डॉ. मिनु रवि रतन यांनी कोणतेही वैद्यकीय उपकरण न वापरता पाठीच्या दुखण्याचे निदान करणे आणि ‘एम्.आर्.आय्. स्कॅन’ केल्यावर तशाच स्वरूपाचा त्रास असल्याचे लक्षात येणे
‘डिसेंबर २०१९ मध्ये मी काही मास रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होते. मला पुष्कळ वर्षे तीव्र पाठदुखीचा त्रास आहे. या कालावधीत डॉ. मिनु रवि रतन आश्रमात आल्या होत्या. मी त्यांना त्रासाचे स्वरूप सांगितल्यावर त्यांनी समवेत असलेल्या साधिकेला ‘पाठीच्या कण्यातील एका विशिष्ट चकतीची झीज (स्पाइनल डिस्क) झाली आहे’, असे सांगून त्याविषयीची काही सूत्रे लिहून घेण्यास सांगितली. त्यानंतर त्यांनी मला नम्र स्वरात या त्रासाचे स्वरूप समजावून सांगितले आणि काही उपायही सुचवले.
काही दिवसांनी मी पाठीचे ‘एम्.आर्.आय्. स्कॅन’ करून घेतले. या अहवालातही ‘पाठीच्या कण्यातील एक विशिष्ट चकती झिजली आहे’, असे निदान झाले. हा अहवाल आणि डॉ. मिनु यांनी केलेले निदान सारखेच होते. या प्रसंगातून देवाने मला ‘पुढे येणार्या आपत्काळात कोणत्याही स्वरूपाची वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नसतील, त्या वेळी साधना म्हणून वैद्यकीय व्यवसाय करणारे साधक रुग्णांच्या आजाराचे अचूक निदान करून त्यांच्यावर योग्य तो औषधोपचार करतील’, हे दाखवून दिले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच आम्हाला डॉ. मिनु रतन यांच्यासारख्या आधुनिक वैद्या मिळाल्या आहेत. त्यासाठी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’ – (पू.) सौ. भावना शिंदे, अमेरिका (२.४.२०२१)