची शक्यताही पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून महिलेचा कसून शोध
संबंधित संशयित महिला पणजी येथून दुसर्या मोटारसायकल पायलटच्या साहाय्याने पर्वरी येथील ‘तीन बिल्डींग’ या ठिकाणी गेली आणि पर्वरी येथून ‘जनता बस’ मधून म्हापसा येथे गेली. बसमधून ती श्री महारुद्र देवस्थानाजवळ उतरून पुढे निघून गेल्याचे ‘सीसीटीव्ही’ कॅमेराने टिपले गेले आहे.
ती महिला अस्नोडा येथील वन खात्याच्या तपासनाक्यावरील ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्यात दिसल्यामुळे संशयित महिला डिचोली परिसरात लपून बसल्याचा पोलिसांना संशय आला. विविध ठिकाणच्या ‘सीसीटीव्ही’ फूटेजच्या आधारे महिलेला कह्यात घेणे शक्य झाले.
अपहरणाशी ‘गोमेकॉ’चा काहीही संबंध नाही ! – विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री
‘गोवा वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या अपहरणाचा ‘गोमेकॉ’शी काहीही संबंध नाही. या वृत्ताविषयी चुकीचे वार्तांकन केले जात आहे’, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केली.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘अपहरणाच्या प्रकरणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ‘ट्वीट’ करून राज्यातील रुग्णालये असुरक्षित असल्याचा आरोप केला आहे. हे विधान धक्कादायक आहे. संबंधित अर्भक किंवा त्याची माता हे गोमेकॉतील रुग्ण नाहीत किंवा त्यांचा गोमेकॉच्या सुरक्षेशी कोणताही संबंध नाही. तथ्यहीन आरोप कुणीही करू नयेत.’’